.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ३४ वा प्रारब्धवाद



अध्याय ३४ वा

प्रारब्धवाद

 

जीव ईश्वराचा अंश । तो जितुका करी आपुला विकास ।

तितुका उच्च अवतारपदास । याच लोकीं जातसे ॥१॥

 

करितां सेवाप्रयत्न थोर । जीव होई देवावतार ।

आपण आपुला करी उध्दार । शांति देई जगासहि ॥२॥

 

सोडूनि दुबळा निराशावाद । साधावा सत्य अवतार-बोध ।

म्हणोनि केलें असे विशद । अवतारतत्त्व हें सारें ॥३॥

 

लोक करूं लागतील सत्कार्य । तरि गांवीं नांदेल सर्व ऐश्वर्य ।

 त्यासाठी वाढविलें पाहिजे मनोधैर्य । सर्व लोकीं ॥४॥

 

परि श्रोते बोलती त्यावरि वाचें । अहो ! भाग्यचि हीन आमुचें ।

 म्हणोनि आमुच्याने कोणचें । सत्कार्य नोहे ॥५॥

 

मनांत असतें कांही करावें । परि वेळचि जरा ना फावे ।

 सांगा यास काय करावें । आम्हीं तरी ॥६॥

 

मित्रहो ! ज्याची जयासि आवड । त्यासाठी त्या मिळे सवड ।

 कोणी नये इच्छेआड । प्रयत्न करितां ॥७॥

 

गरजेपोटीं जन्मे युक्ति । प्रसंग आणितां वाढे शक्ति ।

 प्रयत्न पेरतां फळें येती । आवडी ऐसीं ॥८॥

 

श्रोते म्हणती कितीहि प्रयत्न केले । तरि काय सर्वचि राजे झाले ?

 यास पाहिजे भाग्य उघडलें । आम्हां वाटे ॥९॥

 

इच्छेंत जरी राज्य जडलें । तरी रोजचेंचि कार्य नडलें ।

 तेथे उदंड मनांत आलें । तरी काय होतें ॥१०॥

 

इच्छेप्रमाणें सर्वांस घडतें । तरि काय भिकारी बनावें वाटतें ?

 इच्छा करणारे कितीतरी येथे । फिरती बेकार सडकेने ॥११॥

 

कोणास सहजमार्गी चालतां । धनाचा हांडा सापडे आइता ।

 त्यांना बघा इच्छा न करितां । मिळालें धन ॥१२॥

 

कोणी दरिद्रयाच्या घरीं जन्मले । मेंढयाबकर्‍या चारूं लागले ।

अचानकचि भाग्य उघडलें । गेले दत्तक राजवाडीं ॥१३॥

 

ऐसें कोण्या उपायें होतें । हेंचि विचारावें वाटे आपणातें ।

 प्रयत्न केल्यानेच फळ येतें । हें तों येथे शोभेना ॥१४॥

 

गांवीं आमुच्या एक सज्जन । अति कुशल प्रयत्नवान ।

नाना कलांनी निपुण । परि पोटाचेंहि भागेना ॥१५॥

 

सांगा याहूनि काय करावें इच्छेने फल कैसें पावे 

कोण्या परीने योजावें । कार्य आम्हीं आपुलें ॥१६॥

 

मित्रहो ! तुमचें सर्व म्हणणें । ऐकलें मीं जीवेंप्राणें ।

 म्हणोनीच आपल्या परीने । देतों उत्तर तुम्हांसि ॥१७॥

 

भाग्याचा हा प्रारब्धवाद । उन्नतीचा करी विरोध ।

 गांवोगांवच्या जीवनासि बाध । आणला याने ॥१८॥

 

ही दुबळी निराशा घालवून । केलाच पाहिजे प्रयत्न ।

 तरीच भाग्य येईल जाण । उदया आपुलें ॥१९॥

 

एरव्ही हें भाग्य कोणी देईना । प्रयत्नाशिवाय भोग येईना ।

 त्यासि प्रयत्नचि प्रधान जाणा । लागे केव्हाचा तरी ॥२०॥

 

कांही संस्कार असती पूर्वीचे । कांही प्रयत्न या जन्मींचे ।

मिळोनि येई फळ भाग्याचें । उदया लोकीं ॥२१॥

 

