.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

शुक्रवार, ९ जून, २०१७

भजन २



   मना रे ! ध्यास धर हरिचा, विसरुनी लक्ष्य विषयाचे ॥धृ॥
 प्रपंची कोण सुखि झाला ? न दिसला, एकिला ऎसा ।
जयाने राम वश केला, वंदिती पाय जन त्याचे ॥१॥
विषय हे नाडिती देहा, नि आयूही फुकी धाडी ।
प्रभु-सुख घे जीवी धरुनी, न भय मग जन्म-मरणाचे ॥२॥
 म्हणे तुकड्या धरी नेमा, स्मराया श्रीहरी-नामा ।
 नामची नेइ निजधामा, न इतरे कोणि कामाचे ॥३॥

·         मना रे ! नाम जप हरिचे, सुखाचे घोस लाभाया ।
भटकशी कां विषय-मार्गी ? अधिकसे दुःख भोगाया ॥धृ॥
 कुणी सत् प्रेम धरुनीया, हरीच्या ध्यानि रत होती ।
मिळे साम्राज्य मोक्षाचे, परी ना सोडि हरि-पाया ॥१॥
भक्तिच्या सुख-स्वातंत्र्यी, मोक्षही तुच्छ संतासी ।
अनुभवा घेउनी पाहे, भजुनिया पंढरीराया ॥२॥
 म्हणे तुकड्या ऊठ वेगे, साध सत्संगती आधी ।
 प्राप्त कर मार्ग प्रेमाचा. दुरावुनि संशयी माया ॥३॥

·         मना वाटे, हरी ध्यावा कि गुरुचे पाय वंदावे ?
 कोण ते श्रेष्ठ जाणोनी, शरण आधी कुणा जावे ? ॥धृ॥
 प्रभू हा बोलिला शास्त्री, 'शरण जा माझिया भक्ता'
 देव आणि भक्त हे दोघे द्वैत हे केवि मानावे ? ॥१॥
भिन्न मानू नये त्यांना, जये प्रभु दाविला सत्ते ।
धन्यता संतसेवेची, किती उपकार वानावे ? ॥२॥
देव मानी तया भक्ता, भक्त देवा सदा ध्याती ।
 कळेना गुह्य हे त्यांचे, कुणा सरसावुनी घ्यावे ? ॥३॥
निभविली आस तुकड्याची, गुरूने देव दावोनी ।
तया मी श्रेष्ठ मानावे, मने हे घेतले भावे ॥४॥



·         मराठे शूर-वीरांनो ! निकामा स्वस्थ का बसला ?
धैर्यबल खोवुनी सगळे, भिकारी दास कां झाला ? ॥धृ॥
बघा इतिहास थोडासा, आपुल्या वाडवडिलांचा ।
शिवाजी 'शिवबा' म्हणवताना, रायगडि छत्रपति झाला ॥१॥
कधी शिवला न भीतीला, रंगला राजनीतीला ।
 म्हणे 'दंडीन दुष्टाला, वाकविन थोर जरि असला' ॥२॥
गर्जला सिंह जणु धावे, मिळविला तोरणा किल्ला ।
 राष्ट्रीचे दास्य खंडुनी, सुखी केले जना सकला ॥३॥
 शोभते का तुम्हा ऎसे, तयाचे वंश म्हणवोनी ?
प्राण द्या राष्ट्र-सेवेला, भितीने भ्याड का झाला ? ॥४॥
अहो ! मरणे अणी जगणे, दोन्हिही सारखे अपणा ।
 ती तुकड्यादास सांगतसे, चमकुनी प्राण द्या अपुला ॥५॥

·         मशि बोल तरी बोल जरा, रुक्मिणी-वरा !
मन रंगु दे पदरी घे सख्या ! दीन-उध्दरा ! ॥धृ॥
 भव-दुःख हे अती कठीण, पार ना मिळे ।
तव भक्तिसुखे चित्त सख्या ! सुखवु दे वरा ॥१॥
अति ज्वाल षडविकार महा, अग्निच्य परी ।
 मज ओढतील क्षण न तुझी, दृष्टि श्रीधरा ! ॥२॥
जनि पाहता तुझ्याविणे, नच शांति ये जिवा ।
 बघु सांग तरी काय कुठे, कुणाचिया घरा ? ॥३॥
 नच तीर्थ शांति दे, न मंदिरे, मढी कुणी ।
तुकड्याचि हाक घेइ, भेटि देइ पामरा ॥४॥

·         मशि बोल सख्या घननीळा रे ! ॥धृ॥
 तव बोले मन उन्मत होते, लागे निजरुपि डोळा रे ! ॥१॥
 निर्मळ रुप तव विमल सुदर्शन, दूर करी कळिकळा रे ! ॥२॥
 मोरमुकुट पीतांबर शोभे, गळा वैजयंति माळा रे ! ॥३॥
 तुकड्यादास म्हणे तव बोले, नाशे विषय-उमाळा रे ! ॥४॥


