.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय २६ वा मूर्ति-उपासना



अध्याय २६ वा

मूर्ति-उपासना

 

ईश्वर सर्वांठायीं व्यापला । तो पंथीं नाही विभागला ।

 मग उणें-अधिक कोणाला । कां म्हणावें ॥१॥

 

ऐसें ऐकोनि निरूपण । एक श्रोता करी प्रश्न ।

 देव विशाल व्यापक पूर्ण । मग कां समर्थन मूर्तीचें ॥२॥

 

असो कोणाहि धर्माची खूण । परि मूर्ति मानवांनी केली निर्माण ।

तिथे कोठलें देवपण तिचें पूजन कशाला ॥३॥

 

देव कुणाची पूजा नेघे । त्यास नको हें वाउगें ।

 स्वयें बोलला भक्तासंगें । ’ मज हवें शुध्द प्रेम ’ ॥४॥

 

याचें ऐकावें उत्तर । प्रेम निर्मावें एका मूर्तीवर ।

 तेंचि क्रमाने करावें विश्वाकार । हाच हेतु पूजनाचा ॥५॥

 

देवाची स्मरणमूर्ति बघतां । त्याचें जीवनकार्य ध्यानीं आणतां ।

 शक्ति येते मनासि तत्त्वता । मानसिक संयोगें ॥६॥

 

मनासि लावावया चिंतन । लागावया मार्गाचें आकर्षण ।

नेमिलें असे प्रतिमापूजन । साधुसंतीं ॥७॥

 

मनास पाहिजे कांही आधार । म्हणोनि आरंभीं मानिले साकार ।

देवें व्यापिलें चराचर । तेथे मूर्ति तद्रुपचि ॥८॥

 

परि जो सिध्दान्ताचा पुरस्कर्ता झाला । त्यासहि जन देव बोलला ।

त्याचीहि प्रतिमा पूजूं लागला । भोळेपणाने ॥९॥

 

जरी पूजिली व्यक्तिमूर्ति । तरी चुकलें मी न म्हणे चित्तीं ।

परि सिध्दांत वाउगे राखिती । हें तों आहे अज्ञानपण ॥१०॥

 

सुखासाठी आखिली दिशा । रेखिला घराचा नकाशा ।

परि लाभली शेवटीं निराशा । नकाशाचि राखतां ॥११॥

 

घर राहाया नाही मिळालें । नकाशे नकाशेच राहिले ।

 तेणें समाधान भंगलें । जाणीव होतां पुढे पुढे ॥१२॥

 

तैसेंचि झालें मूर्तिपूजेचें । जे जे पंथ दिसती आजचे ।

 तेथील साधक मूर्तिपूजेपुढचें । कांहीच नेणे ॥१३॥

 

तो मूर्ति धरोनीच बसला । मूर्खचि समजतो पुढचियाला ।

 म्हणतो भ्रष्टाचार झाला । मूर्तिपूजेवांचोनि ॥१४॥

 

त्यासि कळला नाही धर्म । मूर्तिपूजेचें काय वर्म ।

उगीच वाढवूनि घेतला भ्रम । बिचार्‍याने अंतरीं ॥१५॥

 

घरीं देवाचा कट्टर पुजारी । असत्य करीत असे बाजारीं ।

 व्यवहार करितां झाला वैरी । ज्याचा त्याचा ॥१६॥

 

देवळामाजीं कान घरी । नाक धरोनि प्राणायाम करी ।

बाहेर येतां शिवी देकावरी । ज्यासि त्यासि ॥१७॥

 

देवाद्वारीं हवन करी । बाहेर भिकार्‍यासि मारी ।

 पोटा न दे चूनभाकरी । उपाशीयाच्या कधीहि ॥१८॥

 

आमचा देव सत्यचि बोले । परि आम्हीं पाहिजे खोटें केलें ।

 ऐसें असोनि भक्त झाले । म्हणती आम्ही ॥१९॥

 

स्वयें म्हणवी रामभक्त । नाही एकपत्नीव्रत ।

नित्य पूजितो हनुमंत । व्यसनें झाला प्रेताऐसा ॥२०॥

 

देव दुर्जनासि संहारी । कष्ट करितो भक्तांघरीं ।

 भक्त बघा हा व्यभिचारी । आळसे घरीं झोपतसे ॥२१॥

 