संत गुलाबराव बालान्ध । त्यांच्या जिव्हाग्रीं शास्त्रवेद ।

हें पूर्व जन्मींचें संचितचि सिध्द । नव्हे प्रारब्ध फुकाचें ॥२२॥

 

कांही पूर्वसंस्कारगति । कांही करणी कांही संगति ।

कांही संकल्प इच्छाशक्ति । योग्य काळीं येती भाग्यफळें ॥२३॥

 

पाहणार्‍यास अचानक दिसती । याचें भाग्य उघडलें म्हणती ।

 धनवैभव लाभतां ठरविती । भाग्यवंत लोकीं ॥२४॥

 

येथे एक प्रश्न उठतो । भाग्यवंत कोण असतो ?

 ऐका त्याचेंहि सांगतों । उत्तर आता ॥२५॥

 

असेल कोणी धनवंत । परि तो नव्हे भाग्यवंत ।

भाग्य असे सुखसंतोषांत । अवडंबरांत तें नाही ॥२६॥

 

भाग्यवंत त्यासचि म्हणावें । ज्याने ईश्वरास समर्पण व्हावें ।

 अनन्यगतीने राहावें । शरण देवासि ॥२७॥

 

आणि सत्कार्यी असावें तत्पर । सर्व सोडोनि दुर्व्यवहार ।

सहजकर्म मिळे पोटभाकर । त्यांतचि सुखें नांदावें ॥२८॥

 

आपणासीच सुख व्हावें । आणि दुसरे ते ओसरून जावे ।

 ऐसें कधी न मानी जीवें । तोचि भाग्यवंत म्हणावा ॥२९॥

 

कांही चोरी करोनि भाग्यवंत होती । सर्व लोक तुच्छ भावें हसती ।

म्हणती भाग्यवंताची गति । त्वरित पडेल दृष्टीला ॥३०॥

 

मग पाप आणोनि पाडी संकटा । धनभाग्य जातें भलतिया वाटां ।

 पुन्हा राहतो करंटा । कैसा भाग्यवान म्हणावा ॥३१॥

 

कुणाचें भाग्य रात्रींतून येतें । जुगारीं कधी द्रव्य लाभतें ।

 दुसर्‍या दिनीं पुन्हा धांव घेतें । दरिद्रपण त्याच वाटें ॥३२॥

 

हा आहे पापाचा आविष्कार । नव्हे नव्हे हे भाग्य थोर ।

 भाग्य तेंचि निरंतर । लोक कीर्ति गाती मागेहि ॥३३॥

 

भाग्यवंत धनाने नव्हे । भाग्य सत्तेसीहि न म्हणावें ।

 भाग्य सत्कार्यानेच पावे । जीवालागी ॥३४॥

 

भाग्यवंत श्रीमंत न होय । ऐसे माझें म्हणणें नोहे ।

परि उत्तम व्यवहारी धनिक राहे । तोचि खरा भाग्यवंत ॥३५॥

 

एकाची श्रीमंती दुसर्‍या भूषवी । एकाची श्रीमंती रक्तचि शोषवी ।

त्यास कैसी द्यावी पदवी । भाग्यवंताची ॥३६॥

 

माती धरितां सोनें होतें । चालत्या काळीं भाग्यचि तें ।

 परि अहंकारें व्यसनें मुकले सेवेतें । झाली शेवटीं दुर्दशा ॥३७॥

 

म्हणोनि म्हणतों प्रयत्न करा । आपापलें जीवन सुधारा ।

 भाग्यहीन म्हणण्याचा प्रसंग सारा । टाळा मागे ॥३८॥

 

भाग्यकरितां संकल्प करावे । दृढनिश्चया वाढवीत जावें ।

 तैसेचि प्रयत्न करीत राहावें । आळस सांडोनि ॥३९॥

 

जेवढा करावा उच्च विचार । तेवढाचि उच्च ठेवावा व्यवहार ।

 त्यानेंच पावतें भाग्य थोर । सकळ योजना साधतां ॥४०॥

 

केल्यानेच भाग्य फळतें । केल्यानेच स्वर्गसुख मिळतें ।

 केल्यानेच सर्वकांही होतें । मानवाचें ॥४१॥

 