·         या या रे सकळ गडी ! 'कृष्ण कृष्ण' गाऊ ॥धृ॥
 कुंजवनी यमुनेतिरि, वाट पाहतो श्रीहरि ।
 जाउ धावु पाहु तया, रंगि रंग लावू ॥१॥
 बहु जमले धेनुपाळ, वाटतसे दिव्य माळ ।
 कापतसे दुरुनि काळ, त्या रुपास पाहू ॥२॥
 मोरमुकुट सुंदरसा, कटि पीतांबर सरसा ।
बंसरिच्या नाद-रसा, तल्लिन मनि राहू ॥३॥
 रामरंग अमित संग, प्रभुची महिमा अभंग ।
 तुकड्या म्हणे देहभाव, कृष्ण-पदी वाहू ॥४॥

·         ये बोल बोल रे कन्हैया !
बोल एकदा । अंतरिचा भेद सख्या ! खोल एकदा ॥धृ॥
तुज भेटण्यास माझा, जीव भुकेला ।
दुःख हे अती विरहे, सांगु कुणाला ?
 मनी डोल डोल रे कन्हैया ! बोल एकदा ॥१॥
 कोणि ना तुझ्याविण या, प्रेमि जिवाचा ।
न्याहाळुनि पहा अमुच्या, भाव मनाचा ।
बोल एकदा तरि ते ! बोल एकदा ॥२॥
संसार तुझ्या नामे, सोडला हरी ! ।
 सौभाग्य तुझे ल्यावे, ही आस अंतरी ।
 तुकड्याची हाक घे कन्हैया ! बोल एकदा ॥३॥

·         येइ रे भोळिया ! भेट झडकरी ।
 पाहु दे डोळिया मूर्ति गोजिरी ॥धृ॥
 कुंजविहारी ! गिरिवरधारी !
मनमोहन ! राधा-मनहारी ! ॥भोळिया ! ० ॥१॥
 या भवधारी, मन दुःखारी ।
तुजविण कोण दुजा कैवारी ? ॥॥भोळिया ! ० ॥२॥
मधुर बासरी, ऎकवि तारी ।
तुकड्यादासा आज निवारी ॥भोळिया ! ० ॥३॥

·         येउ दे दया, दया माय गंगे ! दाटला कंठ चंद्रभागे ॥धृ॥
 नसे अधिकार, तव गुण गायासी, कितिक मम अंत सखे ! पाहशी ?
जन्म लाधला, लाधला असे पापी, दूर झालो गे ! तव, तापी ! ॥१॥
 झरा प्रेमाचा, प्रपंच-ध्वनि रतला, गुंग आसक्तपणी सुतला ।
 दृष्टि सामोरी, सामोरी करि माते ! घेइ दासासी निज हाते ॥२॥
कुणावर घालू, ओझे शरिराचे ?, कोण भागिदार दैवाचे ?
 प्रसवली कशी, उदरी आम्हाते ? घेइ गे ! पदरी मज माते ! ॥३॥
 दृष्टि फिरवूनी, जाळि कटाक्षासी, चाखवी निज-आनंदासी ।
दास तुकड्या हा, जगपाशे श्रमला, संग निःसंग भवी गमला ॥४॥

·         येशिल ना शेवती तू, गुरुराया ! धावुनी ।
 जव नेती ओढुनीया, मम प्राणा काढुनी ॥धृ॥
मरण्याचे संकटाला, नच कोणी आपुले ।
 देशिल ना साथ तै तू, शिरि धरुनी कर भले ॥१॥
जन म्हणती-'लवकरी या, काढा ना आतुनी'
मग रचती ना चिता या, देहासी निजवुनी ॥२॥
 कुणि म्हणती-'ठीक झाले, काळाने ओढला'
म्हणशील ना-'मीच नेला, माझा हा तान्हुला' ॥३॥
 तुकड्याची प्रेम-भक्ती, भोळी चहुबाजुंनी ।
परि अंती ध्यान लागो, तव स्मरणी रंगुनी ॥४॥


·         रक्षि रक्षि सद्गुरूमाय ! मज कोणि दुजा नाही ।
जाइल वाया तुजविण काया, फसलो भवडोही ॥धृ॥
 त्रैतापाचा अग्नि लागला, पडलो त्यामाजी ।
 काम-क्रोध-मद-मत्सर वैरी, खाती मज आजी ॥१॥
 स्पर्श-रूप-गंधादिक जमले, शरिरी भय भारी ।
 त्या माजी मन चंचल झाले, बुडवी भवधारी ॥२॥
 आयुष्याची दोरी, यमाजी-उंदिर तोड करी ।
झुरणी पडले वय हे सारे, ये सखये ! तारी ॥३॥
ऎशा या पाशातुनि सुटका, कशि होइल माते ! ।
 तुकड्यादासा मुक्त करी, ने पदपंकजपंथे ॥४॥

