अध्याय १८ वा
श्री संत गोरा कुंभार यांच्या बद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा .
श्रम-संपत्ति
एक श्रोता प्रश्न
विचारी । आम्हीं ऐकिलें गीतेमाझारीं ।
कर्ममय असे सृष्टि सारी । न करतांहि कर्म घडे
॥१॥
सर्वांसचि लागलें
कर्म । कर्म हाचि देहाचा धर्म ।
तेथे काम करावें मुद्दाम । हें बोलणें विपरीत
॥२॥
आपण म्हणतां
परिश्रम करा । येणें पोषण होईल अहंकारा ।
सहज चालेल तोचि बरा । व्यवहार लोकीं ॥३॥
ही श्रोतियाची
शंका । भ्रमवीत आली नित्य लोकां ।
परि ही नव्हे गीतेची भूमिका । निर्भेळ ऐसी ॥४॥
कर्ममय विश्व आहे
। कोण रिकामा बसला राहे ?
प्रत्येक जण करीतचि जाय । कांहीतरि कर्म ॥५॥
परि त्या कर्माचे
अनेक प्रकार । कांही शुध्द निषिध्द मिश्र ।
कांही विधियुक्त कांही पवित्र । निष्काम कर्म
॥६॥
कांही
देहेंद्रियांसाठी । कांही निपजती मनाच्या पोटीं ।
कांही विवेकबुध्दीने गोमटीं । निपजती कर्मे ॥७॥
कांही कर्मे स्वत:करिता
कांही कुटुंबाचीया हिता ।
कांही कर्मे गांवा लोकांकरितां । सेवाधर्मरूप ॥८॥
आपल्या देहाचें
करणें काम । हा कसला आला महाधर्म ? ।
हें आहे
नित्यकर्म । सहजचि घडणारें ॥९॥
तैसेंचि
प्रसंगाविशेषें कांही । करणें सणोत्सवादि सर्वहि ।
त्यांतहि विशेष ऐसें नाही । नैमित्तिक कर्मी
॥१०॥
नित्यनैमित्तिक
कर्मे सहज । तीं करणें आवश्यक काज ।
न करितां विस्कटेल समाज । परि करणें नव्हे
महाधर्म ॥११॥
तैसेंचि पोटासाठी
करणें काम । हे नव्हेत पुण्यपरिश्रम ।
उरल्या वेळीं जें सेवाकर्म । त्यासि धर्म बोलती
॥१२॥
तेंचि माणुसकीचें
कर्म । जें दुसर्यांसाठी केले श्रम ।
एरव्ही पशुपक्षीहि करिती उद्यम । आपुलाले ॥१३॥
निषिध्द आणि सकाम
कर्म । तैसेचि त्यागूनि अहं-मम ।
जगासाठी करावेत श्रम । ईश्वरार्पण बुध्दीने ॥१४॥
हेचि गीतेची
शिकवणूक । वारंवार निश्चयात्मक ।
जेणें सर्वेश्वराचें पूजन सम्यक । तेंचि कर्म
गीतामान्य ॥१५॥
एरव्ही कामाविण
कोणी नाही । हें मजसीहि कळे नि:संशयीं ।
परि त्यासि काम आज न म्हणों कांही । जें न
उत्पादन वाढवी ॥१६॥
जनतारूप
जनार्दनाची । ज्यांत सेवा न होई साची ।
त्यास गीताप्रिय कर्माची । पदवी आम्हीं न देऊं
॥१७॥
आज भरपूर उत्पादन
। हेंचि जनसेवेचें साधन ।
त्यासाठी झटेल जो
जो जन । गीता कळली तयासि ॥१८॥
मंदिरीं बैसोनि
नाक दाबावें । त्यापेक्षा मार्गींचे कांटे उचलावे ।
दु:खितासि प्रेमें पाणी पाजावें । हें श्रेष्ठ तीर्थस्नानाहूनि ॥१९॥
एक हात खोदावी
जमीन । हें पूजनाहूनि पूजन ।
परिणाम शेकडों
व्याख्यानांहून । अधिक तयाचा ॥२०॥
श्रमिकांस जेणें
लाभेल अन्न । तें कर्म श्रेष्ठ यज्ञाहून ।
एरव्ही गीतेचें नांव सांगून । भलतें समर्थन करूं
नये ॥२१॥
एक नौजवान आळसें
निजला । म्हणे हेंहि पाहिजे शरीराला ।
म्हणोनि तो सारखाचि झोपला । फक्त उठला भोजनासि
॥२२॥
भोजन झाल्यावरि
पुन्हा पडला । कैसा आवडेल घरच्या लोकांला ?
