अध्याय २१ वा
वैवाहिक जीवन
ईश्वराच्या
इच्छेचे पूरक । समाजाचे दोनचि घटक ।
 पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती ॥१॥
चालावा जगाचा
प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह ।
 यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा ॥२॥
स्त्रीपुरुष हीं
दोन चाकें । जरि परस्पर सहायकें ।
 तरीच संसाररथ चाले कौतुकें । ग्राम होई आदर्श
॥३॥
परि याची हेळसांड
झाली । विवाहाची रूढीच बनली ।
 मग यांतूनचि उदया आलीं । हजारों दु:खें समाजाचीं
॥४॥
पुरुषार्थासाठी
वैवाहिक जीवन । विवाह समाजस्थैर्याचें साधन ।
 परि वाढोनि अज्ञान प्रलोभन । झाली धुळधाण
समाजाची ॥५॥
कितीतरी मुली
असती सुंदर । परि हुंडयासाठी राहती कुवार ।
तैसाचि मुलांचा
व्यवहार । जातींत भासे कित्येक ॥६॥
ऐसी वाईट पडली
प्रथा । तेणें व्यभिचार वाढले सर्वथा ।
 हें महापाप असे माथां । समाजाच्या ॥७॥
कुणाचे पिते लग्न
करोनि देती । घराणें, पैसा, प्रतिष्ठा बघती ।
 विवाहाआधी न पुसती । दोघांसहि ॥८॥
भिन्न स्वभावांचे
प्राणी । जमवोनि आणावेत दुसर्यांनी । 
कैसी रुचेल
जिंदगानी । दोघांसहि ? ॥९॥
वडिलांचा मान
राखावा । म्हणोनि का संसार नागवावा ?
 ऐसातरी हेतु कां धरावा । वरिष्ठांनी ? ॥१०॥
विवाहाआधी
परस्पराने । पाहावें दोघांनाहि निश्चयाने ।
 विचारस्वातंत्र्य दोघांसहि देणें । अगत्याचें
॥११॥
वडिलांनी पहावी
एक खूण । लग्न करिती काय आंधळे होऊन । 
पश्चात्तापाचें
कारण । न पडावें म्हणोनिया ॥१२॥
एरव्ही
दोघांच्याही मतें । लग्न जुळवूनि आणावें सु-मतें ।
 नांदोत दोघेंहि एकसुतें । संसार सुखी करावया
॥१३॥
जुळतां दोघांचेहि
विचार । विकास पावेल कारभार ।
 दोघांची उत्साहशक्ति अपार । कार्य करील सेवेचें
॥१४॥
उत्तम राहणें
उत्तम बोलणें । उत्तम सौंदर्य सात्विक लेणें ।
 घरामाजी शोभून उठती तेणें । देवता जणूं
समविचारें ॥१५॥
विचाराविण जें
जें करणें । तें सर्वचि होतें लाजिरवाणें । 
ऐसेंचि मागील
गार्हाणें । ऐकतों आम्ही ॥१६॥
भोगासाठी लग्न
केलें । आंधळेपणीं संसार चाले ।
 वर्ष लोटतांचि गोंधळले । दोन्ही प्राणी ॥१७॥
एक एकाशीं बोलेना
। संशय वाढले दोन्हीजणां ।
 कशाचा संसार ? यमयातना । वाटे पतिपत्नीसि ॥१८॥
विषय-विकारें
लग्न केलें । पूर्वीच परस्परांसि नाही ओळखलें ।
 तेणें सर्वाचि वाया गेलें । जीवन दोघांचें ॥१९॥
केवळ भोगासाठी
लग्न । हें तों दिसे विचित्रपण ।
 काय होतें पशु जमवोन । एके ठायीं ? ॥२०॥
मानवांचें एक
होणें । स्वर्गसुखहि त्यांना ठेंगणें ।
 त्यांच्या संयोगें उत्त्कर्ष पावणें । लावण्यासि
॥२१॥