माणूस बसतां भाग्य झोपतें । चालतां पुढेचि घेई झेप तें ।

 प्रयत्नांचेंचि रूपांतर होतें । भाग्यामाजीं निश्चयाने ॥४२॥

 

ऐसें बोलले ऋषिजन । संत कवीश्वर अवतार महान ।

 धर्मग्रंथ हेंचि प्रमाण । बोलले लोकीं ॥४३॥

 

ज्याचें अचानक भाग्य उघडले । त्याचें सुकृत साचत आलें ।

म्हणोनीच एकाएकी लाभलें । भूषण तया ॥४४॥

 

जरि त्याने केलेंचि नसतें । तरि तें आज कैसें लाभतें ?

 देवाने द्वैतभाव केला येथे । ऐसें म्हणणें शोभेना ॥४५॥

 

एकाएकीच भाग्य लाभतें । म्हणोनि धुंडाळाल कोठे कोणतें ।

तरि आहे हेंहि जातें । मनुष्यपण हातचें ॥४६॥

 

तुम्ही म्हणाल मग काय करावें आपणहि आता प्रयत्नशील व्हावें ।

 प्रबल इच्छेसि वाढवावें । सदभाग्याच्या ॥४७॥

 

काळ असेल प्रतिकूल । तरि हळू पडेल पाऊल ।

 परि सत्कार्य वाया न जाईल । केलें तें तें ॥४८॥

 

तीव्र इच्छेने कार्य केलें । तें आज जरी नाही फळलें ।

तरी अचानकचि भाग्य उघडलें । वाटेल ऐसें फळ येतां ॥४९॥

 

श्रोते साशंक झाले हृदयीं । प्रयत्न इच्छिलें फळ देई ।

 ऐसें कथिलें जें जें कांही । म्हणती अजुनीहि पटेना ॥५०॥

 

प्रयत्नें साधती सर्व उपाय । ऐसा केला जरी निश्चय ।

 तरी कां उपाय करितां अपाय । अनुभवा येती ॥५१॥

 

सर्वचि जगण्याचे करिती प्रयत्न । कोणास वाटे घडावें मरण ।

 येथे पूर्वी तरी केलें साधन । मरणाचें कोणी ॥५२॥

 

लोक जगण्याचाचि प्रयत्न करिती । वैद्य डॉक्टर बोलाविती ।

तरी कय होते त्यांची स्थिति प्राण जाती कितीकांचे ॥५३॥

 

कोणी बिमार राहे वर्षोगणती । काय बिचार्‍याची फजीती ।

 नाही करणाराची संगति । अंतकाळीं हाल त्याचे ॥५४॥

 

त्याने काय बिमार पडावें इच्छिलें । म्हणोनि देवाने तसें केलें 

यांत काय प्रयत्न नाही झाले । त्याच्या हातें स्वहिताचे ॥५५॥

 

तैसेचि कोणी मरण इच्छिती । परि मृत्यु नये वर्षोगणती ।

 सांगा यांत मानवी इच्छेला किती । मान्यता आहे ॥५६॥

 

आम्ही म्हणतों सूत्रधार हरि । त्याच्या हातीं दैवाची दोरी ।

 मानव बाहुलीं कळसूत्री । इच्छाप्रयत्न फोल त्यांचे ॥५७॥

 

मित्रांनो ! सुंदर तुमचे प्रश्न । यांत मज न वाटे विचित्रपण ।

 हें तों आहे सहज अज्ञान  । रुजलें लोकीं ॥५८॥

 

सुखासाठी करिती धडपड । दु:खीं देव घालिती आड ।

मूळ न शोधितां बोलती बोजड । सिध्दान्तवाक्यें ॥५९॥

 

आम्ही पाषाण फेकला वरि । तो चुकोनि पडला मस्तकावरि ।

 येथे गुरुत्वाकर्षण काय करी । आपुल्याकडोनि ॥६०॥

 

वाफ्यांत मिरची-ऊस लाविले । तिखट-गोड फळ नशिबीं आलें ।

येथे पाण्याने काय केलें दिलें फळ जैसें तैसें ॥६१॥

 

देवभक्ति ऐसी सर्वत्र । परि ती स्वयें न चालवी सूत्र ।

 कर्में फळती पवित्रापवित्र । आपुलींच आपणा ॥६२॥

 

