.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय २५ वा देव-देवळें



अध्याय २५ वा

देव-देवळें

 

विचारांनी असती उदार । साधुसंत थोरथोर ।

तेथे नाही भेद-संचार । कोण्याहि प्रकारें ॥१॥

 

परंतु त्यांचे पंथानुयायी । आपुलालीच लाविती घाई ।

 भिन्न भिन्न त्यांचे देवहि । एक न मिळती एकाशीं ॥२॥

 

वेगळे देव वेगळे धर्म । वेगळालें त्यांचें  उपासनाकर्म ।

 सांगा होईल कैसा संगम । भावनांचा त्यांच्या ॥३॥

 

संतांचें घेतलें  संमेलन । तेवढयापुरतें झालें मिलन ।

 परंतु नित्याच्या उपासनेने । वाढे अंतर सर्व जनीं ॥४॥

 

ज्याचा विशेष बोलबाला । जेथे संपत्तीचा पेल झाला ।

लोक भजती त्याचि दैवताला । कोणी दूजाला कवटाळिती ॥५॥

 

यासि नित्यासाठी  उपाय । सांगा सहजप्रभावी काय ?

 जेणें संस्कारचि होतील एकमय । आत्मीयतेचे ॥६॥

 

श्रोतियाचा प्रश्न मार्मिक । गांव-हितासि आवश्यक ।

संतांऐसेंचि देवांचें ऐक्य । साधलें पाहिजे ॥७॥

 

आपापले धर्म-कर्म-देव । भिन्न समजती मानव ।

तेणें असोनि एकचि गांव । झाले भाव वेगळें ॥८॥

 

आपुलालें चिन्ह ठेवावें । त्यावरोनि संप्रदाय ओळखावे ।

 म्हणोनि मांडिलें दुकान बरवें । आपापलें या पंथांनी ॥९॥

 

एक म्हणे राम मोठा । दुसरा म्हणे कृष्ण मोठा ।

तिसरा म्हणे शंकरचि मोठा । सर्वांहूनि आमुचा ॥१०॥

 

कोणी म्हणती देवी मोठया । कोणी पूजिती मानविणी नरोटया ।

 कोणी म्हसोबा-बहिरम-सोटया । थोर म्हणोनि तंडती ॥११॥

 

कोणी म्हणती हरिहर । कोणी वंदिती नाल्याहैदर ।

कोणी पूजिती सर्पव्याघ्र । कोंबडी-बकरी देवोनि ॥१२॥

 

कांही सोनियाचे देव करिती । वेळ पडल्या विकोनि खाती ।

 ऐसी आहे देवाची फजीती । पूजकांमागे ॥१३॥

 

कांही देवासि बलिदान देती । देवीच्या मिसें मांस खाती ।

 तीर्थ म्हणोनि मद्य पिती । पिसाळलेले ॥१४॥

 

देव देवळीं दगडाचा । देवपाट करिती सोनियाचा ।

धाक पडे चोरटयांचा । म्हणोनि पहारे देवुळीं ॥१५॥

 

आपापल्या हौसेचे शृंगार । चढवोनि देती देवावर ।

 मग शृंगारावरीच टपती नेत्र । देव कांही दिसेना ॥१६॥

 

एक म्हणती गळां सुंदर माळ । एक म्हणती रत्नमुकुट झळाळ ।

 एक म्हणती सोनियाची प्रभावळ । देवाभवती शोभली ॥१७॥

 

एक म्हणती सुवर्ण-सिंहासन । एक म्हणती भरजरी शालू पूर्ण ।

 एक म्हणती केशर कस्तुरीलेपन । कंठीं नवरत्न देवाच्या ॥१८॥

 

कांही म्हणती देव उठला । आता बसला आता जेवला ।

 विश्रांति आता करूं लागला । विडा घेवोनि एकांतीं ॥१९॥

 

देवासि झोपवा मखमलीवरि । दारें लावूनि घ्या बाहेरि ।

पाउलें न चुरतां कोमल करीं । झोप त्यांना लागेना ॥२०॥

 

सारांश आपणांसि जें आवडे । तेंचि देवादिकासि पुरवावें लाडें ।

मगचि देवाची प्रसन्नता घडे । ऐसें कांही मानिती ॥२१॥

 

मग ते असोत दुर्गुण सदगुण । याचा विचार करतो कोण ?