·         रमला हरि कुंजवनी सखये ! हुरहुर जिवा अति वाटतसे ॥धृ॥
 किति वेळ असा राहील तिथे ? सांगा तरि जाउनिया हरिला ।
कुणि मोहिल काय झणी सगुणा ? अग ! दुःख असे उरि दाटतसे ॥१॥
किति गोड तयाची बंसि सये ! पशुपक्षि-जिवा रमवी विपिनी ।
 मनमोहन-बंसि हरील कुणी, मम चित्त कसे होईल पिसे ॥२॥
शिरि मोर-पिसारा सुंदरसा, योगी बघती हृदयात जसा ।
कुणि काढिल काय हळूंच असा ? नेत्रातचि ते रुप साठतसे ॥३॥
 चल जाउ झणी बघण्या मिळुनी, दहापाच जणी अति एकहुनी ।
तुकड्या म्हणे भाग्य खुलेल गडे, हरिच्या विरहे जिव फाटतसे ॥४॥

·         रमले मन पंढरीराज पदी, न सुटेचि अता हा मोह जिवा ॥धृ॥
 किती निर्मल कोमल पाउल रे, पाहताचि तनूचि सुध भुलते ।
 डुलते जणु रूप विटे खुलते, फुलते फलते उरि रंग नवा ॥१॥
कटि साजे पितांबर सुंदरसा, जरदार जसा कनकासरिसा ।
 शोभे जणु कौस्तुभ चंद्र जसा, फुलला उरि मंजरि-हार नवा ॥२॥
 मकरकृति कुंडल हालतसे, शिरि रत्नमुकुट वरि मोर-पिसे ।
बघताचि विटेवर ध्यान असे, मन सोडुनि दे बहिरंग हवा ॥३॥
 जणु सगुणरुपे परब्रह्मचि हे, पहायास सदा जिव ये अणि ये ।
तुकड्या म्हणे वाटे सोडु नये, तमनाशक हा किति गोड दिवा ॥४॥

·         रमशील ना हरी ! तू भक्तिच्या सुमंदिरी ।
तुज कमल-दली, नेत्रांजलि, न्हाणि अंतरी ॥धृ॥
 ही भाव-भक्तिची सुमने, माळ वाहि मी ।
 बहु सत्वशील वृत्ति तुझ्या, पाऊली धरी ॥१॥
 पद-पूजना करूनि, दीप 'सोहं' जाळुनी ।
तुज वरुनि फिरविताच 'मी-तू' भाव हा हरी ॥२॥
 हे उरु न देइ देह-धर्म, आपुलेपणा ।
 तुकड्याचि हाक घे सख्या ! ही आस कर पुरी ॥३॥



·         रामतीर्थ अति रम्य ठिकाणी, गेलो मिळुनिया ।
रामेश्वर लिंगाचे दर्शन, झाले नेत्रा या ॥धृ॥
अती पुरातन भव्य स्थान हे, हेमाडी बांधी ।
नखशिखांत कोरुनी बसविला, सामोरी नंदी ॥१॥
सुंदर मनकर्णिका जलाने, भरली अति गोड ।
 गमे जणू ही काशिच दुसरी, कोरियला पहाड ॥२॥
 रूप मनोहर सांळुकेवरि, रामेश्वर लिंग ।
 वेद-गर्जना, धार जलाची चालतसे चांग ॥३॥
सदा सोवळा हा शिए भोळा, अलंकार यासी ।
काशीमध्ये भस्म लावतो, उलट रीत इथची ॥४॥
 उष्ण जले अभ्यंग स्नाने, बघली मी त्याची ।
अति श्रृंगार चढे अंगावर, शोभा बहु साची ॥५॥
घननन घननन वाजति घंटे, गर्जतसे भेरी ।
द्वारि चौघडा वाजंत्रेही, वाजे अति प्यारी ॥६॥
तल्लिन मन झाले बघताना, कृतार्थ जिव झाला ।
 तुकड्यादास म्हणे दर्शनि हा, तारी सकलाला ॥७॥





·         राहु दे, मन हे तुझ्या पदि राहु दे ।
भेद सगळे जाउ दे, तव रूप निर्मळ पाहु दे ॥धृ॥
 आस नाही दुसरी, हा जन्म सगळा वाहता ।
 होउ दे सेवा प्रभू ! या नश्वरा देहे अता ॥१॥
 कोण नेइल संपदा ही, अंतकाळी बांधुनी ?
 राहतिल हे जगि सारे, विषयसुख दिसते जनी ॥२॥
दास तुकड्या वांच्छितो, विसरू नको गरिबा हरी !
दीन आम्ही तव पायिची, या बालकासी सावरी ॥३॥