देवाचेंच हें असतें करणें । तरि लोक कां निर्मिता केविलवाणे 

कशासि लाविता अल्पकाळीं मरणें । जीवप्राण्यासि ॥६३॥

 

हें तों आहे आपुल्याच आधीन । जन्मा येणें आणि मरण ।

 यांत शंका घेण्याचें कारण । मुळीच नाही ॥६४॥

 

आपणचि इच्छा करितों । म्हणोनिया जन्माला येतों ।

 यांत कोणी कशाला पाठवितो । दुनियेवरी ॥६५॥

 

तैसेंचि आहे मरणाचें । आम्हीं कारण व्हावें बिघडविण्याचें ।

जेव्हा असह्य होय भोगणें साचें । तेव्हा म्हणावे ’ वाचवा ’ ॥६६॥

 

चोर चोरीसाठी गेला । आधी विचार नाही केला ।

संकटीं सापडतां म्हणे ’ बोला । कैसें केलें देवाने ? ’ ॥६७॥

 

कितीकांचें दुखवावें मन । हिरावूनिया आणावें धन ।

मग भोग येतां दैवावरून । बोल द्यावा देवासि ॥६८॥

 

माणसाला मरावें ऐसें न वाटे । परि मरणाऐसें केलें ओखटें ।

 पुढे आसक्तीने म्हणे ’ मोठें । देवा ! संकट ओढवलें ’ ॥६९॥

 

मरणाऐसें करावें आचरण । सोडोनिया तारतम्यज्ञान ।

मग भोग येतां म्हणावें  ’ नको मरण ’ । कैसें कोण मानील ॥७०॥

 

हें म्हणणें कांही इच्छा नोहे । इच्छेसाठी मार्ग आहे ।

तो वेळेवरीच करतां नये । त्यासि पाहिजे अभ्यास ॥७१॥

 

जन्मणेंहि इच्छेने होतें । परि त्यासि गर्भधारणा लागते ।

अंतरीचें प्रगट करावया तेथे । वेळ लागे तैसाच ॥७२॥

 

अग्नि देवोनि लोखंड तापवावें । आणि लगेच म्हणे थंड व्हावें ।

ऐसें कैसें घडेल स्वभावें । एकाएकी ॥७३॥

 

जीव कर्म करितां स्वतंत्र । त्याचा भोग  भोगतां परतंत्र ।

केलें त्याचें फळ येणार । इच्छेचाचि परिपाक तो ॥७४॥

 

सर्वासचि वाटे कधी न मरावें । सर्वांसचि वाटे राजे व्हावे ।

 परि इच्छा क्रियामार्गे न धावे । अचूकतेने तीव्रपणें ॥७५॥

 

तेणें भोगावा लागे नको तो भोग । जो पूर्वी घडला कार्य भाग ।

इच्छेनि व्यसनी होतां झाला क्षयरोग । जगणें मग साधेना ॥७६॥

 

म्हणोनि सांगतों जें जें होतें । तें इच्छाबळेंच प्रत्यया  येतें ।

यासि कर्महि पाहिजे इच्छेपुरतें । तरीच साधतें कार्य पुढे ॥७७॥

 

एक इच्छा असते चंचल । तींत होतो नेहमी बदल ।

 एक इच्छा असे निश्चल । जी कर्म करोनीच प्रकट होय ॥७८॥

 

कधी इच्छा इच्छेने प्रकट नोहे । ती कर्मानेच दिसों पाहे ।

 नाही म्हणोनिया काय होय प्रत्यक्ष दिसे कार्यावरि ॥७९॥

 

बादशहा ’ मी गरीब ’ बोलला । तरी ओळखती लोकचि त्याला ।

 तो लपल्याने न जाय लपाला । ढगाआड सूर्य जैसा ॥८०॥

 

तैसी इच्छा परिपाकासि आली । आतां वृत्ति फळासि भ्याली ।

 मग ऐनवेळीं दुजी इच्छा केली । न टळे फळ मृत्यूचें ॥८१॥

 

कित्येकांची प्रमाणें दिसती । मृत्यु आपणचि प्रकट करिती ।

 दिवस क्षण वेळा सांगती । येणार्‍या फळाची ॥८२॥

 