 अंधश्रध्देच्या प्रवाहीं लागून । तैसेचि चालती पुढे पुढे ॥२२॥

 

पदसेवनअर्चनवंदन । दास्यसख्यआत्मनिवेदन ।

यांचा बहिरंग अर्थ घेवोन । भक्ति करिती सोंगाऐसी ॥२३॥

 

कोणी विरहभक्तींत रंगती । कोणी संगभक्ति अवलंबिती ।

 कोणी आत्मभक्तीची करिती स्तुति । वाटेल तैसी ॥२४॥

 

कोणी अल्ला बडा की राम बडा । हेंचि वितंडितां धरिती नरडा ।

 फोडिताति कडाकडा । मूर्ति हातीं धरोनिया ॥२५॥

 

येशूभक्त निंदा करी । म्हणे हिंदूचा देव व्यभिचारी ।

सोळा हजार करी नारी । कसला देव ॥२६॥

 

करावयाचें तें कोणी न करी । भांडणें करिती घरोघरीं ।

वा रे ! मूर्तिपूजेची थोरी । कळली लोकां ॥२७॥

 

देवाकरितां करोनि भांडणें । कोर्ट-कचेरीमाजीं जाणें । 

 सत्य बोलतों ’ म्हणोनि शपथ घेणें । देवादिकांची ॥२८॥

 

ऐसें ज्याने त्याने असत्य केलें । म्हणोनि जन नास्तिक झाले ।

 म्हणती काय होतें देव पूजिले । कितीहि तरी ॥२९॥

 

समजण्याची दृष्टीच गेली । म्हणे देवाची प्रतिष्ठा काय उरली ?

 वरि बैसोनि लघवी केली । उंदिराने ॥३०॥

 

उलट कोणी म्हणे देव जागृत । भाव धरिल्या पावे त्वरित ।

 मी म्हणेन भाव तेंचि दैवत । कां न म्हणावें ॥३१॥

 

एके ठिकाणीं देव जागृत । बाकी ठिकाणीं काय भूत 

 कैसी झाली समजूत । उलटी आमची ! ॥३२॥

 

लोकीं जो हा दुजाभाव झाला । तो पुजारी-पंडेगिरीने केला ।

 शास्त्रेंहि लावोनि आधाराला । समाज नेला अधोगतीं ॥३३॥

 

यासीच म्हणविलें देवपूजन । पुजारी सांगतील जें जें कथून ।

भाविक ठेवोनि बुध्दि गहाण । करितीकळे देव कैसा ॥३४॥

 

जैसी ज्याची भावना । तैसाचि देव त्याचा जाणा ।

 तेथे भावनेसि प्रमुखपणा । सहजचि येतो ॥३५॥

 

आणखी एक मुख्य खूण । ज्या संताने केलें देवस्थान ।

त्याच्या थोरपणावर मोठेपण । मानिलें लोकीं देवाचें ॥३६॥

 

सज्जनाने दगड पूजिला । इतरांना तो मोठा देव झाला ।

वाढला त्याचा लौकिक भला । यात्रा भरली त्यापरी ॥३७॥

 

पंढरीसि ज्ञानदेव न जाता । संतांचा मेळा न भरता ।

 कोण तेथीचा देव पूजिता सांगा मज ॥३८॥

 

देव सर्वांठायीं सारखा । परि संगतीने भासे प्रियसखा ।

 उत्तम असोनिहि होतो पारखा । लोभीलबाड पुजार्‍यामुळे ॥३९॥

 

