.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ३५ वा प्रयत्न-प्रभाव



अध्याय ३५ वा

प्रयत्न-प्रभाव

 

मागील अध्यायीं निरुपण । इच्छा-प्रयत्नें गुंफलें जीवन ।

 हानि लाभ जन्ममरण । त्यावाचून नसे कांही ॥१॥

 

आजची असो वा पूर्वीची । आपुलीच इच्छा बर्‍यावाईटाची ।

 आपणा सुख दे अथवा जाची । हें निर्विवाद ॥२॥

 

जें झालें तें होऊनि गेलें । आता पुढे पाहिजे सूधारलें ।

 इच्छा-कर्तव्यें लाभती फलें । सर्व कांही ॥३॥

 

यावरि श्रोत्याने प्रश्न केला । आपण इच्छा-कर्तव्याला मान दिला ।

 परि अचानक मृत्यु घडतो त्याला । कोणती इच्छा सांगाना ॥४॥

 

कोणी अकस्मातचि मेले । थोडेहि बिमार नाही पडले ।

 छातीमाजीं कळ आली वाटलें । तैसेचि गेले मृत्युमुखीं ॥५॥

 

कोणीं एकाएकी विहिरींत पडला । अथवा रानीं व्याघ्राने भक्षिला ।

 तो काय त्या प्रसंगाला । इच्छीत होता त्या पूर्वी ॥६॥

 

कोणास मार्गात मारोनि टाकिती । कोणी ठोकर लागतां मरती ।

 त्यांची काय ती इच्छा होती अथवा कर्तव्य ॥७॥

 

अहो ! हो देवा-दैवाची लीला । ठावी असोनि आपणाला ।

आम्हांसि लावाया कार्याला । सांगतां भलतें ॥८॥

 

मित्रा ! ऐसा न धरी भ्रम । सत्यचि आहे कथिलें तें वर्म ।

इच्छा-प्रयत्नेंचि देव-काल-कर्म । देती फळें ॥९॥

 

मीं तर आधीच सांगितलें । अचानक कर्तृत्व नाही दिसलें ।

परि पूर्वी तेंचि कार्य असेल घडलें । आघाताचें ॥१०॥

 

करतेवेळीं कळलें नाही । प्रसंग येतां वाटलें कांही ।

परि दैवावरि भार देवोनि राही । मोकळा बिचारा ॥११॥

 

जैसेंधन संग्रहीं न करता । तरि चोर कासयासि मारता ?

 पाहोनिया वाट चालता । तरि ठोकर कैसी लागती ॥१२॥

 

देहस्थानसंग निवडोनि । आधीच घेता उत्तमपणीं ।

आहारविहार करिता समजोनि । तरि दु:खी होता कैसा तो ॥१३॥

 

अविवेकक्रूरतागर्वबेहोशी । लागलीं मृत्यूच्या मार्गासि ।

निमित्त केलें व्याघ्रादिकांसि । परि तो प्रयत्न आपुलाचि ॥१४॥

 

आणि अचानक दिसे घडलें । तें तरी देहावरीच पडलें ।

जन्मचि न घेतां कोठलें । संकट त्यासि ॥१५॥

 

जन्म हाचि इच्छेचा खेळ । जगीं अनेक इच्छांचा मेळ ।

तेथे संघर्ष असे अटळ । सुखदु:खफळ कर्माचें ॥१६॥

 

येथे दैव मारतेंदेव मारितो । काय म्हणून आम्हीं म्हणतों ?

 आम्हीं काय कुणाचें खातों सांगा मज ॥१७॥

 

देवदैव आपुल्याने करी । तरि दोष लागेल देवावरि ।

 तैसी नाहीच देवाची कामगिरी । दु:ख देणें मानवासि ॥१८॥

 

आपणचि मार्ग चुकतों । इच्छेने संगतीने वाया जातों ।

मग ’ कैसें झालें ’ म्हणतों । एकाएकी फळ येतां ॥१९॥

 

तेथे जबाबदार धरतों दैव । अथवा म्हणतों देवाची माव ।

 नाहीतरि ग्रहगोलांचा प्रभाव । समजतों शुभाशुभ ॥२०॥

 