·         वाजवी प्रभु ! गोड वेणू वाजवी ।
 मोहिनी या बंसिची हृदयास लागू दे चवी ॥धृ॥
चित्त हे झुरते सदा, ती मधुर बंसी ऎकण्या।
काढ हा पट आडवा, मन लागु दे रुप पाहण्या॥१॥
 श्यामसुंदर कटि पितांबर, मूर्ति चिमणी साजिरी ।
कुंजवनिच्या गोपिकांना, तारिशी तू निर्भरी ॥२॥
दास तुकड्या प्रेमयोगी, बंसरी द्या मागता ।
ना हवे मग दुसरे मज, गंधही त्या स्वर्गिचा ॥३॥

·         वाहते किति सौम्य तू, तुज शांतता कोणी दिली ?
द्रोह ना तव अंतरी, गंभीर वृत्ती शोभली ॥धृ॥
 कोटियांचे पाप वाहता, शीण ना तुजसी जरा ।
 मुक्त करिशी पूर्वजाते, स्वर्गिची जणु माउली ॥१॥
 शुध्द किति तव प्रेम गंगे ! ना कुणासी मागशी ।
 जगविशी हे विश्व सारे, सोडुनी झरणे खुली ॥२॥
 भाग्य किति तरी थोर त्यांचे, जे तुझ्या तटि राहती ।
 ईश्वराच्या पूजना, जणु तूच त्यांची वाटुली ॥३॥
निर्मिली वेली-जुळे, तट साजिरा करवूनिया ।
शालु हा जणु नेसुनी, प्रिय भक्त पाहण्या चालली ॥४॥
दास तुकड्या चिंतितो, तुज भेटण्यासी एकदा ।
 उघडुनी पट भेट दे गे ! धन्यता मज लाधली ॥५॥


·         शिकविते ज्ञान का गीता, बना हो सर्व संन्यासी ?
सोडुनी धर्म हे सारे, घरामधि झोप घ्या खाशी ॥धृ॥
 वाहवा ! अर्थ करणारे, आणि लोकांसि वदणारे ।
 भ्याडपण लावुनी सारे, राष्ट्र हे लावले फाशी ॥१॥
वीरांना भक्ति लावूनी, टाळ देऊनिया हाती ।
पिटविले टाळके त्यांचे, बनवुनी दास आणि दासी ॥२॥
अर्थ या भक्ति-ज्ञानाचा, असा नाहीच कोठेही ।
मेलियापरि जगी रहावे, वाढवोनी उरी खासी ॥३॥
 गिता हे सांगते सर्वा, 'लढा अन्याय-प्रतिकारा,
 'प्रभू हा साथ दे सर्वा, धर्म हा श्रेष्ठ सर्वासी' ॥४॥
म्हणे तुकड्या 'अहंकारा न धरता मर्द व्हा सारे ।
 गाजवा धर्म सत्याचा, जगाचा भारतीयासी' ॥५॥


·         श्रीगुरुराज धरि हृदयी, भय हरेल या संसाराचे ॥धृ॥
 भ्रम-बाजारी जीव धडपडे, काहि कळेना मार्ग तया ।
 सत्-संगतिचा लाभ मिळे जव, होइ ज्ञान उध्दाराचे ॥१॥
कठिण प्रसंगचि ओढवती तव, वाढत चिंतारोग सदा ।
 ज्ञान होय जव श्रीगुरु-बोधे, पाश जळति कुविचारांचे ॥२॥
अन्य नसे कुणि मार्ग जगी या, मोक्षपदाला जायासी ।
सत्संगतिने कळते, वळते, पट उघडति हरि-द्वाराचे ॥३॥
तुकड्यादास म्हणे निर्भय हो, जाउनिया गुरु-चरणाशी ।
ओळख 'मी तो कोण, कोठचा ?', मार्ग कळति सुविचारांचे ॥४॥

·         श्रीहरिच्या प्रेमळांनो ! घ्या पदरी बालका ।
जरि पापी भ्रष्ट कर्मी, अज्ञानी होइ का ॥धृ॥
 प्रभु तुमच्या ओळखीने, दीनासी भेटतो ।
तुमचीया एक बोले, कार्यासी कष्टतो ॥१॥
अति चिंता लागलीसे, जिवाभावापासुनी ।
 प्रभु भेटो, रूप दावो, ही आशा मन्मनी ॥२॥
 नच डोळे त्याविना हे, राहताती शांतसे ।
तुकड्याची हाक घ्या हो ! मज काही ना सुचे ॥३॥

·         श्रीहरि-ध्यान धरि हृदयी, जा जिवा ! सुखद हा मार्ग तुला ॥धृ॥
 सांगति संत-महंत सदा हे, शास्त्र-पुराण-श्रृती-वचने ।
'नामजपाविण शांति न लाभे. धर धावुनिया पदयुगुला' ॥१॥
योगयागविधि कठिण तपस्या, साधति काय कुणास अता ?
 चंचल मन हे फिरतचि राहे, भृंग जसा घे मोद फुला ॥२॥
तुकड्यादास म्हणे हो पावन, नामस्मरण करुनि भावे ।
 वेळ पुन्हा ही न मिळे ऎसी, साधुनि घे हा जन्म भला ॥३॥