त्यांची आसक्ति देहांतूनि सुटली । म्हणोनि स्थिति प्रकट झाली ।

कित्येकांनी दुसर्‍यांचींहि कथिलीं । परिपक्व फळें ॥८३॥

 

विचारी पुरुष जे जाणते । फळ भोगाया होती सज्ज ते ।

आधीच वृत्ति अविचारपंथें । जाऊं न देती ॥८४॥

 

अविचारी ते कुमार्गे जाती । फळ भोगतां तळमळती ।

अति होतां भलतीच घेती । विकृति मनीं वेडयाऐसी ॥८५॥

 

आसक्तिकांची विकृति वाढली । देहबध्द वृत्ति भांबावली ।

दु:ख न सोसूनि धांव घाली । इच्छा त्याची मृत्यूकडे ॥८६॥

 

मागील कुकर्म असह्य झालें । म्हणोनि जीव द्याया धावले ।

 आतां मृत्यु येईल तरीच भलें । वाटे तयांसि ॥८७॥

 

खरोखर मरणें एक स्वप्न । शरीरपरिवर्तनाचें विरामस्थान ।

 परि केलेल्या पापपुण्याचें निवारण । तेणें नव्हे ॥८८॥

 

जैसा कपडा अंगींचा बदलावा । नवीन अंगावरि ओढोनि घ्यावा ।

 तैसाचि जीव मरणीं समजावा । शरीर बदली इच्छेने ॥८९॥

 

कधी ती इच्छा प्रकट ना कळे । प्रकट इच्छा त्वरित ना फळे ।

येथेचि विचारीहि गोंधळे । निवाडा करितां ॥९०॥

 

इच्छेने घेतलें तलम वस्त्र । मग तें टिको म्हणे वर्ष सहस्त्र ।

 ऐशा इच्छा होवोत मिश्र । परि भोगणें लागे आधीचें ॥९१॥

 

एकदा इच्छेने बसल्या घोडयावरि । चाबुक मारतां हौस पुरी। 

मग घाबरोनि म्हणे ’ देवा ! आवरी । सत्वरि आता ’ ॥९२॥

 

एकदा हातूनि गेला बाण । मग इच्छेऐसा नये परतून ।

 पहिलें इच्छाकर्म गतिमान । भोगावेंचि लागे ॥९३॥

 

नुसती इच्छा उपयोगी नाही । ती संस्कार बनूनि कर्मपण घेई ।

नवी इच्छाहि याच क्रमें येई । फळासि पुढे ॥९४॥

 

मन बुध्दि चित्त अहंकार । पांचवें अंत:करण आधार ।

 यांत दृढ होय इच्छासंस्कार । चाले व्यवहार त्यायोगें ॥९५॥

 

यांचे पालटतील संस्कार । तरीच सुखाचा होय व्यापार ।

एरव्ही इच्छा क्षणभंगुर । उपयोगी नये तत्काळ ॥९६॥

 

इच्छासंस्कार कर्तव्यसंस्कार । यांचा संग्रह पूर्वापार ।

तेंचि संचित असे थोर । पापपुण्यरूप ॥९७॥

 

त्यांतून जें भोगायासि आलें । तेंचि प्रारब्ध बोललें ।

 तें भोगणें प्राप्तचि झालें  । न चुके सहजीं ॥९८॥

 

तें भोगतां केली नवी धडपड । इच्छा आणि यत्न प्रचंड ।

 तें क्रियमाण देई संचिता जोड । लाभेल पुढे फळ त्याचें ॥९९॥

 

ऐसें चाललें रहाटचक्र । या नांव जीवनाचा व्यापार ।

 जन्ममरणसुखदु:खव्यवहार । खेळ इच्छा-प्रयत्नाचा ॥१००॥

 

हें जाणोनि प्रयत्नासि लागा । याविण भाग्याचा भ्रम वाउगा ।

 संत उपदेश देती जगा । क्रियमाण सुधारा म्हणोनि ॥१०१॥

 

क्रियेवीण मार्गचि नाही । कर्तव्य नरा देवपद देई ।

 तुकडया म्हणे बना निश्चयी । प्रयत्नवादी ॥१०२॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।

प्रारब्ध-विचार कथिला येथ । चौतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥




अध्याय ३४वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।