कोणी करिती ग्रहशांति । वाचती पोथी गिर्‍हे बांधती ।

 परंतु दुराग्रह बसला चित्तीं । तो न काढिती भ्रांतीचा ॥२१॥

 

नक्षत्रांचा सृष्टीवरि प्रभाव । परि ते निमित्तमात्रचि सर्व ।

आपुल्याचि शुभाशुभ कर्मांची ठेव । फळा येई त्या त्या वेळीं ॥२२॥

 

आपण बरें-वाईट बीं पेरलें । तें त्या त्या ऋतूंत उदया आलें ।

येथे कालाने काय केलें साह्य दिलें उदय होण्या ॥२३॥

 

परि नारळीस न येती रुई-फळें । पेरिलें तेंचि उगवतें बळें ।

 त्यासि फक्त साह्यचि दिलें जळें । तैसा देव साह्यकारी ॥२४॥

 

तो स्वत: कांही न करी । ज्याचें त्यास देई निर्धारी । 

 प्राप्त काळघडी ’ सारी । निमित्तमात्र करोनि ॥२५॥

 

काळ चाले आपुल्या गतीं । ईश्वर व्यापक सम स्थितीं ।

कर्मे आपचि फळा येती । सृष्टिनियमें आपुलीं ॥२६॥

 

कर्म करायाची स्वतंत्रता । ही जीवाहातीं महान सत्ता ।

 आपुल्या दैवाचा विधाता । आपणचि आहे ॥२७॥

 

ग्रहगोलांचा अनिष्ट प्रभाव । न पडावा म्हणोनि शोधिले उपाव ।

यांतहि कर्तबगार मानव । सिध्दिचि असे ॥२८॥

 

उपासनेद्वारें मानसिक शक्ति । वाढतां दु:खींहि सुखाची प्राप्ति ।

 ही ईश्वरी कृपाहि असे हातीं । जीवाच्याचि ॥२९॥

 

मित्रा ! हें विसरूं नको आता । आपणचि सर्व कर्ताहर्ता ।

 यांत देव-दैवाची वार्ता । आपणचि केली ॥३०॥

 

ऐसें धरूनि राहा जीवीं । शुध्द कर्मे करीत जावीं ।

 तरीच गति पावे बरवी । पुढे पुढे ॥३१॥

 

असो निसर्ग वा योगायोग । असो प्रारब्धाचाहि भोग ।

उत्तम प्रयत्नें त्यांचाहि ओघ । वळवितां येई ॥३२॥

 

तैसी नसती जरि शक्यता । जीव सर्वस्वीं पराधीन असता ।

 तरि शास्त्र कोण देते हातां । नाना उपाय सांगोनि ॥३३॥

 

’ धर्मे वागसत्य वद ’ । ऐसा कां सांगता वेद 

 सारेचि होतील विधिनिषेध । अनाठायीं मग ॥३४॥

 

पडोनि दैवादिकांच्या प्रवाहीं । जीव अधिकचि बुडेल डोहीं ।

 निघायासि मार्गचि नाही । उरला मगऐसें होतां ॥३५॥

 

परंतु मिथ्या हा विचार । जीवास असे कर्मस्वातंत्र्य ।

प्रयत्न करतां होतो उध्दार । आपुला शत्रुमित्र आपणचि ॥३६॥

 

वाईट चिंतितां वाईट होतें । जें जें साधूं तें साधतें ।

 मग कां न घ्यावें थोरपण येथे । सदगुण सारे शिकोनि ॥३७॥

 

यावरि श्रोता म्हणे ऐका । माझी अजूनि आहे शंका ।

जगीं धडपडती सर्वचि सर्वचि सुखा । परि एक एका न मिळे ॥३८॥

 

बरें करतांहि ब्रह्महत्त्या । लागे कित्येकांच्या माथां ।

कित्येकां जन्मभरि टाळ कुटतां । ताल तोहि न साधे ॥३९॥

 

याचें काय आहे कारण काय नाही केला प्रयत्न 

उलट सुखी असती पापें करून । कित्येक लोक ॥४०॥

 

याचें ऐका समाधान । लोक दिसती भिन्न भिन्न ।

परि त्यासि कारण त्यांचेच प्रयत्न । वेगळाले ॥४१॥

 

