अध्याय २५ वा
देव-देवळें
विचारांनी असती
उदार । साधुसंत थोरथोर ।
तेथे नाही
भेद-संचार । कोण्याहि प्रकारें ॥१॥
परंतु त्यांचे
पंथानुयायी । आपुलालीच लाविती घाई ।
भिन्न भिन्न त्यांचे देवहि । एक न मिळती एकाशीं
॥२॥
वेगळे देव वेगळे
धर्म । वेगळालें त्यांचें उपासनाकर्म ।
सांगा होईल कैसा संगम । भावनांचा त्यांच्या ? ॥३॥
संतांचें घेतलें संमेलन । तेवढयापुरतें झालें मिलन ।
परंतु नित्याच्या उपासनेने । वाढे अंतर सर्व
जनीं ॥४॥
ज्याचा विशेष
बोलबाला । जेथे संपत्तीचा पेल झाला ।
लोक भजती त्याचि
दैवताला । कोणी दूजाला कवटाळिती ॥५॥
यासि नित्यासाठी उपाय । सांगा सहजप्रभावी काय ?
जेणें संस्कारचि होतील एकमय । आत्मीयतेचे ॥६॥
श्रोतियाचा
प्रश्न मार्मिक । गांव-हितासि आवश्यक ।
संतांऐसेंचि
देवांचें ऐक्य । साधलें पाहिजे ॥७॥
आपापले
धर्म-कर्म-देव । भिन्न समजती मानव ।
तेणें असोनि एकचि
गांव । झाले भाव वेगळें ॥८॥
आपुलालें चिन्ह
ठेवावें । त्यावरोनि संप्रदाय ओळखावे ।
म्हणोनि मांडिलें दुकान बरवें । आपापलें या
पंथांनी ॥९॥
एक म्हणे राम
मोठा । दुसरा म्हणे कृष्ण मोठा ।
तिसरा म्हणे
शंकरचि मोठा । सर्वांहूनि आमुचा ॥१०॥
कोणी म्हणती देवी
मोठया । कोणी पूजिती मानविणी नरोटया ।
कोणी म्हसोबा-बहिरम-सोटया । थोर म्हणोनि तंडती
॥११॥
कोणी म्हणती
हरिहर । कोणी वंदिती नाल्याहैदर ।
कोणी पूजिती
सर्पव्याघ्र । कोंबडी-बकरी देवोनि ॥१२॥
कांही सोनियाचे
देव करिती । वेळ पडल्या विकोनि खाती ।
ऐसी आहे देवाची फजीती । पूजकांमागे ॥१३॥
कांही देवासि
बलिदान देती । देवीच्या मिसें मांस खाती ।
तीर्थ म्हणोनि मद्य पिती । पिसाळलेले ॥१४॥
देव देवळीं
दगडाचा । देवपाट करिती सोनियाचा ।
धाक पडे
चोरटयांचा । म्हणोनि पहारे देवुळीं ॥१५॥
आपापल्या हौसेचे
शृंगार । चढवोनि देती देवावर ।
मग शृंगारावरीच टपती नेत्र । देव कांही दिसेना
॥१६॥
एक म्हणती गळां
सुंदर माळ । एक म्हणती रत्नमुकुट झळाळ ।
एक म्हणती सोनियाची प्रभावळ । देवाभवती शोभली
॥१७॥
एक म्हणती
सुवर्ण-सिंहासन । एक म्हणती भरजरी शालू पूर्ण ।
एक म्हणती केशर कस्तुरीलेपन । कंठीं नवरत्न
देवाच्या ॥१८॥
कांही म्हणती देव
उठला । आता बसला आता जेवला ।
विश्रांति आता करूं लागला । विडा घेवोनि एकांतीं
॥१९॥
देवासि झोपवा
मखमलीवरि । दारें लावूनि घ्या बाहेरि ।
पाउलें न चुरतां
कोमल करीं । झोप त्यांना लागेना ॥२०॥
सारांश आपणांसि
जें आवडे । तेंचि देवादिकासि पुरवावें लाडें ।
मगचि देवाची
प्रसन्नता घडे । ऐसें कांही मानिती ॥२१॥
मग ते असोत
दुर्गुण सदगुण । याचा विचार करतो कोण ?
