.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

सोमवार, ५ जून, २०१७

अध्याय १ ला देवदर्शन




ॐ नमोजी विश्वचालका ! जगदवंद्या ब्रह्मांडनायका !
एकचि असोनि अनेकां । भासशी विश्वरूपी ॥१॥

आपणचि झाला धराधर । उरला भरोनि महीवर ।
अणुरेणूंतूनी करशी संचार । विश्वनाटक नटावया ॥२॥

आपणचि मंदिर मूर्ति पूजारी । आपणचि पुष्पें होऊनि पूजा करी ।
आपणचि देवरूपें अंतरी । पावे भक्तां ॥३॥

गणेश शारदा आणि सदगुरू । आपणचि भक्तकामकल्पतरू ।
देवदेवता नारद तुंबरू । आपणचि जाहला ॥४॥

नाना चातुर्यकला - व्यापें । आपणचि गाये नाचे आलापे ।
प्रसन्न होऊनि आपणचि सोपें । भक्तिफळ दावी ॥५॥

गुरूशिष्य एकाच स्थळीचे । भिन्न नाहीत पाहतां मुळींचे ।
सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे । रंग रंगणी आणावया ॥६॥

हें जयाचिया अनुभवा आलें । त्याचे जन्ममरणदुःख संपले ।
आत्मस्वरूप मूळचें भलें । ओळखलें म्हणोनिया ॥७॥

त्यासि नाही उरला भ्रम । विश्व आपणासह झाले ब्रह्म ।
तो जे जे करील तें तें कर्म । पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥

तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि । अजूनि नाही जीवाभावांत शिरली ।
म्हणोनीच अज्ञानदशा उरली । आम्हांपाशी ॥९॥

जेव्हां तुझे दर्शन घडे । उघडतीं विशाल ज्ञानाची कवडें ।
मग मी - तूं - पणाचे पोवाडे । कोठचे तेथे ॥१०॥

ज्यासि तुझें दर्शन घडलें । त्यास कैंचे परके राहिले 
सर्व विश्वचि झालें आपुलें । दिव्यपणीं ॥११॥

परि आम्ही वंचित दर्शनासि । परसुखें आनंद कुठला आम्हांसि ?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी । मानतो स्वर्ग ॥१२॥

दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें । दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें । होतें ऐसें ॥१३॥

कष्टासाठी कोणी मरो । प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों । होतें ऐसें ॥१४॥

हें जेव्हां अनुभवा आलें । तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें ।
म्हणोनि तुझ्या नामी वेधलें । चित्त सर्वतोपरी ॥१५॥

दुजा कोणा शरण जावें । तरी सर्वांगीण शक्ति केंवि पावें ?
एकेकाचे चरण धरावे । तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥

उजेडाकरितां काजवे धरावे । भुललिया मार्गी परतों जावें ।
तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावें । निर्भयपणे ॥१७

तारकेवरि दृष्टि धरली । तीचि स्वयें क्षणांत उडाली ।
तैसी गति होईल आमुची भली । विशाल मार्गी ॥१८॥

तूंची खरा निश्चयी अविनाशी । कधीकाळांही न ढळशी ।
सर्व गुणज्ञान तुझेपाशी । हवे ते ते लाभती ॥१९॥

यासीच पाहिजे सूर्यकिरण । अनेक मार्ग दिसती दूरून ।
अनुभवया आपुलें चिंतन । ध्येय - प्राप्तिरूपाने ॥२०॥

सुर्य जैसा नभी उगवला । अंधकाराचा नाश झाला ।
तैसा तूं हृदयीं प्रकटला । जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥

चंद्राचे किरण व्यापलें । चकोरचित्त प्रसन्न झालें ।
तैसे तू आपुलेंसें केलें । मग पळाले ताप सारे ॥२२॥

जोंवरि पंचानन नाही दिसला । तोंवरि अतिगर्व जंबुकाला ।
तैसा तुझा प्रकाश नाही पडला । तोंवरि ग्रासती विकारशत्रु ॥२३॥