कोणी थट्टामस्करी करूं लागला । म्हणे हेंहि कामचि आहे की ॥२३॥
एक सावकारीचें
घाशी लिखाण । एक झगडयाचें चालवी प्रकरण ।
कोणी उपद्रव करी हातीं धरोन । लोक हरप्रकारें
॥२४॥
असलें काम जरी
बंद पडलें । तरी माझ्यामतें कांही न अडलें ।
परि निर्वाहाचें उत्पादनचि शांतलें । कैसें
चालेल जीवन ? ॥२५॥
म्हणोनि सर्वांनी
काम करावें । ग्रामाचें धन वाढवावें ।
येथे गरीब-श्रीमंत न पाहावें । कामासाठी ॥२६॥
श्रीसंत गोरा
राबे अंगें । देवहि माती तुडवूं लागे ।
तेथे श्रीमंत आळसें वागे । हें महापाप ॥२७॥
यावरि बोले एक
श्रोता । नाही गरीब मजुरासीच काम पाहतां ।
बेकारांचा वाढतो जत्था । तेथे श्रीमंतां काम
कोठे ॥२८॥
श्रोतियाची ही
विचारसरणी । आहे भ्रमाची पोसणी ।
सारा देश दीन-दरिद्री अज्ञानी । तेथे काम न दिसे
तया ॥२९॥
पुन:पुन्हा जन्मा
यावें । मातृभूमीसि सुखी करावें ।
ऐसें थोर म्हणती जीवेंभावें । तेथे काम न दिसे
तया ॥३०॥
देशांत कामांचा
उभा डोंगर । दारिद्रयदु:खाचा वाहतो पूर ।
अर्धनग्न अर्धपोटी लोक अपार । त्यांचें दु:ख कां
न दिसे ? ॥३१॥
येथे विश्रांतीसि
नाही वेळ । निरंतर कार्यकर्ते प्रबळ ।
पाहिजेत ठायींठायीं सकळ । काम ऐसें देशापुढे
॥३२॥
परि ज्यांना
होणें आहे साहेब । लोकांवरि कसावया रुबाब ।
न कष्टतां इच्छिती आराम खूब । तेचि राहती बेकार
॥३३॥
शिक्षणाचा द्यावा
उपयोग । करोनि प्रचार आणि प्रयोग ।
तंव ते स्वत:चि बनती रोग । समाजाच्या जीवनीं
॥३४॥
एका बाजूने
शिक्षित-श्रीमंतांचें । तैसेंचि झालें मजूर-गरिबांचें ।
शिथिलता आळस दोघांचे । घरीं थाटला दिसताहे ॥३५॥
जेव्हा पोटासि
भूक लागे । तेव्हाचि घरोघरीं काम मागे ।
नाहीतरि आळसा घेवोनि संगें । खुशाल पडे
झोपडीमाजी ॥३६॥
सकाळीं आठ
वाजतांचें काम पूर्ण । दहा वाजतां उठे घरांतून ।
नाही कामावरि मन । चुथडा करी कामाचा ॥३७॥
म्हणे श्रीमंतासि
काय झालें ? ते काय भिकेसि लागले ?