श्वानांचिया
पशुत्वसंयोगें । जन्मती जीव कर्मभोगें । 
टाकिलीं जाती
सर्व मार्गें । श्वान-पिलीं ॥२२॥
तैसें नोहे
मानवांचें । त्यांचें राहणें जबाबदारीचें ।
 एक संतानहि थोर कामाचें । दिगंतरीं ॥२३॥
देशीं पाहिजे
सर्वचि धन । रानधन, लेणीं आदि मानधन ।
 द्रव्यधन, खाणी आणि गोधन । सर्वकांही ॥२४॥
सर्व धनांमाजी
सुपुत्रधन । वाढवी राष्ट्राचें गौरवस्थान । 
म्हणोनिच
वधुवरांनी शोधून । लग्न करावें विचारें ॥२५॥
नाहीतरि मरतुकडे
पुत्र व्हावे । तेणें घराणें बुडोन जावें ।
 देशासहि कलंकित करावें । न होवो ऐसें ॥२६॥
उत्तम बीजसि
उत्तम जमीन । तेणें वृक्ष वाढतो भेदूनि गगन ।
 ऐसेंचि असावें सन्तान । बलभीमासारिखें ॥२७॥
ऐसें सन्तान
घराणें शोभवी । एकवीस कुळांचें नांव जागवी ।
 स्वकर्तव्याने चमकवी । देश आपुला ॥२८॥
परि पुत्रांचीहि
असावी मर्यादा । देशीं न वाढवी आपदा । 
शरीर
संरक्षणाचीहि संपदा । गमावूं नये संसारीं ॥२९॥
निरोगी रक्त
उत्तम गुण । सुस्वभावी ऐसें सन्तान ।
 हें नाही सर्वस्वीं अवलंबून । जाति-कुळ-गोत्रावरि
॥३०॥
दोघें प्राणी
उपवर असती । भिन्नजाति लग्न करूं म्हणती ।
 विचारें करितां, त्यांसि संमति । अवश्य द्यावी ॥३१॥
गुण गुणाकडे धांव
घेतो । आपण शास्त्रींपुराणींहि ऐकतों । 
मिश्र विवाहाने
बिघाड होतो । म्हणणें व्यर्थ ॥३२॥
मिश्र विवाह ऐसा
नसावा । इच्छा नसतां बळी पाडावा ।
 विचार करण्यास अवकाश द्यावा । प्रसन्न चित्तें
॥३३॥
विचारें ’ जीवनाच्या संग्रामीं । हाचि
विवाह करूं आम्ही । ’ 
म्हणती दोन्ही
विवेकी प्रेमी । आड कोणी कां यावें ? ॥३४॥
मागे गुणविवाह
बहुत झाले । श्रीकृष्णें अर्जुनादिकें केले ।
 समाजीं अनेक प्रयोग घडले । विवाहांचे भिन्न
भिन्न ॥३५॥
गुणसाम्याचे
मिश्रविवाह । वीरश्रीच्या कसोटीचे विवाह ।
 राष्ट्रांतील भेद मिटविण्याचे विवाह । नाना
जमातींमधूनि ॥३६॥
ऐसे अनेक तात्विक
विवाह । त्यांत कांही राक्षस-विवाह । 
बळजबरीने बांधले
देह । अनेक हेतूंसाठी ॥३७॥
ऐशा गोष्टीस
मात्र जपावें । बाळपणींहि लग्न नसावें । 
समजूतदारीने
करूनि द्यावे । लग्नप्रसंग ॥३८॥
कांही पित्यांची
असते हौस । मुलींचें वय तीन वर्ष ।
 अथवा असतां तीन मास । करिती लग्न ॥३९॥
वयांत येती वधुवर
। माहीत नसतो मानवी व्यवहार ।
 बळी पडती रूढीसि पामर । दोन्ही प्राणी ॥४०॥
पुढे एक एकाशीं न
मिळे । सर्प-मुंगुसापरी सगळें ।
 मग पंचायती-नोटिसांचे सोहळे । जीवन गारद यांतचि
॥४१॥
कांही मुली विधवा
होती । बालवयींच पति वारती ।
 पुढे त्याची होते फजीती । लग्नावांचोनि ॥४२॥
रूढि सांगते लग्न
न करावें । मन बावरे कोणीं आवरावें ?