                सूर्ये जीवन देता आपुलें । कमल जैसें हसले फुललें ।
तैसें तुझ्या दर्शनानें झाले । कॄपापात्र जीवांचें ॥२४॥

राजहंसें चोंच पुरवितां । पाणीदुधाची होय भिन्नता ।
तैसें तुझें ज्ञान स्पर्शे चित्ता । दोष - निर्दोषता उमगे ॥२५॥

अति काळोखीं वीज कडाडे । दुरावला गडी दृष्टीस पडे।
तैसी तुझ्या दर्शनप्रतापें घडे । शांतिप्राप्ति ॥२६॥

अज्ञानामुळे विकार माजती । अज्ञानेंचि लाभते कुसंगति ।
अज्ञानानेच दुरावते प्राप्ति । सत्यस्वरूप देवाची ॥२७॥

तुझे दर्शन म्हणजे ज्ञान । अंतरंगात आनंदभान ।
वस्तु भरोनी पूर्णपण । तुझ्या ठायी ॥२८॥

म्हणोनी हे ज्ञानसमुद्रा ! पूर्णकलात्मक आत्मचंद्रा !
सर्वांगविकासा स्वर्गमुनींद्रा ! कृपा करी आम्हांवरी ॥२९॥

जीवांचें दारिद्र्य द्याया निवारून । एक तूंचि आहेसि संपन्न ।
म्हणोनी आलों तुझ्या शरण । सर्वज्ञा आदिपुरूषा ॥३०॥ 

होतों तुझेचि परि दुरावलों । ठायींच असोनि भुललो ।
मृगजळास पाणी समजोनि धांवलों । हरिणापरी ॥३१॥

सुकलिया नदीसि पाहूनि । त्रस्त होती पिपासू प्राणी ।
भरतें येतां जाती आनंदूनि । तैसेंचि करी आम्हांसि ॥३२॥

कोवळे अंकुर भूमीवरि फुटले । जेथे मंदशीतल वर्षा चाले ।
त्यापरीच समाधान झालें । आर्त जीवांचें तवकृपें ॥३३॥

ऐसें व्हावयासि करतों प्रार्थना । तन्मय करोनी जीवप्राणा ।
भिन्न उरोंचि नये वाटे मना । व्हावें लवणा - समुद्रापरी ॥३४॥

             यांत असती किती अडथळे । आकुंचित केलें अज्ञान - मळें ।
परि तुझ्या विशालतेचें चिंतन बळें । करील मोकळें आम्हांसि ॥३५॥

आम्ही कितीहि दडलों पडलों तरी । तुझें लक्ष उडत्या घारीपरी ।
निवडोनि काढी अज्ञानाबाहेरी । सुख सर्वतोपरीं द्यावयासि ॥३६॥


भुललिया वत्सा गाय हंबरे । पक्षिणी अंडांभवती फिरे ।
तान्हुल्या माय काम करितांहि सावरे । आपुलेंचि म्हणोनि ॥३७॥

भिंगोटी अळीसि गोंजारी । निज्यध्यासें आपणासमान करी ।
तैसा देव भक्तालागी घरी । साधनजाळें पसरोनि ॥३८॥

ऐसें हें प्रत्यक्षचि घडे । जीव आर्त होतां मार्ग सापडे ।
मार्गे चालतां साक्षात्कार जोडे । व्यापक देवदर्शनाचा ॥३९॥

हें जाणोनि करितों प्रार्थना । पूर्ण व्हावया मानवांची आरधाना ।
विश्वरूप पहाया देवदर्शना । आलों चरणां निर्धारें ॥४०॥

तूं व्यापक सर्वांतरात्मा । सत्यज्ञानानंद निष्कामा ।
तैसेंचि होणें ह्रदयें आम्हां । तरीच होय तुझी भक्ति ॥४१॥

               म्हणोनि आमुची बुध्दि विशाल करी । कर्म करावया भूलोकावरि ।
आयुष्य दे शतक निर्धारीं । जीवों आम्ही विश्वसेवे ॥४२॥

पुण्यक्षेत्र पंढरपुरी । बैसलों असतां चंद्रभागेतिरीं ।
स्फुरूं लागली ऐसी अंतरी । विश्वाकार वॄत्ति ॥४३॥

तेथे दृष्टांत होई अदभूत । कासया करावी विश्वाची मात ?
प्रथम ग्रामगीताचि हातांत । घ्यावी म्हणे ॥४४॥

विश्व ओळखावें आपणावरून । आपणचि विश्वघटक जाण ।
व्यक्तिपासूनि कुटुंब निर्माण । कुटुंबापुढे समाज आपुला ॥४५॥


समाजापुढे ग्राम आहे । ग्रामापुढे देश राहे ।
देश मिळोनि ब्रह्मांड होय । गतीगतीने जवळ तें ॥४६॥

मानवमात्रांचे प्रथम माहेर । आपुलें गांव त्यांतील घर ।
यांतूनि प्रगति करीत सुंदर । पुढें जावे विश्वाच्या ॥४

प्रथम पाया मानव - वर्तन । यास करावें उत्तम करावें जतन ।
गांव करावें सर्वांगपूर्ण । आदर्श चित्र विश्वाचें ॥४८॥

गांव हा विश्वाचा नकाशा । गांवावरून देशाची परीक्षा ।
गांवचि भंगतां अवदशा । येईल देशा ॥४९॥

  आकारें पॄथ्वी असो विशाल । नद्यापर्वतांनी महाप्रबल ।
परि आमुचें गांवचि मूल । घटक विशाल पॄथ्वीचा ॥५०॥

गांवचि जरि उत्तम नसलें । तरि देशाचें भवितव्य ढासळलें ।
ऐसें मानावें जाणत्याने भलें । ह्रदयामाजीं ॥५१॥

          गांवाच्या प्रसन्नतेंत संत प्रसन्न । विश्व प्रसन्न देव प्रसन्न ।
सर्वाआधी मन प्रसन्न । करावयाचे आपुलें ॥५२॥

हें ओळखाया ज्ञान व्हावें । ज्ञान अनुभवासि आणावें ।
मगचि सुख संपादावें । विश्वरूप - दर्शनाचें ॥५३॥

जाणावें ग्राम हेंचि मंदिर । ग्रामांतील जन सर्वेश्वर ।
सेवा हेचि पूजा समग्र । हाचि विचार निवेदावा ॥५४॥


यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ । आचरण - ज्ञान मूळारंभ ।
सक्रियतेचा मूळस्तंभ । उभारावा ॥५५॥

ऐसा ऐकिला मधुर आवाज । भीमेतरी असता सहज ।
तैसाचि वंदिला पंढरीराज । ध्यानरूपाने ॥५६॥

केलें साधुसंतांचें चिंतन । करावया ग्रामाचें पुनर्निर्माण ।
नवीन कांहीच न सांगेन । जुनेंचि देणें देवाचें ॥५७॥

संतमहंतांनी कथन केलें । परि तें पुढे विपर्यस्त झालें ।
मानवा - मानवांत खंड पाडले । पाखंडयांनी ॥५८॥

विशालता गेली मानवांची । रचना केली जातिपंथांची ।
कामाची होती ती कायमची । विभागणी माथीं बैसली ॥५९॥

 
सेवेसाठी पंथ - मंडळ । ते जनाशी वितंडायाचे झाले खेळ ।
असोनि एकचि गोपाळ । लढले जैसे यादवांपरी ॥६०

                
हें व्दैत जावें निघोन । म्हणूनि सेवा आरंभावी आपण ।
ऐसा संकल्प दृढ धरोन । ग्रंथ केला सदभावें ॥६१॥

आपुल्यापरी काम घ्यावे । जैसें जयासि साधेल बरवें ।
उत्तमचि करित जावें । ईश्वरगुरूसि स्मरोनी ॥६२॥

 
वाडःमयी सेवा सेवाचि जाण । जेणें मार्गी लागती जन ।
जन तितुका जनार्दन । जाणूनि कार्य करावें ॥६३॥


 
जें जें आपणासि कळतें । तें तें सांगावे सकळातें ।
आपुलेचि म्हणोनि जन ते । मायबाप ॥६४॥

                          
सांगणाराचि हुशार झाला । ऐकणारा वाया गेला ।
ऐसा समज ज्याने केला। बुडाला तो अहंकारें ॥६५॥
   
  सर्वचि ऐकतील ऐसें नाही। यासि आहे मागील ग्वाही ।
म्हणोनि सेवा खंडों द्यावी । ऐसें नाही उचित ॥६६॥

 आत्मसंतोषाकारणें । विश्वसेवेच्या प्रेरणेने ।
ग्रंथ रचिले सहृदयपणें । थोर जनांनी ॥६७॥

कांही सांगती वेश्वाची कहाणी । कांही बोलती देश लक्षूनि ।
आपण सांगावी ग्रामावरूनि । ग्राम - गीता ॥६८॥

कृष्णगीता रामगीता । हंसगीता हनुमंतगीता ।
शिवगीता अवधूतगीता । कथिल्या कोणीं ॥६९॥

गुरूगीता गणेशगीता । पांडवगीता भगवदगीता ।
देवगीता देवीगीता । सर्व झाल्या ॥ ७०॥

सर्वांचा एकचि सार । शुध्द करावे हॄदय - मंदिर ।
सुखी करावें चराचर । तरिच पावे सदगति ॥७१॥

‘ विश्वब्रम्ह ’ बोलत गेला । सभोंवती समाज दुःखी बुडाला ।
ग्रामसेवाहि न कळे ज्याला । त्याचें ज्ञान व्यर्थचि ॥७२॥

वनीं तीर्थी फिरोनी आला । आपुला गांव नाही सुधारला ।
तो कैसा म्हणावा महाभला । एकटाचि ॥७३॥

  संतांचें ऐसेंचि वचन । आपण तरला तें नव्हे उध्दरण ।
लोकांस लावी सन्मार्ग पूर्ण । तोचि तरला पूर्णपणें ॥७४॥

ठेवोनिया संतांवरि विश्वास । हाचि धरिला मनीं निजध्यास ।
आरंभ केला ग्रामगीतेस । आपुल्यापरी सेवाभावें ॥७५॥

 
माझी मला साक्ष आहे । मी ग्रंथकर्ता विध्दान नोहे ।
परि धान्यराशींत आपुले पोहे । टाकावे वाटती ॥७६॥

देव प्रेमाचा भुकेला । न पाही जातपात अथवा कला ।
साधाभोळाहि उध्दरिला । ऐसा लौकिक तयाचा ॥७७॥

      
देव सौंदर्याचा भोक्ता असता । तरि कुब्जेवरि कां प्रसन्न होता ?
देव जरि वैभवचि इच्छिता । तरि विदुराघरीं कां धावे ॥७८॥

 
देवा कलाकौशल्याचि रूचे । तरि कां वेड पेंध्यावाकुडयाचें ?
मीपण जिरवी ब्रम्हदेवाचें । तेथे पांडित्य काय करी ॥७९॥

ऐसे देवाचे गोडवे । सांगावे तें कमीच पडावें ।
म्हणोनि आपुल्यापरीं चिंतावे । कार्यं करावे भक्तीने ॥८०॥ 

आपुला विश्वास जैशापरी । तैसी करावी चाकरी ।
येथे बोलायची उरी । आहे सर्वांलागोनि ॥८१॥

           
                     आपणासि देवापायी समर्पावें । विश्वी विश्वाकार व्हावें ।
पहावें तैसे बोधीत जावें । जीवांलागी ॥८२॥

ऐसे धरोनी मानसीं । आरंभ केला ग्रामगीतेसि ।
प्रार्थूनिया संतमहंतासि । आशीर्वाद घेतला ॥८३॥

संतमहात्मांचें हृदगत । देवाला शुभ सृष्टिसंकेत ।
विशद कराया सरळभाषेंत सुखसंवाद आरंभिला ॥८४॥

येथे श्रोतीं विचारिलें । ग्रामगीतेप्रति लिहीणे झालें ।
त्यांत संतदेव कासया घातले । स्तुतिस्तोत्रें गौरवूनि ॥८५॥

आपुले गांव उन्नत करावे । सकल लोक हांती घ्यावें ।
यासि देवाचे गोडवे । गावेत कासयासि ॥८६॥

 
काय देव न म्हणतां काम नोहे संता न भजतां वाया जाय ?
आशीर्वाद न घेतां येतो क्षय । सत्कार्यासि ॥८७॥

 
कासयासि मध्यस्थता उगीच देवधर्मांची कथा ।
करवी सर्व आपण गाथा । मारावी माथां देवाच्या ॥८८॥

     
ऐसे देवावरि विश्वासूनि । लोक झालेत दुबळे मनीं ।
गांव भिके लागलें याच गुणीं । सोडा ’ देव देव ’ बोलणे ॥८९॥

तुमचें म्हणणे मीं ऐकलें । लोक पराधीन आळसी झाले ।
परि देवाने ऐसें सांगितले । कोठे आहे ॥९०॥


 
अहो ! देवचि ऐसा नाही झाला । मग सांगेल कैसा इतरांला ?
हा तों विपर्यास केला । भित्र्या आळसी लोकांनी ॥९१॥

 
ज्यासि करणें नको कांही । त्याने द्यावे देवाची ग्वाही ।
आपुलीं पापें लपवावीं सर्वही । पाठीमागे ॥९२॥

लोकांत वाढवावा भ्रम । आपुले चुकवावेत श्रम ।
देवाचिया नामें चालवावें कुकर्म । त्यांनीच समाज बुडविला ॥९३॥

म्हणोनि मी तैसे न सांगेन । येथे जें केलें देवस्मरण ।
तें भित्रे आळसी कराया जन ।नाही जाणा निर्धारें ॥९४॥

 
देव म्हणजे कर्तव्यशूर । न्यायनीतीचें माहेर ।
क्रांतीकार्याचे दिव्य निर्झर । अग्रसर जगामाजीं ॥९५॥

देव म्हणजे अतिमानव । मानवाचा आदर्श गौरव ।
त्यांचे कार्य ध्यानीं राहो । फूर्ति यावया पुढिलांसि ॥९६॥

येथे मुख्य देवाचें व्याख्यान । नाही केलें यथार्थ पूर्ण।
देवासि पुरूषोत्तम समजून । वागा म्हणालों सर्वाना ॥९७॥

मुख्य देवाचें आरंभी स्मरण । त्यांतहि त्याचें एकेक लक्षण ।
तेंच साधकासि व्हावे साधन । म्हणोनिया आठविलें ॥९८॥




चला विशालतेच्या मार्गी । जे गेले ते तरले जगीं ।
भरोनि दिली अंतरंगीं । हीच कीर्ती भाविकांच्या ॥९९॥

 
मित्रहो ! गांव व्हावें स्वयंपूर्ण । सर्व प्रकारें आदर्शवान ।
म्हणोनीच घेतलें आशीर्वचन । पूर्वजांचें ॥१००॥

 
आशीर्वाद म्हणजे त्यांचें वचन । ऐकोनि घ्यावें देऊनि श्रवण ।
त्या फळवावें कार्य करोन । यासि आशीर्वाद बोलती ॥१०१॥

 
लोक थोर आशीर्वाद घेती । परि कार्य थोडेहि न करिती ।
तेणेंचि फजीत पावती । गुलाम दुर्बळ होऊनि ॥१०२॥

 
आमुचें आशीर्वादाचें लक्षण । थोरांनी करावें मार्गदर्शन ।
बोधमार्ग उमगावा आपण । सफल करावा संकल्प ॥१०३॥

 
एरव्ही थोंरानी म्हणावें ’ शतं जीव ’  आम्हीं व्यसनें करावी मॄत्युठेव ।
अभ्यास न करितां ’ बुध्दिमान भव ’  आशीर्वाद कैसे फळे ॥१०४॥

 
अंध दुबळा भाविकपणा । तो कधीहि न रूचे माझ्या मना ।
संतदेवाची निष्क्रिय गर्जना । करील तो अस्तिक नव्हे ॥१०५॥

आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक । चालती आम्हां ऐसे नास्तिक ।
ज्यांचा भाव आहे सम्यक । ’ सुखी व्हावे सर्व ’ म्हणूनि ॥१०६॥

भलेही तो देव न माने । परि सर्वां सुख देऊं जाणे ।
मानवासि मानवाने । पूरक व्हावें म्हणूनिया ॥१०७॥


 ग्रामांतील सर्वजन । होवोत सर्वसुख - संपन्न ।
घेऊं नये कुणाचा प्राण । समाजस्थिती टिकावी ॥१०८॥

 
आम्ही सर्वचि संतुष्ट राहूं । सर्व मिळोनि सर्व खांऊ ।
रांबू सर्व सुखें सेवूं । जें जें असेल तें सगळें ॥१०

आमची संपत्ति नसे आमची । आमची संतती नसे आमची ।
कर्तव्यशक्तीहि नसे आमची । व्यक्तिशः उपभोगार्थ ॥११०॥

हें सारें गांवाचें धन । असो काया वाचा बुध्दि प्राण ।
ऐसें असे जयाचे धोरण । तो नास्तिकहि प्रिय आम्हां ॥१११॥

 
तो तत्त्वतः नास्तिकचि नोहे । जो सर्वांसि सुखविताहे ।
तो ’ देव देव ’ जरी न गाये । तरी देवसेवाचि त्या घडे ॥११२॥

आम्ही देवाचें नांव मध्ये घातलें । परि सर्वांच्या सुखार्थ कार्य केलें ।
कर्तव्यतत्परतेसीच वर्णिलें । जिकडे तिकडे ॥११३॥

लोकांपुढे विशाल ज्ञान । ठेवाया अत्युच्च आदर्श कोण ।
म्हणोनि देवाचें नामाभिधान । घेतलें विशाल भावाने ॥११४॥

आम्ही आपुल्यासाठी मरतो । देव सकळांसाठी कार्य करतो ।
हाचि भाव त्याने स्फुरतो । म्हणोनि धरिला देव चित्तीं ॥११५॥

देव म्हणजे घेवचि नोहे । सर्व कांही देवचि आहे ।
ऐसा ज्याचा संप्रदाय । त्यासि भजूं जीवेंभावें ॥११६॥


अंतिम ध्येय अखंड शांति । अनुभवा यावी जीवाप्रति ।
याचलागी केली स्तुति । साध्यसाधनाची ॥११७॥

जे शांती आणि सत्य । अंगी मुरवोनि झाले कृतकॄत्य ।
तेचि सेवामुर्ति संत स्तुत्य । आदर्शरूपे ॥११८॥

उदारचरित संतसज्जन । मनोभावे तयांसि वंदन ।
जे उपदेशिती ’ जनी जनार्दन ’ । गांव संपन्न करावया ॥११९॥

साधुसंत देवधर्म । मानवोध्दारचि त्यांचें कर्म ।
तेंचि आठवूनि उध्दरूं ग्राम । तुकडया म्हणे ॥१२०॥

 
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र - स्वानुभव संमत ।
देवसंत वंदोनि कथिले ह्रदगत । प्रथम अध्याय संपूर्ण ॥१२१॥





अध्याय  १ ला  ऑडीओ स्वरुपात --



 

।।जय गुरुदेव।।