भिन्न संस्कारें भरले लोक । म्हणोनि न मिळती एकासि एक ।

 कोणी जन्मतांचि गुणी सुरेख । ताल न जन्मीं साधे कोणा ॥४२॥

 

संस्कारचि हे नान तर्‍हांचे । कांही गायनाचे कांही विद्वत्तेचे ।

 कांही चित्रकलेचेधाडसाचे । चातुर्याचे कित्येक ॥४३॥

 

कांही धनाचे कांही मानाचे । कांही अध्यात्म आणि भक्तीचे ।

 कांही असती कार्यशक्तीचे । संस्कार नाना ॥४४॥

 

ज्या प्राण्याने जो यत्न केला । तो संस्कार त्याच्या वाटयासि आला ।

म्हणोनि सर्वचि सर्वाला । येतां दिसेना ॥४५॥

 

एकास मिळे संपत्ति । परि अक्कल नाही त्यासि पुरती ।

एकास विद्वत्ता पिसे अति । परि खाया पुरेना ॥४६॥

 

एक अतीच धाडसी दिसतो । परि बुध्दीने शून्यचि भासतो ।

 म्हणोनि जीवनांत तो ठरतो । वेडा अथवा गुंड जैसा ॥४७॥

 

एक शब्दसृष्टि उभी करितो । एक गायनें जग डोलवितो ।

 एक अदभुत वाद्यें वाजवितो । लहानपणीं ॥४८॥

 

एक ध्यान करण्यांत प्रवीण । एका भक्तीचेंचि अवधान ।

 एकास विश्वज्ञान आत्मज्ञान । लहानपणीं ॥४९॥

 

याचें एकचि कारण । ज्याने जें कर्तव्य केलें समजोन ।

 तेचि त्याचे संस्कार पूर्ण । पावले तया पूर्वीचे ॥५०॥

 

इच्छा-संस्कार कर्तव्य-संस्कार । यांचेंच हें रूपान्तर ।

 ज्याने केला जो व्यवहार । तोच फळला यत्नें त्यासि ॥५१॥

 

प्रयत्नशील त्यासीच म्हणावें । इच्छेंत तेंच चिंतनीं असावें ।

हातांनी कार्य तेंचि घडावें । सर्वकाळ ॥५२॥

 

मनीं वसे तें ध्यानीं दिसे । ध्यानीं ठसे तेंचि स्थानी भासे ।

तैसेंचि कर्तव्य इच्छाउल्हासें । उमटों लागे जीवनीं ॥५३॥

 

या सर्वांचा मेळ झाला । तरीच यश प्रयत्नाला ।

 नाहीतरि अवघा गलबला । एक मिळेना एकाशीं ॥५४॥

 

याचा अनुक्रम ऐसा आहे । प्रथम मनीं संकल्प राहे ।

संकल्प दृढ होतां निश्चय । सत्कार्याचें रूप घेई ॥५५॥

 

कुणाचे संकल्प अवधी न लाविती । त्यांची तैसीच असते प्रकृति ।

कांही संस्कार मागील असती । कांही लाभती मातापित्याचे ॥५६॥

 

ऐसे संग्रहित होत जाती । त्यांची पुढे पुढे होई प्रगति ।

 तैसी तैसी लाभे गति । बर्‍यावाईट फळांची ॥५७॥

 

पूर्वी केले उत्तम यत्न । म्हणोनि हातीं आलें रत्न ।

वाईट वर्तनाने पुढे पतन । फळा येईल आपैसें ॥५८॥

 

पूर्वीची कमाई भोगली । पुढे सुकृत-जोड नाही केली ।

 त्यासि भोगावी लागली । राज्याअंतीं नर्कगति ॥५९॥

 

पूर्वी कांही पुण्य घडलें । म्हणोनि सुख वाटयासि आलें ।

 परि पाप करतां येतील घाले । निश्चयाने या पुढती ॥६०॥

 

पुण्यवंता आज कष्ट । याचें कारण आहे स्पष्ट ।

 एका संस्कारें तो पुण्यनिष्ठ । परि दुसरा फळला दु:खरूपें ॥६१॥

 