·         श्रीहरी भेटवा कोणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥धृ॥
 त्या पहाया नेत्र भुकेने, कर्ण हे तीक्ष्ण किति झाले ।
 जिव जरा उरी ना मानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥१॥
 ह्या सुंदर वृक्षाखाली, मी पाहिन तो वनमाळी ।
सांगेन जिवाचि कहाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥२॥
 ह्या झुळझुळ ओढ्याकाठी, मज दिसेल तो जगजेठी ।
 धावुनि मी केविलवाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥३॥
 ह्या सुरम्य गुंजातळुनी, मी गाइन हरिला गाणी ।
तुकड्या म्हणे पूजिन ध्यानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥४॥

·         सदा तुझ्या चिंतनी रहावे, वाटे गुरुराया ! ।
प्रारब्धाचा भोग चुकेना, भ्रमवी अवनी या ॥धृ॥
'सखा सहोदर पाहु कुठे तरि ? ' म्हणतो जिव माझा ।
 जे भेटति ते स्वार्थी लोभी, कोणि न ये काजा ॥१॥
महाकाळ विक्राळ काम हा, भोवति घे घिरट्या ।
संतसंग किति करू कळेना, पळहि न ये वाट्या ॥२॥
जिकडे तिकडे 'मी मोठा, मी मोठा' ही वाणी ।
भक्तिवर्म ते न दिसे कोठे, दुःखाची खाणी ॥३॥
तुकड्यादासा तुझा भरवसा, मग कोणी नाही ।
 राख राख रे ब्रीद दयाळा ! आलो तव पायी ॥४॥

·         सद्गुरु अपुला सखा, गडे हो ! सद्गुरु अपुला० ॥धृ॥
 निर्मोही, निर्भयी निरंतर, मार्ग दावि भाविका ॥१॥
 अजर, अमर हा आत्मा साक्षी, होउ न दे पारखा ॥२॥
निज स्वरुपाचा बोध दावुनी, दूर करी यम-दुखा ॥३॥
तुकड्यादास म्हणे या या रे ! तिळभरि विसरू नका ॥४॥

·         सद्गुरुचे गूण-नाम, गाइ मनोभावे ॥धृ०॥
संसारी सर्व मिळे, व्यवहारी सर्व कळे ।
परि गुरुगम्यचि विरळे, नाहि जगा ठावे ॥१॥
सागर उतरेल पार, वायुगमनीहि फार ।
गुरुची महिमा अपार, नाहि कुणा पावे ॥२॥
अमृत मंथने निघेल, जीव मस्त हा बनेल ।
 गुरु-ज्ञानविण कुणी, शेवटी न धावे ॥३॥
तुकड्याची एक आस, सद्गुरूचि पुरवि खास ।
करुनी भवदुःख-नाश, अंतकाळि पावे ॥४॥

·         समाधान हे विषयी नसे । पाहता दिसे, कळे सायसे ॥धृ॥
 विचारी मना रे ! त्यजी सर्व वारे ।
धरी संत-पाया, सुख देतसे, कळे सायसे ॥१॥
 सुखी कोण झाला ? जगी या निवाला ?
 न राजा दिसे बा ! प्रजाही नसे, कळे सायसे ॥२॥
 गडी तुकड्याचा, हरी हा सुखाचा ।
धरा भाव याचा, सुखी व्हा असे, कळे सायसे ॥३॥

·         साधुनि घे काहि जरा, कीर्ति व्हावया ॥धृ॥
 नाहितरी जाशि फुका, कोणी नच देइ रुका ।
खाशिल यमद्वारि धका, नाहि त्या दया ॥१॥
 अखिल विश्व हे अचाट, कठिण जन्म-मृत्यु-घाट ।
 काम-क्रोध यांचि वाट, दाविते भया ॥२॥
शरण जाइ संत-पदा, करुनि घेइ बोध सदा ।
 चुकवुनि घे आपदा ही, मुक्ति घ्यावया ॥३॥
तुकड्याची हाक ऎक, नाहितरी होय शोक ।
पावशील लोकि दुःख, थोर कष्ट या ॥४॥

·         सावळा मुरारी, अमुच्या रंगि रंगला ।
विसरुनी न जाऊ आम्ही, संग हा भला ॥धृ॥
 जाउ जिथे पाही तेथे, आपणाची मागे येते ।
विसरिना कधी आम्हाते, मोहिला भला ॥१॥
 नेत्र मिटोनिया बसता, भासतसे हसता हसता ।
खेळ खेळता नि निजता, सोडिना मला ॥२॥
 सृष्टिसुखा पहाया जात, मार्गि लावितो हा चित्ता ।
 भासवितो अपुली सत्ता, दावितो कली ॥३॥
 नाठविता आठव देई, आठविता जवळी राही ।
 देउनिया तुकड्या ग्वाही, सांगतो खुला ॥४॥