 चोरूनि पापाचरणी व्हावें । तरि तें दु:खदायी ॥४३॥
ऐशा ज्या ज्या
वाईट रीती । झुगारोनि द्याव्या हातोहातीं । 
करावी पुन्हा
नवीन निर्मिती । समाजनियमांची ॥४४॥
ज्या विधवेस वाटे
लग्न करावें । तिने वडीलधार्यांसि सांगावें ।
 त्यांनी सहृदयपणें लग्न योजावें । जीवधर्म
म्हणोनिया ॥४५॥
ज्या विधवेची
इच्छा नाही । तिला छळूं नये कोणी कदाहि । 
ती सती संन्यासिनी
समजोनि देहीं । राखावी समाजाने ॥४६॥
ऐसेंचि हें घडूं
द्यावें । मानवांच्या प्रकृतिस्वभावें ।
 तरीच मानव म्हणविणें बरवें । शोभा देतें ॥४७॥
कांहींचे वडील
लग्न करोनि देती । मनास वाटेल तो हुंडा घेती ।
 जोड-विजोड कांही न पाहती । धनापायीं ॥४८॥
वृध्द वा रोगी
असोनि वर । वधु देती बालिका सुंदर ।
 धनासाठी दुर्व्यवहार । परोपरीचे ॥४९॥
मुलामुलींचा
घेवोनि पैसा । जीवनांत वाढविती निराशा ।
 मोलाने का प्रेम-फासा । पडे गळीं कोणाच्या ? ॥५०॥
बालक-बालिकेसि
वाचा नसते । तोंड फोडोनि बोलेना ते ।
 परि हे कसाब म्हणावेत पुरते । जे विजोड लग्न
योजिती ॥५१॥
ऐशा असतील ज्या
वेडया रीती । त्या काढोनि टाकाव्या प्रवृत्ती । 
जीवनाचें प्रेम
चित्तीं । तेंचि धन समजावें ॥५२॥
ज्याने
मुलामुलींचे पैसे घेतले । त्यासि समाजाने पाहिजे निषेधिलें । 
तरीच हे दुराग्रह
मोडले । जातील आता ॥५३॥
नाहीतरि
हुंडयापांडयासाठी । जीवन होईल मसणवटी ।
 अनेक मुलेंमुली करिती शेवटीं । आत्मघात ॥५४॥
कित्येक हात
धरोनि जाती । समाजजीवनीं कालविती माती । 
परि लोभ न सोडवे
शहाणियांप्रति । पैशांचा अजुनि ॥५५॥
हें गांवाने
दुरुस्त नाही केलें । तोंवरि पापांचें डोंगर वाढले ।
 सगळे गांवचि भागीदार झालें । समजावें त्यांचें
॥५६॥
कांही घरीं मुली
उपवर । मुलेंहि लग्नासाठी तयार ।
 तेथे आटयासाटयाचा व्यवहार । करिती कोणी ॥५७॥
मुलामुलींची
नसतां जोड । आपुलिया सोयीसाठी उघड ।
लादिती मानेवरि
जोखड । मायबाप ॥५८॥
मग तेथे
भांडाभांडी । मुलगी माहेरींच न धाडी । 
अथवा टाकोनि
करिती नासाडी । जीवनाची तिच्या ॥५९॥
कांही आपुल्या
मानाकरितां । मुलींच्या दैवीं आणिती व्यथा ।
 ऐशा वाढल्या वाईट प्रथा । कितीतरी गांवीं ॥६०॥
कांही जातींत
ठेविती पडदा । जणूं कोंडवाडयाचाचि धंदा ।
 त्याने लग्न झालियाहि आपदा । येते केव्हा ॥६१॥
मुलगी पडद्याने
बघितली नव्हती । आता कळलें तिरळी होती । 
कांही म्हणती
लग्नप्रति । मागे घ्यावें काडीमोडीने ॥६२॥
पडद्याचिया
प्रस्थामुळे । शहाणे तेहि होती खुळे ।
 गर्दीत पति चुकतां गोंधळें । पडे बापडी गुंडाहातीं
॥६३॥
दुर्जन बुरख्याआड
लपविती । ऐशा स्त्रिया नेल्या किती । 
अजूनिहि नेत्र न
उघडती । समाजाचे ॥६४॥
पडदापध्दति