ऐसें झालें आम्हांमाजी । म्हणोनि भावना वाढली दुजी ।

 चुकली देवभजनाची अर्जी । वाढली मर्जी धनाची ॥४०॥

 

जें धनसंपन्न देवस्थान । त्यासि आलें मोठेंपण ।

उपासनेसाठी खर्चावें धन । देव प्रसन्न म्हणती तेणें ॥४१॥

 

परि देव मोठा नव्हे श्रृंगाराने । देव मोठा नव्हे भव्य देवळाने ।

देव मोठा नव्हे घंटे वाजविल्याने । अहोरात्र ॥४२॥

 

देव मोठा नव्हे नंदादीपाने । देव मोठा नव्हे होम-हवनाने ।

 देव मोठा नव्हे साळुंकेने । पर्वता एवढया ॥४३॥

 

देव मोठा नव्हे निसर्गशोभेने । देव मोठा नव्हे महायात्रेने ।

देव मोठा नव्हे वैभवप्रतिष्ठेने । पूजकांच्या ॥४४॥

 

देव मोठा भावनेने । भावनेच्या उच्चतेने ।

अंतरींच्या उपासनेने । सर्वांसि सारिखा ॥४५॥

 

मग तो असो कोणीहि देव । तेथे वाया भेदभाव ।

 एकाचि चैतन्याचे ओतीव । अलंकार ते ॥४६॥

 

देव एक असोनि अनंत झाला । नाना रूपें धरोनि नटला ।

 परि तो पाहतां एकचि दिसला । कार्यरूपाने ॥४७॥

 

हरिहरा भेद नाही । एक एकाचे हृदयीं ।

 रामरहीम एकचि पाही । देवी-देवहि एकात्मक ॥४८॥

 

धनुर्धारी झाला राम । मुरली धरतां मेघश्याम ।

कटीं कर ठेवितां सगुणब्रह्म । विठ्ठल म्हणवी ॥४९॥

 

सर्व देव एकचि असती । भिन्न साधना करोनि स्मरती ।

 भिन्न रूपें धरिलीं किती । तरी तत्त्वत: एकी तयांची ॥५०॥

 

एकचि व्याप्ति एकचि दीप्ति । प्रसंगें नानारूपें धरिती ।

 एकाच ध्येयासाठी लाविती । प्राण पणीं देव सर्व ॥५१॥

 

कोणा सज्जना दु:ख न व्हावें । कोणी दीन भुकेले न राहावे ।

 यासाठी प्राण समर्पावे । प्रसंग पडतां ॥५२॥

 

ऐसें ज्यांनी अंगें केलें । त्याच कारणीं धारातीर्थी पडले ।

ते सर्व देवदेवता झाले । मृत्युलोकीं ॥५३॥

 

सज्जनांचें परित्राण । कंटकांचें निर्दालन ।

सत्य न्याय सदगुणांचें रक्षण । कार्य हें सर्व देवांचें ॥५४॥

 

ऐसें असतां वितंडणें । देवादेवांचीं करावीं भांडणें ।

 आपुल्या हौसेसाठी कां बुडविणें । चरित्र दैवतांचें ॥५५॥

 

सज्जनें टाळावी ही वृत्ति । आदर द्यावा सर्वाप्रति ।

 भिन्न न ठेवावे कोणी पंथी । एकचि असती म्हणोनिया ॥५६॥

 

सर्वांना मंदिराचें मूळतत्त्व । आणि उपासनेचें महत्त्व ।

 समजावोनि द्यावें देवत्व । कवण्या कार्यी असे तें ॥५७॥

 

तेणें निरसूं लागेल भेद कल्पना । आकळेल यथार्थ उपासना ।

 साधेल आपापल्या देवस्थानां । मूळतत्त्वीं सार्थक ॥५८॥

 

यावरि एकाने केला प्रश्न । देवस्थानांचें मूळतत्त्व कोण ?