प्रयत्न सर्वांगीण आदर्श । सर्वचि संस्कारांचा उत्कर्ष ।

 ऐसें न होय म्हणोनि पुरुष । विचित्र फळें भोगिती ॥६२॥

 

तुकाराम आणि एकनाथ । दोघें सारखेचि अधिकारी संत ।

परि एका त्रास एक धनवंत । फळें हीं भिन्न संस्कारें ॥६३॥

 

सकाळीं उठण्याचें फळ निराळें । अभ्यासाचें फळचि वेगळें ।

उत्तम राहणीचें फळ आगळें । झाकवितां झाकेना ॥६४॥

 

चित्तशुध्दीचें वेगळें फळ । दानादिकांचें भिन्न सकळ ।

ज्ञान-साधनाचें फळ प्रांजळ । नाही मेळ एक-एका ॥६५॥

 

उत्तम कार्या फळ उत्तम । परि दुसरें एक वाईट कर्म ।

 म्हणोनि फळ लाभे अधम । मागे-पुढे याचें त्याचें ॥६६॥

 

कल्याणकर्म केलें जेवढें । तें कधीतरी फळेल मागेपुढे ।

हा सिध्दान्त व्यर्थ न घडे । कदाकाळीं ॥६७॥

 

म्हणोनि उपकार नाही फळले । पुण्य करितां अपकार झाले ।

हें म्हणणेंचि नाही शोभलें । शहाण्या जना ॥६८॥

 

फळ वेगळेंचि आज दिसतें । परि आलें कैसें धुंडितां तें ।

 सहज कळेलप्रयत्नचि होते । मागे केले ॥६९॥

 

उपकरपुण्य संग्रहीं पडलें । अपकाररूपें पूर्वपाप फळलें ।

 ऐसा मिश्र व्यवहार चाले । ओळखूं येना ॥७०॥

 

कोणत्या कर्माचें कोणतें फळ । हें जाणतां येना तत्काळ ।

 तेणें चित्तीं होय गोंधळ । वाढूं लागे कुशंका ॥७१॥

 

प्रत्येक कर्माचें वेगळें फळ । परि जाणताचि लावी मोल सकळ ।

 प्रयत्न-फळांची गुंतवळ । उकलेना सहजपणें ॥७२॥

 

उत्तमगाण्याचें फळ खाद्य नोहे । परि त्याहूनि त्यांत सुख आहे ।

 हें कैसें कळेल जोंवरि रुचि नये । गायनाची ॥७३॥

 

उपकार-सेवेंत आत्मसमाधान । हें फळचि असे महान ।

 तेथे कां इच्छावें बक्षीस अन्य । सज्जनांनी ॥७४॥

 

आपुले प्रयत्नचि सरस करावे । केले तरी करीतचि राहावें ।

 थोडें उणें होऊं न द्यावें । प्रयत्नामध्ये ॥७५॥

 

क्षण एक चुकीं न द्यावें । प्रयत्नासि दूरदृष्टीने जपावें ।

प्रयत्नहि सर्वांगीण व्हावे । सर्व सुखें भोगावया ॥७६॥

 

एरव्ही प्रयत्नाशिवाय कोणीच नाही । प्रयत्न होती सर्वदाहि ।

परि दु:खचि देती प्रयत्न कांही । जीवजना ॥७७॥

 

कांही प्रयत्न नांवलौकिका नेती । कांही प्रयत्नें होय फजीती ।

कांही प्रयत्न प्राणचि घेती । आपुले आणि परक्यांचे ॥७८॥

 

म्हणोनि प्रयत्न करावे चांगले । कर्त्या सज्जना पाहिजे पुसलें ।

लोभप्रतिष्ठेसि जे नाही भाळले । तेचि खरे प्रयत्नशील ॥७९॥

 

कांही प्रयत्न उलटे घडती । त्यांचीं फळें मरणतुल्य येती ।

 कांही प्रयत्न प्रांजळ होती । तेणें पावती उत्तम जन्म ॥८०॥

 

मरणासीहि प्रयत्नचि कारण । जन्मण्यासहि प्रयत्नचि प्रमाण ।

 भोग-सुख-दु:खांचें निधान । प्रयत्नचि ॥८१॥

 