काय होतें काम न
केलें । तरी आमुचें नुकसान ? ॥३८॥
कामासाठी हात
उचलेना । तोंडीं सारखा वाचाळपणा ।
मजूरी न देतां
धिंगाणा । घालितसे लोकांपाशी ॥३९॥
ऐसें करणें आहे
चुकीचें । पैसे कसून घ्यावेत कामाचे ।
परि कामचुकार होणें हें आमुचें । ब्रीद नव्हे
सर्वथा ॥४०॥
मजूर सकाळीं
पाहिजे उठला । नित्यविधिकर्मांतून निपटला ।
घरकाम करोनि निघाला । पाहिजे तत्काळ कामासि ॥४१॥
जेव्हा कामाची
वाजेल घंटा । मजूर चालला चारी वाटां ।
उद्योगांचा चालला सपाटा । ऐसें व्हावें ॥४२॥
मजुरावरीच आहे
उत्पादन । उत्पादनचि मुख्य ग्रामाचें धन ।
तयामाजी करणें कुचरपण । वेडेपणाचें ॥४३॥
मजूर इकडे
कार्यनिष्ठा न जाणे । श्रीमंत तिकडे आळशी बने ।
म्हणोनि झालें
कंटाळवाणें । जीवन आता देशाचें ॥४४॥
उत्पादनाची गति
खुंटली । उपभोगाची भावना वाढली ।
काय करील भूमाता भली । मशागत नसतां जमिनीची ? ॥४५॥
यासि सर्वचि असती
जबाबदार । शक्ति संपत्ति विचार प्रचार ।
हें एकहि नाही ताळयावर । म्हणोनि ग्राम ओसाडलें
॥४६॥
श्रीमंतां आपुलें
न वाटे काम । गरीबा उत्पादनाचें नाही प्रेम ।
शिक्षितां हीन वाटतो परिश्रम । यानेच आली
शिथिलता ॥४७॥
ऐसें न व्हावें
आता पुढती । सर्वांनी सुधारावयास पाहिजे मति ।
म्हणोनि आहे माझी विनंति । सकळांप्रति आग्रहाची
॥४८॥
जें जें ज्याचेनि
काम बने । त्याने तें सेवा म्हणोनि साधणें ।
आपुलेंहि बरें करणें । गांवासि होणें भूषणावह
॥४९॥
जो जो
पोटापाण्याचें काम न करी । उत्पादनासि ना सुधारी ।
त्यास विरोध करावा, विचारी । माणसाने गांवाच्या ॥५०॥
श्रमनिष्ठेचा
करावा प्रचार । सर्वांस आपुलकी वाटे पुरेपूर ।
ऐसी व्यवस्था करावी सुंदर । गांवचें उत्पादन
वाढवोनि ॥५१॥
गांवचें वाढवाया
उत्पन्न । गांवीं कराया नवनिर्माण ।
काय करावें ऐसा
प्रश्न । वारंवार ऐकूं येई ॥५२॥
त्यासि उपाय हाचि
प्रथम । कामगार करिती जे श्रम ।
त्यांची शक्ति
वांचे तिला काम । द्यावें सहायक दुसरेंहि ॥५३॥
आणि इतरांचा वेळ
कितीतरी । जाई व्यर्थचि गांवीं घरीं ।
कामीं लावितां तो निर्धारीं । काया पालटेल
गांवाची ॥५४॥
कच्ची सामुग्री
गांवच्या भागीं । ती पुरेपूर आणावी उपयोगी ।
शोध करोनि नाना
प्रयोगीं । माती करावी सोन्यासम ॥५५॥
अन्य देशींच्या
तरुणांसि वेड । नित्य नवें संशोधन प्रचंड ।
तैसी धुंद चढावी अखंड । गांवच्या शिक्षित तरुणां
॥५६॥
गांवचे कलावंत
निपुण । त्यांना द्यावें उत्तेजन ।
नवनव्या वस्तु कराव्या निर्माण । उपयोगाच्या
जीवनासि ॥५७॥
उद्योगें
यंत्रेंहि निर्मावी । परदेशा भीक न मागावी ।
आपणचि करोनि भोगावीं । वैभवें सारीं ॥५८॥
चरखाटकळी पासून
उद्योग । अन्न धान्यादिकांचे प्रयोग ।
घरेदारें सर्व सुयोग । आपणचि निर्मावे ॥५९॥
प्रत्येक घरीं जोडधंदा
। सर्व स्त्रीपुरुष याचि छंदा ।
दूर करावया आपदा । जीवनाच्या लागावे ॥६०॥
कोणी पिशव्या
कोणी नवारी । कोणी खादी विणतो घरीं ।
कोणी चपला चामडियाच्या करी । मेल्या जनावरांच्या
॥६१॥
कोणी चटया कोणी
आसनें । कोणी खुर्च्या कोणी खेळणें ।