·         सावळी मूर्ति ही गोजिरी । पाहताना मनासी हरी ॥धृ॥
 अति कोमल चरणांगुले, सिंहासनि शोभति चांगले ।
गळा वैजयंती साजिरी । पाहताना० ॥१॥
कटि पीतांबर साजिरा, शिरि मोर-पिसांचा तुरा ।
 वाजवितो मधुर बासरी । पाहताना० ॥२॥
 दास तुकड्या म्हणे ध्यान हे, आमुच्या जीविचे प्राण हे ।
 मुक्ति लाभे, जपा अंतरी । पाहताना० ॥३॥

·         सुख दिसले डोळियाने, सांगो मी त्या खुणा ।
 मज वाटे सुख नाही, हरी-भक्तीच्या विना ॥धृ॥
जरि द्रव्या साचवीले, परि चिंता पावते ।
भीतीने पाठि-पोटी, नच शांती लाभते ॥१॥
 जरि घरचे भाग्य लाभे, स्त्री-सुखही मोहके ।
 तरि मृत्यूच्या भयाने, दुःख होते दाहके ॥२॥
 जरि स्त्री-धन दोन्हि लाभे, सौख्याच्या वाटणी ।
परि पुत्र ना तयासी, झुरती त्यावाचुनी ॥३॥
जगतीची वैभवे ही, लंगडी बा ! नाशती ।
 तुकड्याची हाक घ्या ही, प्रभु-स्मरणी द्या मती ॥४॥

·         सुखकर कर सत्संगा मनुजा ! पावन हा नरदेह करूनी,
 सहज करी भवभंगा मनुजा ! ॥धृ॥
 सुख-दुःखे ही किति भोगावी ? शांति नसे संसारी मनुजा ।
विमल सुखा दे माउली ही, देइल भक्तिसुरंगा मनुजा ! ॥१॥
'सत्संगाविण मार्ग न लाभे', श्रुति स्मृतिचे हे कोड मनुजा ! ।
 तुकड्यादास म्हणे सुखी हो, त्यागुनि सकळ कुसंगा मनुजा ! ॥२॥



·         सुखशांति या जगि ना दिसे । जन हे पिसे, फिरे वायसे ॥धृ॥
 अति थोर राजा, जयाचा अगाजा ! धरि लोभ तोही, मनासी रुसे, दुःख-सायसे ॥१॥
 रमे रम्य लोकी, मुखासी विलोकी । झुरे अंतरीही,'करावे कसे ?' दुःख-सायसे ॥२॥
गडी तुकड्याचा, कुणी ना कुणाचा । झरा स्वारथाचा, मुळाशी वसे, दुःख-सायसे ॥३॥

·         सुखाचा दिवस तै आला, कि जेव्हा भिन्नता गेली ।
 बुध्दिच्या पूर्ण भावाची, विलिनता रामरुपि झाली ॥धृ॥
न अपुली वाटली काया, न जनता जिवपणे स्फुरली ।
रामराय विश्वची सारे कि, प्रभु-माया खरी नटली ॥१॥
 निसर्गे बागही फुलली, निसर्गानेच सुखि झाली ॥२॥
 न काही कामना उरली, धर्मे-कर्मे उठाठेवी ।
 म्हणे तुकड्या गार जैसी, जली दिसली तशी मुरली ॥३॥

·         सुदिन हा संत-सेवेचा, सुभाग्ये लाभला आम्हा ।
 मिळाली दर्शने काशी, निमाली वृत्तिची सीमा ॥धृ॥
सदा फुलबाग बोधाचा, दिसे फुलला मुखावाटे ।
 रंगले ज्ञान-वन सारे, पसरला भृंगमय प्रेमा ॥१॥
 निसर्गे शांतिची ज्योती, सदा झळके तया दारी ।
 शिपायी कडक वैराग्ये, अखंडित साधिती कामा ॥२॥
स्तुती-निंदा उभ्या भिंती, दिसे बाहेरच्या मार्गी ।
 घासती बोचती अंगा, जावया साधुच्या धामा ॥३॥
लीन तुकड्या तया पायी, दर्शने भ्रांतिही जाई ।
 जन्म-मृत्यू नसे काही, विसरती भेद-भय नेमा ॥४॥

·         सोडशील का माया माझी ? श्रीपंढरीराया ! ।
 कोण लाज राखिल ? देह हा जाइल गा ! वाया ॥धृ॥
 काम-क्रोध मद-मत्सर सारे, जमले वळवाया ।
भक्ति-आड येऊनि, भाव तो नेती ओढुनिया ॥१॥
मन चंचल, कधि स्थिर राहिना, पहाते फसवाया ।
 बुध्दीने वेष्टिला जीव हा, काय सांगु सखया ! ॥२॥
 तूच गड्यारे ! गडी कोण मग येई ताराया ?
 सगे-सोयरे पळती सारे, जमले ओढाया ॥३॥
 तुकड्यादासा तुझा भरवसा, कोणी मग नाही ।
पुरा जाणला विचार याचा, ने अपुल्या पायी ॥४॥