कांही प्रयत्न योजनारूप होती । त्यांनी कीर्तिपळें लाभती ।

कांही प्रयत्नीं शिकस्त करिती । मुक्ति पावती साक्षात्कारें ॥८२॥

 

कांही प्रयत्न संचितीं पडती। प्रारब्ध भोगतां  जे जे घडती ।

नाही मुळीच उपभोगाची वृत्ति । त्यांचे प्रयत्न कळसाचे ॥८३॥

 

त्यांचे प्रयत्न शुभप्रारब्ध झाले । दोन्ही मिळोनि देवपणासि आले ।

 आपण आपणांत मिळाले । साक्षात्कारें आत्मत्वें ॥८४॥

 

मित्रा ! म्हणोनि प्रयत्नशील व्हावें । प्रारब्धाचें थोरपण न मानावें ।

कर्तव्याने चमकून उठावें । भूमंडळीं उत्साहें ॥८५॥

 

अमका प्रारब्धें श्रीमंत झाला । अमका पुण्य करितां दैवें गिळिला ।

 अमका ’ देव देव ’ म्हणतां तरला । प्रयत्नाविण ॥८६॥

 

हें तों म्हणणें अज्ञानाचें । पुन्हा करूं नको उच्चार वाचें ।

सुप्रयत्नासि फळ सौख्याचें । निश्चयें आहे ॥८७॥

 

दुसर्‍याचें फळ पाहोनि झुरावें । आपण कांहीच न करावें ।

 हें तों लक्षण आहे बरवें । अधोगतीचें आपुल्या ॥८८॥

 

आमुचें पूर्वसुकृत नाही बळी । म्हणोनि हात ठेवावा कपाळीं ।

 हें तों आमुच्याने कधीकाळीं । घडोंचि नये ॥८९॥

 

नाही तेंचि आता कमावूं । आहे तें तें अधिक वाढवूं ।

 इच्छा फलद्रूप करोनि घेऊं । हाचि करावा निर्धार ॥९०॥

 

याच निर्धारें वाल्या कोळी । पुण्यश्लोक झाला भूमंडळीं ।

 संत योगी वीर बळी । गाजले मानव-इतिहासीं ॥९१॥

 

वेश्यागामी बिल्वमंगल । यत्नें झाला सूरदास निर्मल ।

आपणासह महीमंडल । केलें पावन भजनाने ॥९२॥

 

हेंचि शिकावें सत्संगतीने । यानेचि मानव होती शहाणे ।

भाग्य उजळेल सूर्याप्रमाणें । उद्योगशील झालिया ॥९३॥

 

प्रत्येक उद्योगा फळ पावे । शेतकर्‍यासि हितगुज पुसावें ।

 प्रयत्नें एक बीज लावावें । फळ पावावें कणसापरी ॥९४॥

 

प्रयत्नविण स्वयंपाक झाला । प्रयत्नाविण घास मुखीं गेला ।

प्रारब्धानेच व्यवहार चालला । ऐसें कोण सांगो शके ॥९५॥

 

पटवावया प्रारब्धवाद । त्यासहि लागे प्रयत्न सिध्द ।

विमानदूरध्वनि आदि शोध । लाविले काय प्रारब्धें ॥९६॥

 

उघड आहे प्रयत्नाची थोरी । प्रयत्नापुढे प्रारब्ध ताण करी ।

हें म्हणणेंचि अपुरें सर्वतोपरीं । दूरदृष्टीने पाहतां ॥९७॥

 

मुख्य असे प्रयत्नचि केवळ । प्रारब्ध हेंहि प्रयत्नाचें फळ ।

 वृक्षावांचोनि  झालें फळमूळ । कोण म्हणे ॥९८॥

 

प्रयत्न सोडोनि प्रारब्ध धरलें । तरि ते प्राणी दोघांतूनि गेले ।

नाही प्रयत्नहि पूर्ण केले । प्रारब्ध पळालें दूरदेशीं ॥९९॥

 

कोणी एक झाड लावलें । दिवसेंदिवस सुकतचि गेलें ।

 त्याचेकडे दुर्लक्ष केलें । कोणी एकीं ॥१००॥

 