कोणी बादल्या पलंग गोणे । साबणहि घरीं करीं ॥६२॥
कोणी सुंदर मडकें
घडवी । कुंडया फुल-पात्रें बरवीं ।
कोणी कवेलू मजबूत
दावी । करोनिया सुंदरसें ॥६३॥
कोणी सुंदर विटा
करी । कोणी फाडी फोडी बरी ।
सर्व हे आपापल्या परीं । घरोघरीं कार्यरत ॥६४॥
कोणी बैलांचा साज
करी । कोणी रंग शोधी परोपरी ।
प्रत्येकजण कांहीतरी । करितचि आहे ॥६५॥
ऐसें हें सर्व
गांव । जोडधंद्यांनी भरीव ।
जराहि नाही उणीव । कोणेपरी कोठे ॥६६॥
ऐसी असावी
कलाकुसरी । उद्योगधंदे घरोघरीं ।
जराहि न दिसेल बेकारी । वाढली कोठे ॥६७॥
त्यासचि म्हणावी
सुंदर कला । एरव्ही अवकळेची धर्मशाला ।
उसणें आणोनि सजविला । आपुला नवरदेव ॥६८॥
जो जो धंदा
गांवीं नसला । प्रोत्साहन मिळावें त्या कार्याला ।
परि तो पाहिजे
योग्य ठरला । गांवाच्यासाठी ॥६९॥
गांवचे उद्योग
मागासले । त्यांस शिक्षणाने पुन्हा उजळिलें ।
ऐसें असावें सुधारलें । गांव आमुचें ॥७०॥
नसतील त्या वस्तु
निर्माव्या । येत नसतां शिकोनि घ्याव्या ।
घरोघरीं त्याच दिसाव्या । गांवच्या वस्तु ॥७१॥
आपुल्या गांवीं
जे जे होते । आपणचि वस्तु वापरावी ते ।
तेणें गांवींचें धन गांवींच राहतें । शक्ति
वाढते गांवाची ॥७२॥
चांभार गांवीं
उपाशी मरे । जोडयासाठी शिक्षित शहरीं फिरे ।
केवढी गांवाची कदर करणारे । बुध्दिमंत हे ! ॥७३॥
गांवीं विणकर
फुटाने फाकती । यासि हवी मलमलची घोती ।
वा रे यांची देशभक्ति ! गांव मारिती शौकासाठी
॥७४॥
कोणी म्हणती
आमुचा पैसा । आम्ही खर्चू हवा तैसा ।
गांव-द्रोही समजावा ऐसा । आपस्वार्थी मानव ॥७५॥
गांवचे कलावान
मागासले । म्हणोनि न पाहिजे उपाशी मारिले ।
बाह्य वस्तूंनी आपणचि सजले । भूषण नव्हे दूषण
तें ॥७६॥
देशांत एकटा
ताजमहाल । त्यावरूनि न ठरे देशाचा हाल ।
घरोघरीं लोक जरि
कंगाल । तरि तें मोजमाप कशाचें ? ॥७७॥
गांवीं एक
कुस्तीगीर महान । आणि बाकीचे लकडी पहेलवान ।
तरी तें गांव शरीरबलाने पूर्ण । म्हणतां नये
कधीहि ॥७८॥
मोजके थोरपुरुष
होऊनि जाती । इतरांची पातळी नयेचि वरती ।
तंव ती समाजाची प्रगति । कैसी म्हणावी जाणत्याने ? ॥७९॥
यासाठी प्रत्येक
घटक सज्ञान । पाहिजे निरोगी उद्योगी संपन्न ।
तरीच तें गांव आदर्शाचें भूषण । मिरवूं शके ॥८०॥
म्हणोनि
प्रत्येकाने आपुल्या गांवीं । ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी
। त्यांत
सुधारणाहि घडवावी । उन्नति व्हाया कलावंतांची ॥८१॥
ऐसे सर्वचि
उद्योगधंदे । चालवावेत गांवींच आनंदें ।
नांदावेत सकळ लोक स्वच्छदें । सुखसमाधानें ॥८२॥
गांवीं असावें
वस्तुप्रदर्शन । आपुल्याच गांवीं झालें निर्माण ।
बीं बियाणें, शेती-उद्योग-सामान । तयामाजीं ठेवावे ॥८३॥
खेळणीं लेणीं जीवनोद्यमें । लाकडी लोहारी बेलदारी कामें ।
कुंभारी, विणकरी, उत्तम चर्मे । असावीं तेथे ॥८४॥
असावें सुंदर एक
घर । त्यामाजीं वस्तू विविध सुंदर ।
आम्हींच निर्मिलेल्यांचा भर । असावा तेथे ॥८५॥
गांवीं जें मालधन
निर्माण होतें । बघावया लोकांनी यावें तेथे ।