 हीं मंदिरेंचि भिन्न भिन्न । झालीं कारण पंथभेदा ॥५९॥

 

यांच्यावरोनि फिरवावा ट्रॅक्टर । म्हणजे सर्वचि होतील एकाकार ।

 काय मंदिरांवांचूनि पडेल अंतर । भक्तींत कांही ॥६०॥

 

याचें ऐका समाधान । ऐक्य न साधे भावना दुखवून ।

 त्यासाठी मंदिराचें तत्त्वज्ञान । उजळणें हेंचि उचित ॥६१॥

 

सुंदर निसर्गरम्य स्थान । तेथेहि साधे देवाचें भजन ।

मठमंदिर नसतांहि मोहून । मन पाही देवाकडे ॥६२॥

 

परि समाधिस्थानें मठमंदिरें । देवदेवळें देव्हारे ।

यांच्या स्थानप्रभावें स्फुरे । सदभाव मनीं सकळांच्या ॥६३॥

 

म्हणोनि संतीं घातला पाया । लोकीं चारित्र्यनीति वाढाया ।

 अभ्यासियांसि एकान्त द्याया । मंदिरायोगें ॥६४॥

 

पुरुष व्यवहारीं भांबावती । कोठे पुत्रपौत्रामाजीं कलह होती ।

 क्षणभरीहि न मिळे शांति । विचारासाठी ॥६५॥

 

ऐशावेळीं उपासनास्थळीं जावें । महापुरुषांचें स्मरण करावें ।

त्यांचें धारिष्टय चिंतोनि घ्यावें । समाधान ॥६६॥

 

वेळोवेळीं विसरे वृत्ति । विचारांचा आठव मंदिरें देती ।

 सतकर्तव्य-भावना जागविती । स्थळें ऐसीं ॥६७॥

 

वार्षिकोत्सवपुण्यतिथि । चातुर्मास्य आणि जयंति ।

सामुदायिकपणें होतीं । मंदिरस्थानीं ॥६८॥

 

सामुदायिकतेचें साधन । गांवाच्या आनंदाचें स्थान ।

 पावित्र्याचा उगम पूर्ण । स्थानीं ऐशा ॥६९॥

 

मंदिरें म्हणजे पाठशाळा । चाले शिक्षणाचा सोहळा ।

झाला निधि सर्व गोळा । याच कार्यी लावावा ॥७०॥

 

जागवावी गांव-संस्कृति । वाढवावी सर्वांत प्रीतिनीति ।

 यांचीं केंद्रें म्हणोनि होतीं । मठमंदिरें सर्वहि ॥७१॥

 

सर्वांभूतीं प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव ।

 यासाठीच गांवोगांव । मंदिरें केलीं निर्माण ॥७२॥

 

ऐसी उच्च धरोनि भावना । झाली मंदिरांची स्थापना ।

परि आज तयांची रचना । विपरीत दिसे ॥७३॥

 

मंदिरें क्षेत्रें दुकानें झालीं । पूजा कमाई करूं लागली ।

 दक्षणापात्रें पुढें आलीं । पोटासाठी ॥७४॥

 

मंदिरीं बांधती म्हशीगायी । घाण दिसे ठायीं ठायीं ।

कसली पूजा धूपदीपहि सारा धुव्वा तंबाखूचा ॥७५॥

 

पुजारी खेळती चौसरी । वेश्यादिकांचें गाणें मंदिरीं ।

होती तमाशे-दंढारी । परोपरीं देवळामाजी ॥७६॥

 

मंदिराचा भव्य वाडा । झाला गुंडांचा आखाडा ।

 धाक पडे घालाया मोडा । सज्जनासि ॥७७॥

 

स्त्रिया बापडया मंदिरीं जाती । अंधानुकरणें ऐकती पोथी ।

सर्व लक्ष रंजनाप्रति । स्थिरत्वें कोणी ऐकेना ॥७८॥

 