बहुपरी भोवे । थोरांपुढे कधी न यावें ।
 परिशुश्रुषाहि अंतरल्या याभावें । कितीतरी मुली
॥६५॥
ऐशा विचित्र
कांही प्रथा । मोडोनि टाकाव्या समाजीं व्यथा । 
लावूं नये दोष
माथां । कोणा एकाच्याचि ॥६६॥
कांही मायबाप
पोरा चढविती । पुरुषें कैसेंहि वागावें म्हणती । 
मुलीस गांजिती, मार देवविती । ऐसी वृत्ति आसुरी ॥६७॥
कांही मायबाप
मुलींचे कैवारी । ’ हूं ’ म्हणतां जावोनि पडती द्वारीं ।
 ऐसें कु-शिक्षण नानापरी । दु:ख संसारीं वाढवी
॥६८॥
कांही
पतिपत्नींचें संघटन । परि आड येई थोरांचा मान ।
 काडीमोड, विरोध अथवा भांडण । करी वैराण जीवन त्यांचें ॥६९॥
कांही लपवालपवी
करिती । मुली नांदायासि न धाडिती ।
 कांही मुलींना ओढूनि नेती । तमाशा करिती जीवनाचा
॥७०॥
कांही लग्नाआधी
लपविती उणीव । त्याची पुढे होतां जाणीव । 
जन्मभरि भोगावा
लागे उपद्रव । सकळांसि मग ॥७१॥
कांही बढाई
दाविती खोटी । कांही रुसती आंदणासाठी । 
सोय न पाहतां करिती
कष्टी । परस्परांसि सोयरे ॥७२॥
कोणास
दागिन्यांची हाव । सदगुणांचा नकळे भाव ।
 त्यांस फसवी नकली वैभव । जीवन गारद मुलींचें
॥७३॥
मुलीमुलांचा
लग्नाबाजार । शिक्षण, सौंदर्य, नोकरीवर ।
 भाव न्यूनाधिक ठरविती साचार । जीवनमूल्यें न
जाणतां ॥७४॥
कांही लग्नांचे
दलाल । उधळीत जाती रंग गुलाल । 
मुलामुलींचें
जीवन हलाल । करिती स्वार्थास्तव ॥७५॥
कांही मुलींना
खपवूं पाहती । ध्यानीं न घेतां नीति-अनीति ।
 ऐसी लाचार केली स्थिति । नाना रूढयांनी ॥७६॥
ज्योतिषासि
देऊन-घेऊन । मनासारिखे काढविती गुण ।
 प्रसंगीं नावंहि सांगती बदलून । दंभ दारूण वाढला
॥७७॥
आकाशांतील पाहती
ग्रह । इकडे स्वभावीं वेगळे दुराग्रह । 
जीवनांत वाढे
जयांनी द्रोह । ऐसे त्यांना न दिसती ॥७८॥
म्हणती वधुवरें
सुलक्षण । जुळले त्यांचे छत्तीसगुण । 
इकडे छत्तीसी
अथवा खडाष्टक पूर्ण । करी जीवन बरबाद ॥७९॥
वधुवरांचे उत्तम
गुण हेंचि परस्परांचें महाभूषण ।
 त्यावांचोनि विवाह केला वैभवपूर्ण । तरि तो सर्व
अमंगल ॥८०॥
कांही ठिकाणीं
विवाह करिती । वेडयासारखा पैसा उधळिती ।
 उपयोग नाही ऐसी रीति । कासयास आचरावी ? ॥८१॥
लग्नाचे अपार
सोहळे । विहीण-व्याही-मामे सगळे ।
 वर्हाडांचे गोंधळ सावळे यासि विवाह म्हणों नये
॥८२॥
अस्ताव्यस्त
तारांबळ । उधळपट्टी आणि धांवपळ ।
यासि म्हणावें
कार्य अमंगळ । खर्च निष्फळ पैशांचा ॥८३॥
लग्नाकरितां कर्ज
करावें । जन्मभरि व्याज भरीत जावें ।
 लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें
सांगितलें ? ॥८४॥
चार-पांच दिवस
लग्न । लग्नांत होती नाना विघ्नं ।
 मोठेंपणाचें विडंबन । कासयासि करावें ? ॥८५॥