देव म्हणे ’ मी सर्वत्र । दीनरंक माझे पुत्र ’ 

उपासक त्यांसि दिवसरात्र । पिळोनि चैन भोगितसे ॥२२॥

 

’ प्रभु आमुचा पतितपावन ’ । म्हणोनि कंठरवें करी गायन ।

 मानवासि अस्पृश्य हीन । मानून डौल मिरवितो ॥२३॥

 

देवाचिया मूर्तीसाठी । सोने हिरे बैसवी मुकुटीं ।

 न दे श्रमिकासि लंगोटी । मंदिर बांधतां मेला तरी ॥२४॥

 

कसलें हें देवपूजन मूर्तिपूजेचें विडंबन ।

 केवढें शिरलें आहे अज्ञान । आपणांमाजीं ! ॥२५॥

 

देवळामाजीं करी भजन । बाहेर येतां खोटें भाषण ।

 ऐशा पुजार्‍या पुसेल कोण सांगा तरी ॥२६॥

 

म्हणोनि हें वाईट विसरावें । पूजेने पूज्यासि ओळखीत जावें ।

 अभ्यासाने पाऊल टाकावें । पुढे पुढे ॥२७॥

 

जैसी ज्याची भावना । त्याने तैसीच मानावी देवता मनां ।

 परि न चुकावी उपासना । सत्कर्मांची ॥२८॥

 

मूर्तिपूजेचा अर्थ एक । आपण मूर्तीच व्हावें सम्यक ।

 म्हणजे करावी तैसी वागणूक । अभ्यासाने ॥२९॥

 

जयाची मूर्ति उपासावी । तयाची चरित्रकथा वाचावी ।

पुढे कामेंहि करीत जावीं । आपणहि तैसीं ॥३०॥

 

काय केलें माझिया देवें । मजसी मुळीच नाही ठावें ।

 फक्त मूर्तीच धरोनि बसावें । हें वेडेपणाचें ॥३१॥

 

ऐसी असावी उपासना । उपासनीं वाढवावें कर्तव्यगुणा ।

 कर्तव्यपूर्तीने मोठेपणा । अंगीं घ्यावा मिळवोनि ॥३२॥

 

संकटें येतां कार्यामाझारीं । चिंतनीं घ्यावें चारित्र्य अंतरीं ।

 अभ्यासाचें तेज वृत्तीवरि । वाढवावें सर्वकाळ ॥३३॥

 

चुकलिया संतां विचारावें । पुढे कार्य करावयासि धजावें ।

आपुल्या परीने सुख देत जावें  । जीवांलागीं ॥३४॥

 

यासाठीच मूर्तिस्थापना । ठायींठायीं केली जाणा ।

 आठवण राहावी साधकांना । म्हणोनिया ॥३५॥

 

पदोपदीं हो पवित्र वृत्ति । म्हणोनि स्थळोस्थळीं स्थापिली मूर्ति ।

 वृक्षपशुपक्षी ठरविल्या विभूति । सदभावासाठी ॥३६॥

 

मनोभावें मूर्तीसि पुजावें । श्रवणकथनस्मरणादि करावें ।

 मूर्तीप्रमाणे सत्कर्म घडावें । आपुलिया अंगें ॥३७॥

 

सर्व सोडोनि भिन्न भावना । हृदयीं धरावी उपसना ।

 जेणें प्रसन्नता येई मना । तेंचि उत्तम समजावें ॥३८॥

 

मन जेथे समाधान पावे । तेथूनि शक्तीचें तेज घ्यावें ।

 मग कार्यासि लागावें । सदगुणी ऐशा ॥३९॥

 

सदभावें करावें पूजन । विनम्र करोनिया देहमन ।

 निर्मळ असावें वातावरण । ध्यान धराया देवाचें ॥४०॥

 

येथे मानसिक पूजेचेंच महत्त्व । विचारसामर्थ्य हें मूलतत्त्व ।

 तेणेंचि पावे ईश्वरत्व । जीवालागी प्रयत्नें ॥४१॥

 

जीवासि मूळतत्त्व कळावें । सर्वांभूतीं आत्मरूप समजावें ।

 ऐसेचि पूजनाचे गोडवे । वर्णिले संतीं ॥४२॥

 