·         सोडु नको मज तू गिरिधारी ! दूर करो ही जनता सारी ॥धृ॥
जन म्हणोत मज 'वेडा झाला', तरि न दुःख मम होइ मनाला ।
परि न तुझी मर्जी हो न्यारी ॥१॥
म्हणतिल मज जरि 'ठेवु उपाशी, परि तू रमशिल ना मजपाशी ?
तोडु नको अंतरिची तारी ॥२॥
 पाहो मज वैर्‍यापरि कोणि, तरि त्याची तिळ न धरी ग्लानी ।
तुकड्याचे भय दुःख निवारी ॥३॥

·         स्मर हरिनाम मनि मनुजा !
 याविणा न गति कवणासि मिळे ॥धृ॥
 दुर्लभ हा नरदेह सुखास्तव, अवचित तुज दिधला देवे ।
 नश्वर सुख घेता गमाविशि मग, यमदंडा पाठीच फळे ॥१॥
सार्थक घे करुनी नरदेही, वेळ पुन्हा ऎसी नाही ।
चाख गुरूबोधामृत हृदयी, सुख तुझे तुजलाचि कळे ॥२॥
 तुकड्यादास म्हणे समजी गुज ! वर्म कळुनि घे गुरु-वचने ।
वाग तयासी जगति गड्या ! मग देव सखा होऊनि वळे ॥३॥

·         हरिगुण गात राहि मना ! जा चुकेल भव-संकट सारे ॥धृ॥
 विषय सेविता कोण निवाला ? सांग तरी जगतात असा ।
राव, रंक जग सोडुनि गेले, कीर्ति न ती तिळमात्र उरे ॥१॥
भक्ति 'सुखाविण शांति न पावे', अनुभव गाती संत असे ।
जा सद्गुरुला पूस गड्या ! मग मन बोधे जागीच मुरे ॥२॥
तुकड्यादास म्हणे सावध हो, शोध करी हृदयी अपुल्या ।
 नरजन्माची दुर्लभ वेळा, दवडु नको विषयी बा रे ! ॥३॥

·         हरिनाम जपा मन लावुनिय, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥धृ॥
 अति दुर्जन हे रिपु दूर करा, जे काम-क्रोध मद-लोभ अती ।
गुरुपायि चला हृदये नमुनी, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥१॥
रोज करा अभ्यास सदा, जी वेळ मिळे जो काळ मिळे ।
 अति प्रेमभरे विरहे प्रभु गा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥२॥
 सत्य सदा वदनी वदणे, समजा सम सर्व जिवा प्रभुच्या ।
 अति निर्मळ गोड रहा जगती, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥३॥
 'मान असो अपमान असो, निति-धर्म न सांडुनि जाउ कुठे'
 तुकड्या म्हणे निश्चय घ्या ऎसा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥४॥

·         हरिनाम मधुर मनि गाइ सदा । गुरुवचनी निर्भय राहि सदा ॥धृ॥
सोडुनिय ही विषय-चिंतना, माया-मोह-विकाराची ।
सद्‍ विचार मनि वाहि सदा, गुरु-वचनी० ॥१॥
 'अखिल जगाचा चालक तो प्रभु', भाव असा दृढ ठेवुनिया ।
 ममतेने जग पाहि सदा, गुरु-वचनी० ॥२॥
 असत्यता ही नष्ट करोनी, नीतीने संसार करी ।
जन-सेवा-श्रम साहि सदा, गुरु-वचनी० ॥३॥
तुकड्यादास म्हणे, इहपर घे गोड करुनिया या देही ।
 आत्म्याची घे ग्वाही सद, गुरु-वचनी० ॥४॥

·         हरिभक्त लाडका हरिचा, ना दुजा कुणी ।
त्या मुक्त कराया येई, वैकुंठ सोडुनी ॥धृ॥
प्रल्हाद रक्षिला प्रभुने, वधुनि कश्यपू ।
 दे मोक्ष गजेंद्रालागी, हटवुनी रिपु ।
पुरवीर चीर द्रौपदीला, रूप घेउनी ॥१॥
धरि लाज पांडवांचीहि रक्षिले तया ।
ध्रुव बाळ भक्ति करिता, त्या देत आश्रया ।
तुकड्या म्हणे हरी ध्या हो ! भक्ति करूनी ॥२॥



·         हरी आठवा मनी अपुल्या, भाव धरोनी ।
सोडूचि नका त्यासि कधी, जागृति, स्वप्नी ॥धृ॥
 संसार भूल सारी, हा भ्रमचि ओसरा ।
हरि ठेवितसे या जीवा, वागु द्या बरा ।
 सुख-दुःख सोसवोनि सदा, ध्यास घ्या मनी ॥१॥
ध्यानि धरा हरी नयनी, अंतरंगि या ।
 रमवा सदा तयासी जिवी, आळवोनिया ।
 तुकड्या म्हणे मिळे प्रभु हा, येइ धावुनी ॥२॥