पदोपदीं भांडणें होतीं । भोळया भक्तांची फजीतीं ।

 धनासाठी ओढाताण करती । पंडेपुजारी ॥७९॥

 

ऐशा स्थितीला बसाया आळा । सर्व लोकांनी करावा निर्वाळा ।

 मंदिराचा निधि सगळा । समाज-कार्या लावावा ॥८०॥

 

पुजारी असतील बेढंगे । सांगोनियाहि सरळ न वागे ।

 तें बदलावे संघटनेयोगें । सर्व गांव मिळोनि ॥८१॥

 

पुन्हा सुधारावी मंदिर-योजना । सुरू करावें लोकशिक्षणा ।

 गांभीर्य आणावें तया स्थानां । सदविचार वाढावया ॥८२॥

 

नवें मंदिर न बांधावें । जुनें तें स्वच्छ सुंदर करावें ।

आहे त्यासचि लावावें । पुन्हा सत्कार्यीं ॥८३॥

 

सांवरोनि गलिच्छ पसारा । निर्मळ करावें देवद्वारा ।

 प्रसन्न फुलें झाडें वारा । शांति द्याया उपासकां  ॥८४॥

 

उघडावीं त्यांत वाचनालयें । औषधालयेंयोगविद्यालयें ।

 उपासनेची ठेवोनि सोय । सर्वांकरितां ॥८५॥

 

आपुले आपुले देवुळींच जावें । इतरांनी दुरूनीच पहावें ।

 देव वाटेल ऐसें बरळावें । हें तों असे वेडेपण ॥८६॥

 

एकाचा देव दुसर्‍यासि शिवे । तरि पाप वाढेल गाडे पेवें ।

म्हणोनि ज्याचे देव त्यानेच पुजावे । म्हणती न मानावे येरांनी ॥८७॥

 

हें तों म्हणणें सांप्रदायिकांचें । अल्पज्ञानी व्यापारियांचें ।

 माझ्या मतें हें विकासाचें । धोरण नव्हे ॥८८॥

 

ऐसें करणें सोडोनि द्यावें । असतील त्या देवळां निर्मल ठेवावें ।

 सर्व लोकांसि खुलें असावें । दर्शनासाठी स्थान तें ॥८९॥

 

देव असे पतितपावन । तो न पळे पतिताला भिऊन ।

 सर्वचि त्याचीं लेकरें समान । तयालागी ॥९०॥

 

देवासि नाही जातपात । देव भक्ताचाचि जातिवंत ।

 तेथे नसावा अभक्ताचा पंथ । देवळामाजीं ॥९१॥

 

देव महार मांग चांभार । देव भंगी लभाणी वडर ।

 देव माळी ब्राम्हण कुंभार । सर्व जाती ॥९२॥

 

देव क्षत्रिय वैश्य गोवळी । देवें सृष्टि व्यापली सगळी ।

 देवचि देव भूमंडळीं । संचला आहे ॥९३॥

 

म्हणोनि असावें सर्वांचें मंदिर । ब्राह्मण असो वा महार ।

शुध्द करील जो आचार । त्यासि अधिकार मंदिराचा ॥९४॥

 

देवळाचे पंच गांव । गांवचा प्रत्येक मानव ।

मानवांचा वाढेल गौरव । प्रचार व्हावा ऐसाचि ॥९५॥

 

सर्वांनी एक वेळ ठरवावी । मिळोनिया प्रार्थना करावी ।

 प्रार्थनीं  उत्सवीं भाषणें द्यावीं । योग्य ऐसीं ॥९६॥

 

प्रत्येकाला बोलतां यावें । सर्वांनी हें अभ्यासावें ।

आपुलें सुखदु:खहि मांडावें । भाषणायोगें ॥९७॥

 