संतीं बोलिलें हरिनांम घ्यावें । हेंहि वाटे साधन बरवें ।

परि अर्थ समजोनि जपावें । तरीच सार्थक जीवाचें ॥४३॥

 

नाम ईश्वराची शब्दमूर्ति । ’ मुखीं नाम हातीं मोक्ष ’ म्हणती ।

 यज्ञाहूनि थोर जपावी महती । ठाऊक हें सर्वां ॥४४॥

 

परि कासयासि जपावें नाम । साधावयाचें तें कोण काम ।

 या ध्येज्ञानावांचोनि सर्व कर्म । निरर्थक ॥४५॥

 

कितीतरी जन नाम घेती । माळा-मणी ओढीत राहती ।

परि क्षणहि त्यांची मति । रामीं न रंगे ॥४६॥

 

मुखें नाम उच्चारिती । व्यवहार अधोगामी करिती ।

 पापें करोनि शपथ घेती । देवधर्मांची ॥४७॥

 

कसलें हें नाम जपणें स्वार्थें विश्वासघात करणें ।

 आशातृष्णा न सोडणें । इंद्रियविषायांची ॥४८॥

 

येथे तारतम्यचि पाहिजे । नामजपीं व्रतस्थ होइजे ।

तरी जीवास सुखाचें साजे । स्थान जीवनीं ॥४९॥

 

मुखीं नामाचें चिंतन । हातीं सेवाकर्य पूर्ण ।

 करील चारित्र्य संपादन । तोचि भक्त ॥५०॥

 

नामें शक्ति येते अंगीं । संकटें निवारण्याची प्रसंगीं

। परि पुरुषार्थ असावा जंगी । तरीच फळे ॥५१॥

 

दुराचार सज्जन-विरोध । ऐसे दोष आणिती बाध ।

 काया-वाचा-मनें टाळिले अपराध । तरीच फळे ॥५२॥

 

मग तें नाम मंदिरीं जपावें । अथवा शेतीमाजीं घ्यावें ।

चालतां बोलतांहि गावें । तरी तो यज्ञ ॥५३॥

 

मुख्य नामाचें अधिष्ठान । कर्तव्य करावें संपादन ।

हेंचि साधावया संतजन । नामजप सांगती ॥५४॥

 

जे पुरुषार्थ सोडोनि जपती नाम । त्यांसि कैसा पावेल आराम ?

 हें तों झालें आंधळें काम । देवाद्वारीं ॥५५॥

 

आमुचा राम कामें करी । आम्ही मागावी भाकरी ।

 होवोनि फिरावें भिकारी । ही भक्ति कैची ॥५६॥

 

रामें असुरांसि मर्दावें । आम्हीं पूजापात्र अवलंबावें ।

निर्बल होवोनि शरण जावें । ही भक्ति कैची ॥५७॥

 

भक्त म्हणजे विभक्त नव्हे । एकरूपचि होवोनि जावें ।

 देवें लोकांचें दु:ख हरावें । आम्हीं का करावें देवदेव ॥५८॥

 

ऐसा जप जयाने केला । तो शेवटीं मूर्खचि राहिला ।

 बोल देवोनिया देवाला । काय होतें ॥५९॥

 

पापक्षालनासि नाम घ्यावें । पुढती पाप करीतचि जावें ।

 ऐसें कोण वदलें बरवें  । सांगा मज ॥६०॥

 

ऐसी आहे ज्यांची स्थिति । त्यांसि नामजपी म्हणती ।

 मी म्हणेन कलंक लाविती । नामादिकासि ते ॥६१॥

 

याहूनि न जपे तो पुरवला । उत्तम राहणी ठेवी जो भला ।

 दु:ख न देईच कोणाला । कोण्या प्रसंगीं ॥६२॥

 

व्यवहार करीतसे कष्टून । जोडोनिया उद्योगें धन ।

 सदा राहतो प्रसन्न । खेळींमेळीं प्रेमभावें ॥६३॥

 

असेल तें गरजूंना देणें । कोणा उत्तम-वाईट न म्हणे ।

आपणा ऐसें सर्वांचें जाणे । सुखदु:ख सज्जन ॥६४॥

 

हेंचि शिकावयासाठी । नामजप सांगितला उठाउठी ।

 सदा राहणी गोमटी । प्रेमळपणाची सर्वांशीं ॥६५॥

 

