.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय २७ वा सामुदायिक प्रार्थना



अध्याय २७ वा

सामुदायिक प्रार्थना

 

मूर्तिपूजा नामजप । यांचीं मूळतत्त्वें उज्जवलरूप ।

 परंतु त्यांचा विपर्यास खूप । जाहला लोकीं ॥१॥

 

देवीदेव दिसती जिकडे तिकडे । सांदी-बिदींचे गोटे खडे ।

 कोणी न बघती तयांकडे । आवडीने ॥२॥

 

नेमकी प्रभावशाली मूर्ति । जी बघतांचि देई स्फूर्ति ।

होईल तात्त्विकतेची पूर्ति । ऐसी दिसे क्वचितचि ॥३॥

 

तेथेहि भाविकतेचा अतिरेक । जेणें बुध्दिमान होती नास्तिक ।

 म्हणती हा गोंधळ असे घातक । भक्तीच्या नांवें ॥४॥

 

मूर्ति जयाचें स्मारक । त्याच्या गुणाकर्मांची नाही भूक ।

मूर्तीच देव ठरवोनि लोक । करिती अति वेडेचार ॥५॥

 

कोठे काकडआरती शेजारती । चाले पंचपदी पूजा पोथी ।

नाही शिस्त गांभीर्य शांति । सात्विक वृत्ति स्फुरेचि ना ॥६॥

 

एक जाती एक येती । मधेच वाकडे उभे राहती ।

 फुलें अक्षता कशाहि फेकती । मंत्रपुष्पांजलीच्या ॥७॥

 

नगारा जातो एकीकडे । टाळ-घंटयांचा गोंधळ उडे ।

 टाळया कसल्यागारपीट पडे । ऐसेंचि वाटे ॥८॥

 

असल्या बाजाराने कांही । उपासनातत्त्व साधत नाही ।

 तेथे शिस्त शांति सात्विकता येई । तरीच लाभ सर्वांसि ॥९॥

 

याचसाठी सामुदायिक प्रार्थना । हा मार्ग दाविला जना ।

हीच आजची उपासना । सर्वांचिया हिताची ॥१०॥

 

श्रोतीं विचारिला होता प्रश्न । पंथ भेद मिटाया उपाय कोण ?

 कैसें राहील ग्रामजीवन । एकजुटीचें ॥११॥

 

नाना पंथ असती गांवीं । भिन्न देव-पूजक वैष्णव-गोसावी ।

नाना जाती-जमाती एकत्वीं । कैशापरीं वागतील ॥१२॥

 

त्यासीहि सामुदायिक प्रार्थना । हाचि उपाय असे जाणा ।

जेथे धर्म-पंथ-संत-देव नाना । एकासनीं विराजती ॥१३॥

 

हा झरा राहिला नित्य शुध्द । तरि गांव होईल सदा सुबुध्द ।

आणि सामुदायिकतेने समृध्द । सर्व प्रकारें ॥१४॥

 

यावरि श्रोतीं प्रश्न केला । कैसें करावें सामुदायिक प्रार्थनेला ?

 जेणें सामुदायिकता गांवाला । प्राप्त होय ॥१५॥

 

सदभावें गांवांतील जन । करोनिया एक मन ।

कैसे करितील कार्य पूर्ण । सामुदायिक प्रार्थनेचें ॥१६॥

 

प्रार्थनीं कोणता देव योजावा । जो सर्वांसीच मान्य बरवा ?

 गांवाचा जेणें समन्वय व्हावा । कैसा ठेवावा पाठ तेथे ॥१७॥

 

मित्रा ! ऐकिले तुझे प्रश्न । तूं बोललासि विचार करून ।

वेगळेपणाची आहे अडचण । गांवोगांवीं सर्वांच्या ॥१८॥

 

वस्तुत: छोटीं देव-देवळें । वगळोनि सर्वांनी एके वेळे ।

एकाच देवुळीं जमावें भावबळें । प्रशांत ऐशा ॥१९॥

 

विसरोनि आपुला वेगळेपणा । करावी तेथे उपासना ।

परि हें नये बहुतांच्या मना । म्हणती आमुचें तेंचि थोर ॥२०॥

 