तैसींच ठेवावीं प्रवचनें । राष्ट्रीय वृत्ति वाढे जेणें ।

 माणसासि माणसाने । पूरक व्हावें म्हणोनिया ॥९८॥

 

प्रमाणें द्यावीं ऋषिजनांचीं । आठवण मागच्या इतिहासाची ।

 तैसीच बांधावी धारणा पुढची । भाषणायोगें ॥९९॥

 

कीर्तनउत्सवप्रवचन । नुसतें नसावें मनोरंजन ।

गांवकर्‍यांचें उजळेल जीवन । ऐसे कार्यक्रम करावे ॥१००॥

 

ऐसें हें मंदिर सजवावें । उपद्रवी लोक बाहेर करावें ।

सत्कीर्ति सुबुध्दीने भरावें । देवस्थानांसि ॥१०१॥

 

मानवता-विकासाचें केंद्र । सात्विक संपत्तीचें आगर ।

 ऐसें ठेवावें गांवीं मंदिर । ग्रामसंस्कृति राखाया ॥१०२॥

 

शुध्द प्रेम वाढावया । मंदिरांची उपासना या ।

उपासनेसि सक्रियता द्याया । लागा सर्व गांवकरी ॥१०३॥

 

नका पाहूं पंथ-भेद । नका उकरूं नसते वाद ।

मंदिरादिकांचा हेतु हाचि शुध्द । जवळ यावा मानव ॥१०४॥

 

म्हणोनीच देवाची मध्यस्थी । एरव्ही देवाचीच सर्व क्षिति ।

 परि जाणिवेने जन लाभ घेती । एरव्ही नाडती प्राणी सारे ॥१०५॥

 

ती जाणीव द्याया देवस्थान । साधुसंतीं केलें निर्माण ।

 तेथे शिकावें ’ जनीं जनार्दन ’ । हेंचि सूत्र ॥१०६॥

 

कोणत्याहि देवुळीं जावें । तेथे आपुलें उपास्यचि पाहावें ।

सर्व रूपीं अवलोकावें । एक तत्त्वहीच निष्ठा ॥१०७॥

 

सर्व देवांसि आदरावें । जेथे सात्विक पूजेचे गोडवे ।

दिव्य गुणकर्मानेचि देवत्व पावे । प्रत्येक व्यक्ति ॥१०८॥

 

तेथे भेद कां मानावा कोणीहि भजो कोणत्या देवा । 

 भावचि देव ’ कळतां ठेवा । एकचि लाभे सर्वांसि ॥१०९॥

 

शंकराचार्ये देव-पंचायतन । मांडोनि साधिलें भक्तसंघटन ।

इष्टदेवासह इतरांचें पूजन । कुठलें स्थान विरोधासि ॥११०॥

 

विरोध देवांचा तर काय । परि जीवांचाहि येथे न साहे ।

 सर्व जीवीं देवचि आहे । म्हणोनि प्रेम द्यावें तयां ॥१११॥

 

सुखी-समृध्द करावें गांवा । यासाठीच मंदिर-निधि योजावा ।

 ही सेवाचि आवडे देवा । आपुलिया जीवांची ॥११२॥

 

जीवांचिया सेवेचें तत्त्व । तैसेंच कार्याचें महत्त्व ।

आणि स्वरूपाचें दिव्यत्व । सर्वचि देवांचें समान ॥११३॥

 

ऐसी समान धारणा मनीं । धरोनि वागतां सर्वांनी ।

मठमंदिरें पंथभेद कोणी । आड न येती विकासाच्या ॥११४॥

 

ऐक्य वाढवाया कारण । होईल प्रत्येक देवस्थान ।

करितां शुध्द तत्त्वें पुनरुज्जीवन । तुकडया महणे ॥११५॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-सानुभव संमत ।

 मंदिर-मर्म कथिलें येथ। पंचविसावा अध्याय संपूर्ण ॥११६॥



अध्याय२५   वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।