प्रथम नाम दुजें चिंतन । तिजें निश्चयीं लावावें मन ।

मग होवोनि सत्कार्यप्रवण । समाजसेवा साधावी ॥६६॥

 

ऐसें सत्कर्म जरी नाचरवें । सदगुण विसरोनि नामचि गावें ।

 तरी तें पूर्णतेस न पावे । आत्मोन्नतीच्या ॥६७॥

 

म्हणोनि संतांचिया वचना । निरीक्षोनि ठेवावी धारणा ।

तरीच ग्रंथीं कथिल्या त्या खुणा । पावती रामनामाच्या ॥६८॥

 

देव बोलला ’ कामें करा । निर्भय होवोनि देशीं विचरा ’ 

 सकळ देवाचाचि पसारा । सेवाभाव साधा ॥६९॥

 

जनता ज्याला देवरूप कळली । त्याचीच भक्ति देवा पावली ।

 साक्षात्कारें वृत्ति वळली । विश्वात्मभावीं ॥७०॥

 

तें साधाया बोलिलें नाम । लाभावया जीवास आराम ।

 तुटावया अज्ञानभ्रम । दु:खमूळ जो ॥७१॥

 

आपण तरूनि जग तारावें । शक्तियुक्तीने विश्व भरावें ।

 नामें लोकांसि जागवावें । ऐसा आदेश संतांचा ॥७२॥

 

संतमुकुटमणि तुकाराम । त्यांनी अभंग कथिले अति सुगम ।

 मार्ग केला व्यवहारक्षम । भोळयाभाळया जनांसाठी ॥७३॥

 

अत्यंत साधी गर्जली वाणी । गेली वेदादिकांस भेदोनि ।

 भ्रमचि निवारिला तत्क्षणीं । अज्ञानी जडजीवांचा ॥७४॥

 

हजारो मुखांतूनि गरजला । ’ वेदान्त आम्हांसीच कळला ’  

 ज्याने पंढरीराज वंदिला । सर्व पावला शास्त्रगुह्य ’ ॥७५॥

 

म्हणे ’ नको ब्रह्मज्ञानादि भाव । आत्मस्थितीचा गौरव ।

आम्ही भक्त तूं चहूकडे देव । ऐसें करी आम्हांसि ’ ॥७६॥

 

’ कोठोनि आणावी विद्वत्ता सेवेंचें काम आमुच्या हातां ।

नाम गाऊं कष्ट करितां । पंढरीनाथा पावाया ’ ॥७७॥

 

प्रभूने ऐकिली त्यांची सेवा । संकटीं आला ऐकोनि धांवा ।

 त्यांच्या शब्देंहि लोक तरावा । ऐसा केला चमत्कार ॥७८॥

 

ऐसे झाले संत अनेक । मूर्तिभक्त बहु नामधारक ।

 जे सेव्यचि झाले असोनि सेवक । हनुमंतापरी ॥७९॥

 

सर्वचि पंथांचे भक्तिप्रकार । तत्त्व साधतां असती सार ।

 हा आचरोनि दाविला समन्वय सुंदर । रामकृष्ण परमहंसें ॥८०॥

 

नाम जपोनि मूर्ति पूजितां । देवचि झाले देवा भजतां ।

 पूजूं लागले विश्वा समस्ता । स्त्रीपुरुष-भेद विसरोनि ॥८१॥

 

मूर्तिपूजा जपतप कांही । तत्त्व साधतां बाधक नाही ।

हें सिध्दचि केलें अनुभवें पाही । संतजनांनी ॥८२॥

 

उत्तम भाकरी करितां यावी । म्हणोनि मुलीने मातीची करावी ।

तैसी अमूर्त देवाचा मार्ग दावी । मूर्तिपूजा ही ॥८३॥

 

देव आहे मूळचा अंतरीं । त्याची साधना करावी लागे बाहेरी ।

ओळख पटतां विचारें पुरी । भिन्नपणा राहीना ॥८४॥

 

सत्कर्मांचें ज्ञान झालें । सत्कर्म करणें अंगीं आलें ।

मूर्तिपूजेचें साधन संपलें । साधकाचें ॥८५॥

 

राहिलें जीवनांत तैसे वागणें । देव भजतां देवचि होणें ।

 देव होण्याचीं कारणें । अनुभवोनिया ॥८६॥

 

माझा देव दयावंत । पुरवी हीनदीनांचे मनोगत ।

 मजसी पाहिजे निष्ठावंत । तेंचि केलें ॥८७॥

 

ऐसा जप जाले अंतरीं । हातीं व्यवस्थेची चाकरी ।

 लागला रंग याचिपरीं । अहोरात्रीं देहाला ॥८८॥

 

आता परोपकारचि उरला । देव अंतरी-बाहेरी भरला ।

पाहणेंचि नाही दुसर्‍या कोणाला । कोणे ठायीं ॥८९॥

 

विसरोनि गेले व्यक्तिपण । झाले कार्यरूपचि आपण ।

ऐसें होतां देवपण । अंगीं आलें धांवोनि ॥९०॥

 

नाना विरोधकांस तोंड दिलें । नाना कष्ट सहन केले ।

 शेवटी सर्वांनी ठरविलें । हेंचि खरें म्हणोनि ॥९१॥

 

पूर्वी मूर्तीस शृंगार करी । तैसेंचि मानवांसि शृंगारी । ’ 

कष्ट नसो कोण तिळभरी । गांवीं माझ्या ’ म्हणोनि ॥९२॥

 

हीच खरी देवपूजा । याविण नाही मार्ग दुजा ।

संतदेव बोलिले माझ्या । हृदयामाजीं येवोनि ॥९३॥

 

देव जैसा जैसा आकळला । तैसा देह-अंहकार मावळला ।

 लवणकण सागरीं मिळाला । सागर झाला एकत्वें ॥९४॥

 

यापरी पुढची आहे पायरी । जैसी वृत्ति धरोनि चढाल वरी ।

 तैसा जीव ब्रह्म होवोनि अंतरीं । अनुभव घेई आपणचि ॥९५॥

 

म्हणे मीचि सर्व आता झालों । विश्वीं विश्वाकार होवोनि ठेलों ।

सर्वचि कार्ये करूं लागलों । आपणाचि साठी ॥९६॥

 

माझ्याविरहित कोणी नुरला । अणुरेणूमाजीं मीचि संचला ।

 ऐसा अनुभव येतां झाला । पूर्ण योगी ॥९७॥

 

प्रथम पाहिली देवुळीं मूर्ति । पुढे पाहिलें जीवजनाप्रति ।

पूर्णता होतां सर्वत्र व्याप्ति । आपुल्याचि रूपाची ॥९८॥

 

ऐसी लाभावया आनंद-ठेव । पूजावयासि मांडिला देव ।

 द्रष्टा-दृश्य-दर्शनभाव । एकतत्त्वी दिसावया ॥९९॥

 

हाचि धरोनि निर्धार । केलिया नवविध पूजाप्रकार ।

पावेल सर्वोत्तम सार । ईश्वरभक्तीचा ॥१००॥

 

एरव्ही कितीहि पूजिली मूर्ति । तरी वाढचि घेईल भ्रांति ।

न मिळेल कदाकाळीं शांति । जनामनासि ॥१०१॥

 

नसता वाढेल अहंकार । ’ आमची प्रतिमा अधिक थोर ’ 

 न मिटेल पंथद्वेष साचार । व्यापक ईश्वर जाणल्याविण ॥१०२॥

 

म्हणोनि प्रतिमा धरोनीच न बसावें । पायरीने वाढत जावें ।

 क्रियाशीलपणें विश्वीं पाहावें । विश्वंभरासि ॥१०३॥

 

सर्व लोकचि आमुचा ईश्वर । सर्व गांवचि आमुचें मंदिर ।

सेवा करणें निरंतर । पूजा आमुची ॥१०४॥

 

प्रामाणिकतेने करणें काम । हेंचि आमुचें ईश्वरनाम ।

सर्व जीवमात्राशीं ऐक्यप्रेम । धर्म हा आमुचा ॥१०५॥

 

हाचि दृढ धरितां निर्धार । परमार्थ याहूनि नाही थोर ।

किंबहुना हाचि परमार्थ-सार । अनुभवियांचा ॥१०६॥

 

अंगीकारोनि या तत्वांसि । एक करावें सर्व भक्तांसि ।

 लावावें पूजाया ग्राममंदिरासि । तुकडया म्हणे ॥१०७॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत ।

पूजनस्मरण-रहस्य कथित । सहविसावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥



अध्याय २६ वा मूर्ति-उपासना   
ऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।