योग्य किंमती देवोनि तें तें । घ्यावें सामान
तयांनी ॥८६॥
गांवीं असावी
उद्योग-समिति । जी सतत करील उद्योग-उन्नति ।
गांवाचें आर्थिक जीवन हातीं । घेवोनि लावील सोय
जी ॥८७॥
गांवचिया
धनिकांकडोनि । संपत्तीचा वांटा मिळवोनि ।
सर्वांच्या हितासाठी रात्रंदिनीं । उपयोग करावा
तयाचा ॥८८॥
कांही असती
जमीनदार । तेचि गांवचे अर्थभांडार ।
त्यांना सर्व कारभार । सोपवाया लावावा मजूरांवरि
॥८९॥
किंवा धनिक जरी
ना वळे । शेतकरी-मजुरांच्याचि बळें ।
थेंबें थेंबें साचवावें तळें । त्यांच्या अल्प
ठेवींचें ॥९०॥
त्यांतूनि
निर्माण करावा वस्तुसंग्रह । सर्वांना उपयोगी भांडारगृह ।
सर्वां मिळोनि चालवावें नि:संदेह । दुकान सर्व
वस्तूंचें ॥९१॥
त्यांत असावी
सर्वांची मालकी । हुशार किसानांची ठेवावी चालकी ।
सर्वांच्या अनुमतीने व्यापार-एकी । करावी गांवीं
॥९२॥
एक असावें
धान्यभांडार । चालावया गांवचे व्यवहार ।
त्यांत असावे सर्व जनतेचे शेअर । सोयीसारखे ॥९३॥
प्रसंगीं
त्यांतूनचि धान्य न्यावें । सर्वांमिळोनि कर ठरवावे ।
प्रसंगीं सर्वांनी वाटून घ्यावें । उत्तम रीतीं
॥९४॥
त्यांतूनचि करावी
गांवची सेवा । उणीव पडेल ज्या कष्टी जीवां ।
अथवा ग्रामसुधारणेस लावावा । वाढवा त्याचा ॥९५॥
गांवीं चालते
सवाई-दिढी । त्यास याने बसेल अढी ।
ग्रामनिधीची उघडतां पेढी । थंडावेल
व्यापारी-सावकारी ॥९६॥
गांवीं आवश्यक
तेलघाणी । शुध्द तेलादिकांची निशाणी ।
गांवचीं कामें सर्व मिळोनि । गांवींच करावीं
उपयुक्तशीं ॥९७॥
उद्योगहीनांना
उद्योग द्यावे । कामें देवोनि सुखी करावें ।
आपणासमान पाहिजे बरवें । केलें त्यांसि सुखवस्तु
॥९८॥
काम ज्याने
ज्याने करावें । त्याने हक्कानें पोटभरि खावें ।
लागेल तेवढें मागावें । हें तों आहे प्रामाणिक
॥९९॥
जयास न मिळे
कामधाम । त्याने समितीस सुचवावें नाम ।
ग्रामसेवाधिकारी उद्यम । देईल त्यासि ॥१००॥
काम देणें
कर्तव्यचि त्याचें । जमा असतील फंड गांवाचे ।
त्यांतूनि पुरवावें मोल कामाचें । उपयोगी ऐशा
॥१०१॥
मजुरा मजुरी
पूर्ण द्यावी । जेणें मुलेंबाळें सुखें जगवी ।
तैसींच उत्पन्ने वाढवोनि घ्यावीं । गांवामाजीं
॥१०२॥
याने सर्वांस
मिळेल सुख मिटेल जीवनाची भूक ।
ग्रामराज्य होईल सुरेख । आर्थिकतेने समृध्द
॥१०३॥
यास्तव श्रीमंत
शिक्षित हुद्देदार । कलावंत शेतकरी कामगार ।
सर्वांनी मिळोनि ग्रामोध्दार । करावा
ग्रामोद्योगांनी ॥१०४॥
शहराकडे चालला
प्रवाह । तो थांबवाया नि:संदेह ।
सर्वांचा गांवींच
होईल निर्वाह । ऐसी योजना करावी ॥१०५॥
खेडेंचि शहराचें
जनक । शहर भोवतें खेडें उत्पादक ।
शहराकडे न जातां लोक । धावावे उलट खेडयाकडे
॥१०६॥
ऐसी करावी
ग्रामसेवा । हेंचि कर्म आवडे देवा ।
संशय कांही मनीं न धरावा । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री
ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत ।
ग्रामोद्योगांचा कथिला तत्त्वार्थ । अठरावा
अध्याय संपूर्ण ॥१०८॥
अध्याय१८वाऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा