.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ३१ वा संत-चमत्कार



अध्याय ३१ वा

संत-चमत्कार

 

ईश्वर-भजनाचा करितां प्रचार । होईल आमुचा उध्दार ।

 परंतु जगासि ताराया अपार । सामर्थ्य पाहिजे अंगीं तें ॥१॥

 

तें कार्य संतचि करूं जाणे । जे देवचि झाले जीवेंप्राणें ।

 येरा गबाळांनी केलीं भजनें । तरी काय होतें ॥२॥

 

रामनामें  तरले पाषाण । परि तें लिहिणारेहि तैसेचि पूर्ण ।

 इतरांनी खडा टाकतांहि बुडोन । जाईल आता ॥३॥

 

निर्जीव चालविली भिंत । केले सोन्याचे पर्वत ।

 विषासहि बनविलें अमृत । तेचि खरे शक्तिशाली ॥४॥

 

रेडयामुखीं वदविले वेद । डोहीं कोरडे ठेविले कागद ।

 ऐसे थोर संत प्रसिध्द । विश्व-तारक ॥५॥

 

तेचि आपुल्या भजनें वचनें । जगासि उध्दरितील दयेने ।

 आमुच्या भजनाचें तुणतुणें । फुकेंच सारें ॥६॥

 

संत मायबाप कृपाळ । ’ आपणासारिखे करिती तत्काळ ’ 

 कृपा करितां न लागे वेळ । पतितहि तरावया ॥७॥

 

त्यांचा मंत्र पडतां  कानीं । होय पातकांची हानि ।

 जडजीवहि जाती उध्दरोनि । अन्य भजनी हें करूं न शके ॥८॥

 

ऐसा श्रोतियाचा विचार । म्हणे संत करितील चमत्कार ।

 तरीच तरेल हा संसार । साधन येर वाउगें ॥९॥

 

याचें उत्तर ऐका श्रोते संत जरि चमत्कारें तारिते ।

 तरि कोणीच न उरते । आजवरि बध्द जनीं ॥१०॥

 

कारण संत अपार झाले । ज्यांची देशावरीहि सत्ता चाले ।

 त्या संतांसि सर्वचि आपुले । कां न तारिले दयेने ॥११॥

 

संतांसि ’ सर्वाचेंच बरें व्हावें ’ । ऐसें वाटे जीवेंभावें ।

परि ज्यांनी कर्तव्य करावें । तेचि होती अधिकारी ॥१२॥

 

जनीं कर्तव्य न करितां । संत लाभ न देती आइता ।

 नुसता त्यांचा मंत्र घेतां । मोक्ष होतो म्हणूं नये ॥१३॥

 

संत आपणासारिखे करिती । परिसें सोने केलें लोहाप्रति ।

परंतु खापर सोने नोहे निश्चिती । जाणावें हें तारतम्य ॥१४॥

 

उध्दार करणें हें संतांचें कर्म । परि त्यांत आहे निराळें वर्म ।

 समजोनि घ्यावा शिष्यधर्म । कोणता आपुला ॥१५॥

 

संत जें ज्या कोणां सांगती । तैसेचि जरि ते जन वागती ।

 त्यांचाचि उध्दार होतो जगतीं । ऐसें आहे ॥१६॥

 

उध्दार संत न करिती । मार्ग सांगती जनाप्रति ।

 त्यांच्या बोधवचनें प्रगति । केली पाहिजे साधकें ॥१७॥

 

चोरासि वाटे चतुर निघावे । विषयी म्हणे शौकीन व्हावे ।

 तैसे साधूसि वाटे सज्जन बनावे । लोक आपुले ॥१८॥

 

सर्वचि करिती आपुला प्रचार । तैसाचि साधूचा व्यवहार ।

 कोणता उत्तम कोण अपवित्र । मार्ग जाणावा साधकें ॥१९॥

 

मागे कोणत्या मार्गे जन गेले कोणाच्या प्रचारें कल्याण झालें ?

 कोणें जीवनासि पुढारिलें । कीर्तिरूपें ॥२०॥

 

एक गेला जुगारापायीं । एक मेला बुडोनि विषयीं ।

 एक झाला चोर अन्यायी । गांवगुंड ॥२१॥

 

एक संतापाशी गेला । तोच सन्मार्गी लागोनि तरला ।

 तयाचा उत्तम प्रचार झाला । सर्व लोकीं ॥२२॥

 

ऐसी आहे संतांची संगति । आपण ऐकिल्या होते गति ।

 

पण कर्तव्य केल्यासचि उन्नति । दिसों लागे ॥२३॥

 

संत म्हणती सत्य बोलावें । आपण नेमकें खोटें करावें ।

 बोल शेवटीं संतांवरि ठेवावे । कोण्या न्यायाने ॥२४॥

 

संतांनी सांगावें दुर्गुण सोडा । आपण पापांनी भरावा गाडा ।

कासया सांगावा संत-पोवाडा । ’ उध्दार होतों ’ म्हणोनि ॥२५॥

 

ज्याने संतवचन पाळावें । आपुले दुर्गुण आवरावे ।

 त्यानेच कृपापात्र व्हावें । संताठायीं ॥२६॥

 

कृपा हा संतांचा स्वभाव । वेगळी नाही कृपेची ठेव ।

करावयासि देवघेव । प्रयत्नाविण ॥२७॥

 

एकचि आहे विशेष खूण । संतांच्या वाणींत प्रेमळपण ।

 मनासि लागे आकर्षण । सत्कर्मांचें ॥२८॥

 

त्यांची वागणूक पाहोन । प्रसन्न होतें पाहणाराचें मन ।

 तैसेंचि कर्म करावें आपण । वाटे लोकां ॥२९॥

 

परि ज्याचे वाईट संस्कार । वृत्ति असे बहिरंग फार ।

 त्यासि बोध होणें अति दुर्धर । समजा लोकीं ॥३०॥

 

वृत्ति उत्तम कार्यीं वळे । त्यावरि संताचा बोध मिळे ।

 निश्चय होतां भाग्य उजळे । थोरपणाने ॥३१॥

 

मनुष्य दु:खानें होरपळला । विचारें वैराग्यभावीं वळला ।

 त्यावरि गुरुचा बोध उजळला । मार्ग कळलां भाग्याचा ॥३२॥

 

कोणी समजोनि पाऊल टाकलें । आपुलें सत्कर्मातचि आहे भले ।

 त्याने संतांचे चरण धरिले । तेहि तरले भाग्यशाली ॥३३॥

 

ऐसें ज्याने साधन केलें । संतवचनासि प्रतिपाळिलें ।

 त्याचें कौतुक कितीहि वानिलें । तरी तें अपुरें ॥३४॥

 

संताचा शुध्द संकल्प । त्यासि कळला प्रगटला दीप ।

 धरोनि निश्चायाचा प्रताप । उन्नत झाला सतशिष्य ॥३५॥

 

शेतीची जमीन झाली उत्तम । त्यावरि बीं पडलें सक्षम ।

 वाढलें कुटुंबियांचेहि प्रेम । वाढतां पीक ॥३६॥

 

तैसेंचि साधकाचें होतें । प्रथम शुध्दाचरण शुध्दचित्तें ।

 वरि संतबोध होतां तेथे । पीक वाढे भक्तीचें ॥३७॥

 

ऐसें ज्याने सिंचन केलें । अंकुर फुटले वाढों लागले ।

 अनुभवाचें फळ आलें । संतकृपाकटाक्षें ॥३८॥

 

परंतु ऐसी सांडोनि रीति । उगीच बुवांच्या पायां पडती ।

 त्यानेच सर्व होतें समजती । अंतरीं लोक आपुल्या ॥३९॥

 

पायां पडल्याने सर्व होतें । मग काम कासया करावें तें ?

 पोटासि मिळेल आइतें । मोक्ष लाभेल बुवापायीं ॥४०॥

 

चुकीची ही धारणा अति । ऐसी नव्हती याची रीति ।

 नम्र व्हावें सर्वांभूतीं । ऐसा सिध्दान्त आहे याचा ॥४१॥

 

सर्वांनीं सर्वांसि नम्र व्हावें । आपलें हितगुज विचारावें ।

थोरांनी लहानांसि सांगावें । कर्तव्य म्हणोनि ॥४२॥

 

परि लाखो लोकांनी पयांवरि पडावें । थोर सांगती तें न करावें ।

हें अजबचि घेतलें स्वभावें । भाविकांच्या ॥४३॥

 

ही प्रथाचि बंद करावी । श्रवणीं रुचि वाढवावी ।

 मनन करोनि आचरावी । वाणीं संता-थोरांची ॥४४॥

 

यानेच संतपण वाढ घेई । संतसंगें संतचि होई ।

 परि ’ संत ’ म्हणतां संसार सोडूनि जाई । ऐसें नव्हे ॥४५॥

 

संसारीं असोनि संत असती । व्यवहारीं राहोनि आदर्श होती ।

 बुवा न म्हणवितांहि अधिकार ठेविती । सदगुरुचा ॥४६॥

 

ऐसें आहे संतपण । तें मिळे सत्संगें करोनि साधन ।

नसे अंगीं विचित्रपण । कोणतेंहि तयांच्या ॥४७॥

 

पावडीमाजी पाय ठेवितां । दावा म्हणे ब्रह्मसत्ता ।

 त्या जयत्पालराजासि तारिलें तत्त्वता । शेवटीं ग्रंथचि बोधूनि ॥४८॥

 

करोनिया चमत्कार । संत न करिती उध्दार ।

 हाचि मनीं राखा निर्धार । बोधचि सार तयांचा ॥४९॥

 

चमत्काराच्या भरीं भरोनि । झाली अनेकांची धुळधाणी ।

संतचमत्कार यापुढे कोणी । नका वर्णू सज्जन हो ! ॥५०॥

 

यावरि श्रोता प्रश्न करी । काय संत नव्हती चमत्कारी 

आम्हीं प्रत्यक्ष पाहिलें तरी । कां न लोकां सांगावें ॥५१॥

 

एकाने नालींतील घाण फेकली । ती अत्तरसुगंधें घमघमाटली ।

एकाने मुठीमधूनि काढिली । खडीसाखर प्रत्यक्ष ॥५२॥

 

एकाने कटोरींतूनि पंगती वाढल्या ।

 श्रोतियानेत्रीं धारा काढल्या एकाने घडयाळीच बंद केल्या । सर्व गांवाच्या ॥५३॥

 

मित्रा ! त्वां पाहिलें साच । परि हा आभास मिथ्याच ।

 संताचें हें लक्षण नव्हेच । कोणत्याहिकदाकाळीं ॥५४॥

 

हे सर्व संतांघरचे क्षुद्र खेळ । कोणी मानितील यांस सबळ ।

 तरि ते मुकतील प्रांजळ । सेवाव्रत महत्त्वाचें ॥५५॥

 

लटिकें अदृश्य तें आणावें । कांही लोकांस जेवूं घालावें ।

 आणि आणिलें तेथे खळगे पाडावे । हें दिसे त्या नवल कैसें ॥५६॥

 

कोणी कीर्तिस्तव दान करी । पैसे मिळवोनि काळयाबाजारीं ।

 तैसे दुसरीकडोनि आणोनि भरी । वस्तु अदृश्य ॥५७॥

 

एकाचे खिसे कापावे । दुसर्‍यास म्हणे दान घ्यावें ।

 तैसेंच चमत्कारलाघव आघवें । समजावें हें ॥५८॥

 

कोणी गुरुची सेवा करी । जीवन वाही चमत्कारावरि ।

 अडक्याचें साधन साधूनि झुगारी । आयुष्यरत्न ॥५९॥

 

पैसा देवोनि नांवेंतूनि जावें । तेथे तपाने पाण्यावरि चालावें ।

 शेवटीं अहंकारें भ्रष्ट व्हावें । यांत थोरवी कशाची ॥६०॥

 

परि हें जनासि कळेना । संतांपासूनि इच्छा नाना ।

 करिती देवोनि दानदक्षिणा । लोभासाठी ॥६१॥

 

लोकांचिया या ओळखोनि भावा । अनेक दांभिक येती गांवां ।

 लुटती जनासि ढोंगी बुवा । मागे लावोनिया ॥६२॥

 

ही बुवाबाजी भुलवी जना । भ्रष्ट करी ग्रामजीवना ।

फसवोनि भोळया-बापडयांना । भलत्या छंदा लाविती ॥६३॥

 

कांही देती शेतीधन । मग पाहती मागे फिरोन ।

 हें तंव आहे वेडेपण । आपुल्या स्वार्थांधतेचें ॥६४॥

 

कांही वर्गणी करोनि गोळा । गांवीं करिती भक्ति-सोहळा ।

 भिकारी करोनि स्त्रियाबाळां । ठेविती कोणी ॥६५॥

 

प्रयत्नांचा मार्ग सोडिती । अल्पायासें लाभ इच्छिती ।

 चमत्कारांच्या थापेंत जाती । गारूडियांच्या ॥६६॥

 

लोक चमत्कारावरि भुलती । मागाहूनि पश्चात्ताप करिती ।

 कांही भुरळ पाडली म्हणती । आम्हांवरि ॥६७॥

 

वास्तविक संत नव्हे जादुगार । करावया चमत्कार ।

 हा तों चालत आहे व्यवहार । पोटभर्‍यांचा ॥६८॥

 

चमत्कार तेथे नमस्कार । तेणें जादुगिरीस चढे पूर ।

खर्‍या संतांस ओळखीना नर । चमत्काराअभावीं ॥६९॥

 

याच भ्रांतीने भुलोनि । ’ संत आले गांवीं भुवनीं ।

परि पाप न गेलें धुवोनि ’ । म्हणती जन यापरी ॥७०॥

 

कोणी म्हणती घेतलें दर्शन । परि न झालें रोग-निवारण ।

 कोणी म्हणती नाही संतान । दिलें संतांनी आम्हांसि ॥७१॥

 

कोणी म्हणती मंत्र घेतला । परि उध्दारचि नाही झाला ।

 दु:खचि जाळी अजूनि मनाला । अहोरात्र आमुच्या ॥७२॥

 

कोणी म्हणती घेतलें दर्शन । परि नाही मिळालें आम्हां धन ।

कोणी म्हणती नोकरी लावून । द्यावी संतीं आम्हांसि ॥७३॥

 

कोणी म्हणती मुलगी वाढली । संताने सोयरीक नाही जुळवली ।

कोणी म्हणती गेलों पायवणी घेतली । परि ताप न गेला आमुचा ॥७४॥

 

कोणी म्हणती गेलों दर्शनासि । परि आठ दिवसांचा आहे उपाशी ।

 सट्टा नाही दिला आम्हांसि । साधुसंताने एकहि ॥७५॥

 

कोणी म्हणे दर्शन घेतलें । परि चोर तुरुंगांतूनि नाही सुटले ।

 चोरी केली म्हणोनि काय झालें । दर्शन घेतां मुक्त व्हावें ॥७६॥

 

कोणी म्हणती संत घरीं आले । आमुचें पाहिजे भाग्य उघडलें ।

 कर्तव्य न करितांहि राज्य भेटलें । पाहिजे आम्हां ॥७७॥

 

कर्तव्य करितां सर्व होतें । मग संतदर्शन काय करावें तें ?

 संताने कर्महीनासि द्यावें आइतें । आणूनिया ॥७८॥

 

तुम्ही म्हणतां संत दयाळ । आमुचें वेडें झालें बाळ ।

त्याने कृपा करोनि तत्काळ । बरें करावें ॥७९॥

 

आम्ही जरी असलों पापी । त्याने संकल्प करावा सुखरूपी ।

आम्हांस न कळतां उपदव्यापी । मिटवाव्या तेणें ॥८०॥

 

संताने मंत्र देताक्षणीं । आम्हांसि न्यावें उध्दरोनि ।

 पाहूं नये अधिकार पडताळोनि । आमुचा त्यानें ॥८१॥

 

तरीच त्यास संत म्हणावें । नाहीतरि त्या ढोंगी गणावें ।

 आम्ही बोलतों हे चूक मानावें । कोण्या कारणें ॥८२॥

 

ऐसें जनाचें म्हणणें चाले । परि सांगा ऐसें कोठे झालें ?

 कोणत्या संताने केलें । सुखी समृध्द सर्वांलागी ॥८३॥

 

याचा विचार न करिती । चमत्कारासाठी मरमरती ।

 काय संतांपाशी आहे भेदवृत्ति । इतरां शांति न द्याया ॥८४॥

 

साधुसंतचि मूल देती । तरि कां वांझ जगीं राहती 

संत धनवैभव अर्पिती । तरि भिकारी न दिसावे ॥८५॥

 

संत बिमारी बसविती । मग बुवांचेहि कां प्राण जाती 

जगीं कोणीच ना मरती । ऐसें कां होऊं नये ॥८६॥

 

संतांचा मंत्र कानीं पडे । उघडती मोक्षाचीं कवाडें ।

 मग ऐसें कां न घडे । सर्व लोकीं सर्रास ॥८७॥

 

त्यांच्या संकल्पेंचि सर्व होतें । तरि दु:खी कोणीहि न राहतें ।

 काय तुम्हांविषयींच दुजाभाव ते । करिते कांही ॥८८॥

 

जरि म्हणाला आमुच्या नशिबीं नाही । तरि प्रारब्धचि प्रधान होई ।

 मग संतचमत्काराची राही । महिमा कोठे ॥८९॥

 

संत आपुल्यापरी झटोनि । सौख्य देती सर्वजनीं ।

सफलता त्यांच्या कार्यी बहुगुणी । परि तो नव्हे चमत्कार ॥९०॥

 

संतांच्या शुध्द हृदयांतूनि । अनुभवा येई निघाली वाणी ।

परि त्याचीहि कल्पना त्यांनी । केली नाही चमत्कारें ॥९१॥

 

मुंगीसि हत्तीचे ओझें जैसें । वाटे नवलाचें भलतिसें ।

 परि तें सहज घडे शक्तिविकासें । संतकार्य तैसें वाटे जना ॥९२॥

 

त्यासि चमत्कार मानलिया । लोक विसरती कर्तव्यपाया ।

भजों लागती सकामपणें तयां । आंधळया भावें निष्क्रिय ॥९३॥

 

म्हणोनि महत्त्व नको चमत्कारा । शोधावी सत्कार्य-परंपरा ।

 ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा झरा । घ्यावा संत-जीवनांतूनि ॥९४॥

 

वस्तुत: मार्गदर्शनचि कार्य संतांचें । पुत्रधन देणें नव्हे साचें ।

 बिमारी बसविणें हें वैद्याचें । काम आहे सर्वथा ॥९५॥

 

संत अज्ञानरोगाचे वैद्य । जीवनविकासाचे सर्वाद्य ।

 शुध्द कर्मांनी असती वंद्य । तिन्ही लोकीं ॥९६॥

 

त्यांचा एकचि चमत्कार । अल्पज्ञ जीव केला । विश्वाकार ।

सर्वांभूतीं देखिला ईश्वर । ठायीं ठीयीं याच डोळां ॥९७॥

 

त्यांचें तेंवढें करणें जाणणें । या चमत्कारापुढे आकाश ठेंगणे ।

 तेथे कोण पुसतो तुणतुणें । क्षुद्र सिध्दीचें वाजतांहि ॥९८॥

 

संत सेवेचे अवतार । सर्वांभूतीं नम्रसत्य व्यवहार ।

 तयांसि देवहि मानी थोर । अन्य चमत्कार कासया ॥९९॥

 

साधूचा सरळ प्रेमळपणा । हा या जगीं चमत्कारचि जाणा ।

 त्याने ’ अन्यहि मीच ’ म्हणावें आपणा । हा चमत्कार केवढा ! ॥१००॥

 

अहो ! सर्वांत मोठा चमत्कार । तो मानी ’ विश्वचि माझें घर ’ 

 त्यासाठी कष्टतो अहोरात्र । जीवें फार उल्हासें ॥१०१॥

 

उणें दिसे तें पूर्ण करी । जगाचा तोल बोधें सावरी ।

 परंतु केल्याचा स्पर्शचि नसे अंतरीं । चमत्कारी संत ऐसे ॥१०२॥

 

मात्र संतचि सर्व कांही करी । आणि कर्तव्यचि नाही माणसावरि ।

 ऐसी संतांची एकांगी थोरी । गाती तें नोहे उचित ॥१०३॥

 

ऐसें गांवीं होऊं न द्यावें । जनासि सत्य ज्ञान कळावें ।

 खर्‍या संतांसि ओळखावें । कर्तव्यासाठी ॥१०४॥

 

संतांचे विचित्र व्यवहार । तैसेचि त्यांचे चमत्कार ।

हें वगळोनि दावावा सत्य सार । ग्रामीण जनासि ॥१०५॥

 

आपुला आपण उध्दार करावा । संतदेवांचा सहारा घ्यावा ।

हाचि संतग्रंथांचा गवगवा । चित्तीं धरावा सर्वांनी ॥१०६॥

 

यांतचि गांवाचें कल्याण । निघोनि जाईल दुबळेपण ।

कर्तव्य आपुलें जाणतील जन । तुकडया म्हणे करा ऐसें ॥१०७॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।

 संत-सामर्थ्य कथिलें येथ । एकतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥



अध्याय ३१ वाऑडीओ स्वरुपात --



 

 

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

Casinos in the UK - How to find good games - GrizzGo
So, www.jtmhub.com what https://deccasino.com/review/merit-casino/ do we mean by “casinos in gri-go.com the UK”? to find a casino and https://septcasino.com/review/merit-casino/ live casino games on a mobile phone device https://febcasino.com/review/merit-casino/ in 2021.

।।जय गुरुदेव।।