असोत अडी-अडचणी
किती । साधिलीच पाहिजे तिथि । 
ऐसी कां ठेवावी
प्रवृत्ति । रूढिबध्द ? ॥८६॥
प्रसन्न हवापाणी
ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त । 
बाकीचें झंजट
फालतू । समजतों आम्ही ॥८७॥
दिवस पाहावा
सुंदर । हावापाणी सोयीस्कर । 
सर्वांसि होईल
सुखकर । म्हणोनिया ॥८८॥
खर्च नको भव्य
मंडपाचा । देखावा असवा निसर्गाचा । 
अथवा सभामंडप
मंदिराचा । योजावा या कार्यासि ॥८९॥
वेळ पैसा आणि
श्रम । वाचवावेत करोनि नेम ।
 गुणांस द्यावें महत्त्व परम । जाति-धन-भ्रम
सोडोनि ॥९०॥
सुंदर करावें
सभास्थान । बैसवावे साजेलसे जन । 
वरवधूंना समोर
बसवून । सूचना द्यावी सूचकें ॥९१॥
द्यावा वरवधूंचा
परिचय । प्रकट करावा सत्कार्य-निश्चय ।
 मग साधावें कार्य मंगलमय । मंगलाष्टकें
म्हणोनिया ॥९२॥
मंगलाष्टकीं
विवाह-उद्देश । सज्जनें करावा उचित उपदेश ।
 येऊं न द्यावा नाटकी अंश । अपवित्र त्यांत ॥९३॥
सभा असावी आदरपूर्ण
। देऊं नये धूम्रपान । 
धर्मसंस्कार
वाटावें लग्न । अग्निदेवते स्मरोनिया ॥९४॥
वडील जनांचे आशीश
घ्यावे । सर्वांशी प्रेमादरें वागावें ।
 गोडं बोलोनिं उरकवावें । लग्नप्रसंगा ॥९५॥
वरवधूंना ग्रामीण
खादी । असो जुनी वा नवी साधी ।
 ऐशा वस्त्रींच लग्नाक्षदी । पडाव्या शिरीं
उभयतांच्या ॥९६॥
कपडे असती ते
घालावे । नसतां धुवोन स्वच्छ करावे ।
 अहेरादि नको लग्नप्रसंगीं यावें । सर्वजनें
आदरें ॥९७॥
लग्नानिमित्त
भेटीच देणें । तरि उभयतांचा संसार सुरू व्हावा तेणें ।
 अथवा गांवाचें फिटावे उणें । ऐशी योजना करावी
॥९८॥
सारांश, लग्नाचा प्रसंग । विचाराने करावा यथासांग ।
 समजोनि परिस्थिति वेळप्रसंग । सर्वकांही ॥९९॥
ऐसा हा मंगल
प्रसंग । देशाचें भूषवी अंग । 
समाजजीवन करील अभंग
। वाढेल कीर्ति गांवाची ॥१००॥
विवाहाचा जो
संस्कार । त्याचें महत्त्व सर्वांत थोर ।
 त्या पायावरीलच समाजमंदिर । म्हणोनि सुंदर करा
यासि ॥१०१॥
यासाठीच
वधुवरांसंबंधीं बोललों । नवनिर्माण ओघानें पुढे चाललों ।
 सांगोनि एकदा मुक्त झालों । सुखदु:ख समाजाचें
॥१०२॥
स्त्रीपुरुष हीं
दोन चाकें । परस्परपोषक होतां निके ।
गांव नांदेल
स्वर्गीय सुखें । तुकडया म्हणे ॥१०३॥
इतिश्री ग्रामगीत
ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत ।
 विवाहसंस्कारें ग्रामोद्वार कथित । एकविसावा
अध्याय संपूर्ण ॥१०४॥
अध्याय२१वाऑडीओ स्वरुपात --
२ टिप्पण्या:
very good initiative,as available both in text and audio
राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून प्रत्येकाने जीवन जगल्यास समाजाला आदर्श व्हायला वेळ लागणार नाही...🙏
टिप्पणी पोस्ट करा