लोक म्हणती आयुष्य सरलें । कोणी म्हणती किडयांनी ग्रासलें ।

 कोणी म्हणती त्याचें प्रारब्ध आलें । मरणस्थानीं ॥१०१॥

 

कोणी म्हणती येथे झाड जगेना । कोणी म्हणती चुकूं द्या यातना ।

कोणी म्हणती काय आपणा- । हातीं आहे ॥१०२॥

 

अरे ! हें सर्वचि आहे खरें । परि प्रयत्न करोनि पहा बरें ।

झाड जगतें की ऐसेंचि मरे । प्रयत्न केलिया ॥१०३॥

 

म्हणोनि त्यास खत घातलें । तारतम्य ठेवोनि सांभाळिलें ।

 पाणी देवोनि वाचविलें । मूळडाळ सर्वचि ॥१०४॥

 

पुढे पुढे झाड फुललें । पुष्पींफळीं बहरोनि आलें ।

प्रयत्न केल्यानेचि झालें । आहेना हें प्रत्यक्ष ॥१०५॥

 

कलमें करोनि नानापरीं । फुलें आणिलीं  बहुप्रकारीं ।

 हात ठेवितां कपाळावरि । ऐसें कधी होईल का ॥१०६॥

 

तैसेंचि मानवाचें जीवन । उन्नत व्हावया हवा प्रयत्न ।

 अपमृत्यु आदि धोके दारूण । टळती संशोधन केलिया ॥१०७॥

 

मानव सृष्टीहूनि थोर । तो ईश्वराचा अंशावतार ।

 अचूक प्रयत्न दैवी हत्यार । निर्मू शके प्रतिसृष्टि ॥१०८॥

 

म्हणोनि सांगतों प्रयत्न करा । विचारशक्ति प्रयत्नांत भरा ।

शिका शिकवाप्रयत्न सारा । व्यापूं द्या गांवोगांवीं ॥१०९॥

 

ज्या ज्या राष्ट्रांनी ऐसें केलें । त्यांचें वैभव शिगेस गेलें ।

जीवनमान आदि वाढलें । इच्छेसारिखें तयांचें ॥११०॥

 

प्रारब्धवादी शिथील झाला । प्रयत्नवादी चेतना पावला ।

 शोध करीत पुढे गेला । दिगंतरीं ॥१११॥

 

केलें मंगळावरि उड्डाण । चढला हिमगिरिशिखरीं पूर्ण ।

 शोधिलें अग्निअस्त्र अणुअस्त्र महान । हैड्रोजनादि ॥११२॥

 

ऐकती करोडो मैलांवरून । परस्परांचें गायन-भाषण ।

विश्व हें आटोक्यांत आणून । घर केलें राहण्याचें ॥११३॥

 

प्रयत्नाची शिकस्त झाली । अजूनिहि जागा आहे उरली ।

 धाव कधीच नाहीं संपलीं । प्रयत्नशीलांची ॥११४॥

 

प्रयत्नें देवपण पावला भक्त । प्रयत्नें योगी झाला जीवन्मुक्त ।

 प्रयत्नें बध्द झाला निरासक्त । विषयामाजीं ॥११५॥

 

प्रयत्नें गांव झाला आदर्श । प्रयत्नें सुखी होय स्वदेश ।

 प्रयत्नें विश्वशांतीचे सायास । सफल होती ॥११६॥

 

यासाठी प्रयत्न करावे आपण । मिरवावें देवाचें थोरपण ।

अंगां येईल अहंकार म्हणोन । देव मध्यस्थीं घालावा ॥११७॥

 

प्रयत्नें राज्य समृध्द करावें । प्रयत्नें भूमंडल डोलवावें ।

 प्रयत्नेंचि दासपण शोभवावें । कार्यप्रभावें ॥११८॥

 

प्रयत्नें मानव होई उन्नत । गांवचि नव्हेहालवी दिक्प्रांत ।

 ही अनुभवाची मात । विसरूं नका तुकडया म्हणे ॥११९॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।

कथिला प्रयत्नवाद समर्थ । पस्तिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥




अध्याय३५वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।