·         हरीच्या नाम-स्मरणाने, हरीचे तेज ये अंगी ।
मनाची दुष्टना नाशे, रमे मनही हरी-रंगी ॥धृ॥
 मान-अभिमान टाकोनी, कुणी हरिनाम घे वाचे ।
तयासह नाचतो हसतो, हरी करि दास्य निःसंगी ॥१॥
हरीसी जाणुनी कोणी, हरीचे ध्यान धरि चित्ती ।
 प्रकाशे तेज हृदयी त्या, लखलखे ब्रह्म सत्संगी ॥२॥
हरी म्हणता हरी होतो, हरी-रुपि साठुनी जातो ।
तो तुकड्यादास सांगतसे, तयाचे सुख ना भंगी ॥३॥

·         हस एकदा तरी हस रे ! कुंजविहारी ! ।
त्या गोजिर्‍या रुपाची मज लागु दे तारी ॥धृ॥
कंठात वैजयंती, कानात कुंडले ती ।
शिरी मोरमुकुट झळके, किति केस कुरळ देती ।
किति गोड नेत्र हे, अधरी सुरस बांसरी ॥१॥
बघताचि तुझी वाट जिव हा, वेड्यापरी ।
बेचैन सदा राही, मन वृत्ति बावरी ।
दिसलास तसा बोल सख्या ! एकदा तरी ॥२॥
मन बावरे अता हे तव ध्यान सोडि ना ।
बस जन्मजन्मिचीही, ती हरलि कल्पना ।
तुकड्यास पदी घे आपुल्या, आस कर पुरी ॥३॥



·         हिंदभुच्या लेकरांनो, स्वस्थ का बसता असे ?
भारताचे ग्रहण हे, नेत्री तुम्हा बघवे कसे ॥धृ॥
मार्ग काढा उन्नतीचा, या पुढे सरसावुनी ।
 भेद-भावा सोडुनी, घ्या प्रेम-ऎक्याचे पिसे ॥१॥
जीर्ण ज्या चाली-रिती, डोळे मिटवुनी ना करा ।
वेळ ही पाहोनिया, कर्तव्य शोधा सायसे ॥२॥
 आचरा सुविचार-वृत्ती, अनुभवाला घेउनी ।
 अंध-श्रध्दा सोडुनी, व्यवहार साधा धाडसे ॥३॥
 राहु द्या सत्प्रेम चित्ती, श्रीहरीसी गावया ।
 नांदु द्या विजयी ध्वजा, द्या प्राण समरी वीरसे ॥४॥
 दास तुकड्या सांगतो, काढा घरातुनी आळसा ।
काव्य बनवा आपुले, स्वातंत्र्य जे लाभे तसे ॥५॥

·         हिंदभूच्या भाविकांनो ! आत्मबल मिळवा अता ।
 भ्याड वृत्ती सोडुनी, हृदयी धरा बुध्दीमत्ता ॥धृ॥
हात जोडुनी का असे हो ! 'धर्म धर्म' चि बोलता ?
बोलणे हे सोडुनी, दावा स्वधर्माची सत्ता ॥१॥
अंतःकरणे मोकलोनी, एक व्हा एकी करा ।
 संप्रदाय नि पंथ हे, विसरूनी घ्या कर्तव्यता ॥२॥
देव सर्वांचा सखा, आम्ही तयाची लेकरे ।
भेद मग का कोरडा ? जाळा जशी जळते चिता ॥३॥
 दिव्य ज्योती चमकु द्या, भानू जसा रविमंडळी ।
 अर्जुनासम वीर व्हा, हा वेळ ना दवडा रिता ॥४॥
दास तुकड्या सांगतो, ही वेळ जाता आळसे ।
रूढि ग्रासिल आपुली, जाईल ही स्वातंत्र्यता ॥५॥

·         हो जागा, का निजला सखया ! अज्ञानामाजी ?
 विसरुनिया संधान आपुले, केला भव राजी ॥धृ॥
 सुख नाही, सुख नाही बापा ! या झोपेमाजी ।
 लावुनि घेशी खटपट मागे. मग करिशी हाजी ॥१॥
 नरजन्माची वेळ गमवुनी, का बनशी पाजी ?
समज अता तरि, सत्संगाने अनुभव घे आजी ॥२॥
आत्मस्वरूपी स्थिर होउनी, सोडी जग-लाजी ।
अंतर्मुख कर वृत्ति आपुली, धर निश्चय आजी ॥३॥
तुकड्यादास म्हणे का फिरशी ? धरि गुरुचरणा जी !
 सत् चित् रुप सोडुनी राहशी, चोरांच्या शेजी ॥४॥


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।