अनेक मंदिरें अनेक देवता । विचारें लोकां न पटे एकता ।

 त्यांतूनि एक निवडाल कोणता । प्रश्नचि पडे ॥२१॥

 

हाचि प्रश्न संतांपुढती । पूर्वीहि होता जंव पंथ लढती ।

म्हणोनीच विठ्ठल ब्रह्ममूर्ति । ठेविला त्यांनी सर्वांपुढे ॥२२॥

 

सर्व पंथांच्या संतसज्जनीं । केली एकी तये स्थानीं ।

 ज्ञानप्रेमज्योति पेटविली भुवनीं । महाराष्ट्राच्या ॥२३॥

 

बंगालीं तामस भक्तिप्रथा । सुधाराया उजळिली कृष्णकथा ।

 चैतन्यप्रभूने भाविकां-पंडितां । विविध पंथां एक केलें ॥२४॥

 

धकाधकीचा काळ पाहिला । संतीं उपास्यांत बदल केला ।

 तुलसीदासें रामदासें दाविला । राम कोदंडधारी ॥२५॥

 

यापरी देश-कालप्रसंगें । संघटनकेंद्र निवडावें लागे ।

आजच्या काळीं जुळवाया धागे । कोणतें रूप निवडावें ॥२६॥

 

याचा मागे मीं विचार केला । अधिकाधिक अनुभव घेतला ।

 शेवटीं निश्चयाने निवडला । गुरुदेव माझा ॥२७॥

 

मीं जरी ’ गुरुदेव माझा ’ म्हटला । तरी तो नव्हे माझाचि भला ।

 तो सर्व प्राणिमात्राचा झाला । कल्याणकारी ॥२८॥

 

त्यास नाही पंथपक्ष । सर्वदेशी तो सर्वसाक्ष ।

सर्व देवादिकांचा अध्यक्ष । सदगुरुराजा ॥२९॥

 

त्यासि सर्वचि मानव सखे । देश-विदेशींचे एकसारखे ।

 नाही धर्म भिन्न त्यांचे निके । एकचि सत्य सर्वांमाजीं ॥३०॥

 

जैसा आत्मा नाही भिन्न झाला । तैसाचि गुरुदेव संचला ।

 कोणी आकाशाचा तुकडा पाडिला । ऐसें नाही ॥३१॥

 

सत्य सर्वांचेंचि सत्य असतें । असत्य तें असत्यचि होतें ।

 तैसेचि गुरुदेव सर्वांचे ते । एकचि राहती सर्वस्वी ॥३२॥

 

वैदिक असो वा त्याहूनि इतर । सर्वचि पंथीं गुरुदेवाचा आदर ।

 इस्लामख्रिस्तादि धर्मींहि थोर । गुरुदेव-भक्ति ॥३३॥

 

पंथ-प्रचारक गुरु वेगळे । त्यांत असतें द्वैताचें काळें ।

 स्वतंत्र अनुभवी गुरु निराळे । ते पावती ज्ञानयोगें ॥३४॥

 

गुरु हाडामासांचा नोहे । गुरु नव्हे जाति-संप्रदाय ।

गुरु शुध्द ज्ञानतत्त्वचि आहे । अनुभवियाचें ॥३५॥

 

हें ज्ञान ज्यासि लाभलें । ज्याचें मन विश्वाकार झालें ।

 पंथ-पक्ष-धर्म संपले । ज्याच्या ठायीं सर्वचि ॥३६॥

 

तो सर्वाचा झाला सखा । मानवमात्राचा पाठीराखा ।

 कोणत्याहि भाषेने पारखा । तरी पावे तयासि ॥३७॥

 

करी सदभावना उत्पन्न । दीनदु:खितांचें पालन ।

 मलीन मार्गाचे करी खंडण । कायावाचामनाने ॥३८॥

 

म्हणोनीच थोरांनी कथिलें । गुरुचि ब्रह्मा विष्णु झाले ।

 महेश्वरहि गुरुचि बोलिले । याच सामर्थ्यें ॥३९॥

 

गुरुचि साक्षात ब्रह्म कथिला । सर्वांस व्यापोनि गुरुचि उरला ।

 ऐसा देव म्हणोनि प्रार्थिला । गुरुदेव माझा ॥४०॥

 

महापुरुष वेगळाले । परि गुरुत्वीं मिळोनि गुरुचि झाले ।

व्यक्तिपण धर्मपणहि मुरालें । गुरु-स्वरुपीं ॥४१॥

 

त्याचें पूजन गंधाने नोहे । त्याचें मंदिर विशाल आहे ।

 विशालतेला मर्यादा राहे । परि गुरु त्याहुनि अमर्याद ॥४२॥

 

भूमंडळ ज्याचें क्षेत्र पूर्ण । सर्व पृथ्वी जयाचें आसन ।

चंद्रसूर्य नंदादीप जाण । गुरुदेवाचे ॥४३॥

 

त्यांतचि धर्म-पंथ सामावती । तोचि वेष्टिला सर्वांभवती ।

त्याचेवांचूनि नाही रिती । जागा कोणी ॥४४॥

 

त्याचें ज्ञान झालिया जीवा । कोठे द्वेष-कलह-हेवा ?

 सुखशांतीचा लाभे विसावा । सर्वांठायीं ॥४५॥

 

म्हणोनि हेंचि व्हावया ज्ञान । विशाल मनें रचिलें साधन ।

 सामुदायिक प्रार्थनेचें स्थान । सामुदायिकपणास्तव ॥४६॥

 

तेथे सामुदायिक देव कल्पावा । पुढे कार्यातचि अनुभवीत जावा ।

 मग विश्वाकार पहावा । गुरुदेव माझा ॥४७॥

 

हें झालें गुरुदेवांचें वर्णन । आता ऐका प्रार्थना-साधन ।

 गांव व्हावया उन्नत पूर्ण । तैसेंचि स्थान शोधावें ॥४८॥

 

विशाल मंदिर या गुरुदेवचौक । जेथे बसतील जन सकळीक ।

 महिलापुरुषमुले भाविक । सदभावाने सायंकाळीं ॥४९॥

 

प्रथम अधिकारी सेवकाने । घेवोनि हातामाजीं झाडणें ।

 त्वरित करावें मैदान निर्दळवाणें । प्रार्थनेसाठी ॥५०॥

 

येतां प्रत्येक गुरुवार । जाऊनि फिरावें घरोघर ।

बोलवावी प्रार्थनास्थानीं सत्वर । जनता सारी ॥५१॥

 

आईबाई सकळ सज्जन । मुलेबाळें वृध्द-तरुण ।

देवोनिया निमंत्रण । बोलवावे प्रार्थनेसि ॥५२॥

 

गांवीं सर्वांसि निरोप द्यावा । परस्परें समाज सारा जुळवा ।

येतांना घोंगडी गोणपाट आणावा । आपापला म्हणोनि ॥५३॥

 

सकळांनी करावी बिछायत । सर्वांना रांगेंत बसवावें शांत ।

 सदभावना वाढे सकळांच्या मनांत । प्रार्थनेची ॥५४॥

 

सात्विक असावें वातावरण । अतिशांत ऐसें गंभीरपण ।

सर्वांनी करावें बंद संभाषण । तया स्थानीं ॥५५॥

 

आधी पुढे मांडावें अधिष्ठान । त्यावरि आच्छादावें सुंदर आसन ।

 आपुल्याच गांवीं केलेलें पूर्ण । कलाकुसरीने खादीचें ॥५६॥

 

वरि ठेवावा तकिया साजिरा । जैसा कोणी बसतोच आसनीं बरा ।

 दिसावा ऐसा मोहक पसारा । सात्विकतेचा ॥५७॥

 

जवळचि बसावे सूचकगायक । तिसरे भाषण देणारे भाविक ।

दुसर्‍या बाजूने पुजारीपाठक । नामधून म्हणावया ॥५८॥

 

ऐसा प्रार्थनेचा संच झाला । चहुबाजूंनी सेवकगण बसला ।

पाठीमागे संरक्षक दिसला । उभा तेथे ॥५९॥

 

तयाचें काम शांतता राखणें । भोवताली गलबला थांबवणें ।

 सर्वांना शिस्तीमाजीं बसवणें । हळुवारपणाने ॥६०॥

 

जे कोणी येतील मागाहून । त्यांना बसवावें क्रमाने पूर्ण ।

 मग करावें घंटीवादन । दोनचि ठोके ॥६१॥

 

उभा राही अधिष्ठानापुढे पुजारी । लावी शांतिने धूपदीपिका बरी ।

 मग सूचक उभा राहतो सामोरी । सूचना द्याया प्रार्थनेची ॥६२॥

 

सर्वामिळोनि पाठ करवी । एकस्वरें शांतता भरवी ।

 ऐसी प्रार्थना लावील चवी । अंत:करण मोहावया ॥६३॥

 

सहज लागेल तिकडे ध्यान । ऐसें चालावें प्रार्थनीं गायन ।

 पुढे होईल नामस्मरण । गुरुदेवाचें ॥६४॥

 

ज्यांत असेल कुणीहि नाम । निवारोनि भेदभ्रम ।

सर्व धर्मी भाव सम । राखावया सर्वांचा ॥६५॥

 

हें संपतां भाषणासाठी । देईल सूचक सूचना ओठीं ।

मग भाषणाधिकारी शेवटीं । देईल भाषण सदभावें ॥६६॥

 

आपण सर्व एकचि आहों । मग भिन्नपण कासया पाहों ?

 सर्वांशीं सहकार्य करा हो ! कुटुंबापरी ॥६७॥

 

मानव विश्वकुटुंबाचा घटक । ऐसें समजोनि वर्तावें सम्यक ।

शक्ति द्यावया प्रार्थावी भाक । शक्तिवंतापुढे ॥६८॥

 

सर्व संत एकचि असती । सर्व देव एकचि निश्चितीं ।

 सर्वांचे संदेश ऐकतां पावती । एकचि तत्त्व सर्वहि ॥६९॥

 

म्हणोनि सर्वांनी सहकार्य करावें । जैसें ज्याकडोनि बनेल बरवें ।

संसारा स्वर्गासमान बनवावें । आपुल्यापरीं ॥७०॥

 

हेंचि सांगावें प्रार्थनेवरि । यांतचि आहे सेवा ईश्वरी ।

 याहूनि भिन्न नाही कुसरी । परमार्थाची " ॥७१॥

 

हें भाषण  झालिया पूर्ण । मग शान्तिपाठ सर्वांनी करोन ।

 करावें एकनिष्ठेने नमन । एकाच पध्दतीने ॥७२॥

 

सूचकाने सूचना द्यावी । सर्व मंडळी उभी करावी ।

 जयजयघोषें दूमदुमवावी । ऊर्वि अवघी ॥७३॥

 

गुरुदेवाचा जयजयकार । त्यांत ये सर्वदेवनमस्कार ।

 ऐसें प्रार्थनेचें तत्त्व सुंदर । बोलिलों तुम्हां ॥७४॥

 

चौकीं प्रार्थना संपल्यावरि । आपापली घोंगडी पासोडी बरी ।

 उचलूनि न्यावी आपुल्या घरीं । सेवा पुरी करोनिया ॥७५॥

 

येथे प्रार्थनापाठ नाही बोलिला । तो विषय अन्य ग्रंथीं आला ।

 म्हणोनि येथे नाही विवरिला । पहावा ’ सक्रियपाठीं ’ ॥७६॥

 

मित्रहो ! ऐका माझें वचन । जरि व्हावें वाटे गांवाचें कल्याण ।

 तरि सामुदायिक प्रार्थना-साधन । सोडूं नका कधीहि ॥७७॥

 

एवढें अनुभवें सांगोनि ठेवितों । प्रार्थनाच मी गांवाचें धन समजतों ।

 यानेच स्वर्ग मोक्षहि पावतो । समाज अपुला ॥७८॥

 

आमचा देव समाजीं वसतो । समाजाकरितां सर्व करतो ।

 सर्वांस व्यापूनि राहतो । प्रार्थनेच्या आसनीं ॥७९॥

 

तो भेटतो जनकार्यांनी । आम्ही केली प्रार्थना म्हणोनि ।

भरली भावना आत्मा ओतोनि । प्रार्थनीं या ॥८०॥

 

आपण होता प्रश्न पुसला । म्हणोनि ऐसा विस्तार केला ।

 प्रार्थनीं तल्लीन होतांचि देव कळला । विशाल स्वरूपी ॥८१॥

 

त्या मूलतत्त्वाचा जो अनुभव । ज्ञानगम्य विश्वात्मक देव ।

तोचि मानिला गुरुदेव । प्रार्थनीं आम्ही ॥८२॥

 

त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानावरि । मूर्तीच हवी असेल जरि ।

 कल्पावी आपापल्या इच्छेपरी । कोणत्याहि देवाची ॥८३॥

 

देव गुरुदेवांत सामावले । भक्त तेवढे प्रार्थनीं एक झाले ।

मानवतेचें मंदिर उघडलें । विश्वामाजीं या रूपें ॥८४॥

 

एकाची प्रार्थना अनेक मिळाया । अनेकांची प्रार्थना अनंत कळाया ।

 अनंत तत्त्वीं एकत्व पावावया । प्रार्थना आहे ॥८५॥

 

हें समजोनीच हा मार्ग धरिला । आदर द्याया भिन्नधर्मपंथांला ।

 पूज्य मानावया सर्व संतांला । प्रार्थनेमाजीं ॥८६॥

 

यासाठी व्यापक प्रार्थना मांडली । उपासकांची वेली गुंफली ।

 कळावया सर्व धर्मांची खोली । मूळरूपें ॥८७॥

 

वेदउपनिषदांची प्रार्थना । ’ सुख हो सर्वचि प्राणीजना ’ 

 सर्वांची उन्नति हीच धारणा । प्रार्थनेमाजीं ऋषींची ॥८८॥

 

येशूख्रिस्ताने प्रार्थना केली । सर्वांसाठी शांति मागितली ।

 सहनशक्तीची देवता पावली । तयालागी ॥८९॥

 

महंमदाने केली प्रार्थना । विखुरला इस्लाम कराया शहाणा ।

 संघटित केलें त्याने स्वजना । तया काळीं ॥९०॥

 

पावित्र्य शिकविलें झरतुष्ट्राने । संयम शिकविला महावीराने ।

 अहिंसक संघ वाढविला बुध्दाने । प्रार्थनेद्वारें ॥९१॥

 

संतांचें नामसंकीर्तन । तें सामुदायिक प्रार्थनेचेंचि रूप जाण ।

 सर्व देव-स्मरणें करोनि संघटन । दिलें ज्ञान सर्व जना ॥९२॥

 

कलियुगीं भक्ति-महिमान । भजन आणि नामसंकीर्तन ।

 यज्ञांत श्रेष्ठ नामजपयज्ञ । प्रार्थनेंते आलें तें सारें ॥९३॥

 

मूर्तिउपासना आणि ध्यान । नवविधा भक्तीचा सार पूर्ण ।

प्रार्थनीं सर्वचि साधे साधन । सर्व जनांसि ॥९४॥

 

शिस्तशांतिगांभीर्यादि गण । उठण्या-बसण्या-बोलण्याचें ज्ञान ।

 लाभे मानव्याचें शिक्षण । प्रार्थनेमाजीं ॥९५॥

 

प्रार्थना मानव्यशिक्षणाची शाळा । ग्रामसंस्कृतीचा मुख्य जिव्हाळा ।

 भेदकल्पना जाती रसातळा । प्रार्थनेच्या मुशीमाजीं ॥९६॥

 

’ सर्वचि आपण बंधुजन ’ हा भाव वाढ घे मनोमन ।

 गांवाची स्वर्गीयता असे अवलंबून । याचवरि ॥९७॥

 

सकळांस कळाया ही संस्कृति । उपदेश द्यावा प्रार्थनेअंतीं ।

 ही नित्य ठेवावी चालीरीति । गांवीं आपुल्या ॥९८॥

 

ही प्रार्थना गांवीं राही जागती । तरि जिवंत राहील गांवसंस्कृति ।

 सामुदायिकतेची दीपज्योति । प्रकाशेल सर्वकाळ ॥९९॥

 

विश्वीं होऊं शकेल शांतता । तेथे गांवाची कोण कथा 

सामुदायिक प्रार्थनाच करील एकता । नित्यासाठीतुकडया म्हणे ॥१००॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत ।

 कथिलीं प्रार्थना ग्रामोध्दारार्थ । सत्ताविसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥




अध्याय २७ वा ऑडीओ स्वरुपात --



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।