अंधश्रध्देच्या प्रवाहीं लागून । तैसेचि चालती पुढे पुढे ॥२२॥
पदसेवन, अर्चन, वंदन । दास्य, सख्य, आत्मनिवेदन ।
यांचा बहिरंग
अर्थ घेवोन । भक्ति करिती सोंगाऐसी ॥२३॥
कोणी विरहभक्तींत
रंगती । कोणी संगभक्ति अवलंबिती ।
कोणी आत्मभक्तीची करिती स्तुति । वाटेल तैसी
॥२४॥
कोणी अल्ला बडा
की राम बडा । हेंचि वितंडितां धरिती नरडा ।
फोडिताति कडाकडा । मूर्ति हातीं धरोनिया ॥२५॥
येशूभक्त निंदा
करी । म्हणे हिंदूचा देव व्यभिचारी ।
सोळा हजार करी
नारी । कसला देव ? ॥२६॥
करावयाचें तें
कोणी न करी । भांडणें करिती घरोघरीं ।
वा रे !
मूर्तिपूजेची थोरी । कळली लोकां ॥२७॥
देवाकरितां करोनि
भांडणें । कोर्ट-कचेरीमाजीं जाणें । ’
सत्य बोलतों ’ म्हणोनि शपथ घेणें । देवादिकांची ॥२८॥
ऐसें ज्याने
त्याने असत्य केलें । म्हणोनि जन नास्तिक झाले ।
म्हणती काय होतें देव पूजिले । कितीहि तरी ? ॥२९॥
समजण्याची
दृष्टीच गेली । म्हणे देवाची प्रतिष्ठा काय उरली ?
वरि बैसोनि लघवी केली । उंदिराने ॥३०॥
उलट कोणी म्हणे
देव जागृत । भाव धरिल्या पावे त्वरित ।
मी म्हणेन भाव तेंचि दैवत । कां न म्हणावें ? ॥३१॥
एके ठिकाणीं देव
जागृत । बाकी ठिकाणीं काय भूत ? ।
कैसी झाली समजूत । उलटी आमची ! ॥३२॥
लोकीं जो हा
दुजाभाव झाला । तो पुजारी-पंडेगिरीने केला ।
शास्त्रेंहि लावोनि आधाराला । समाज नेला अधोगतीं
॥३३॥
यासीच म्हणविलें
देवपूजन । पुजारी सांगतील जें जें कथून ।
भाविक ठेवोनि
बुध्दि गहाण । करिती, कळे देव कैसा ? ॥३४॥
जैसी ज्याची
भावना । तैसाचि देव त्याचा जाणा ।
तेथे भावनेसि प्रमुखपणा । सहजचि येतो ॥३५॥
आणखी एक मुख्य
खूण । ज्या संताने केलें देवस्थान ।
त्याच्या
थोरपणावर मोठेपण । मानिलें लोकीं देवाचें ॥३६॥
सज्जनाने दगड
पूजिला । इतरांना तो मोठा देव झाला ।
वाढला त्याचा
लौकिक भला । यात्रा भरली त्यापरी ॥३७॥
पंढरीसि ज्ञानदेव
न जाता । संतांचा मेळा न भरता ।
कोण तेथीचा देव पूजिता ? सांगा मज ॥३८॥
देव सर्वांठायीं
सारखा । परि संगतीने भासे प्रियसखा ।
उत्तम असोनिहि होतो पारखा । लोभीलबाड पुजार्यामुळे
॥३९॥
ऐसें झालें
आम्हांमाजी । म्हणोनि भावना वाढली दुजी ।
चुकली देवभजनाची अर्जी । वाढली मर्जी धनाची ॥४०॥
जें धनसंपन्न
देवस्थान । त्यासि आलें मोठेंपण ।
उपासनेसाठी
खर्चावें धन । देव प्रसन्न म्हणती तेणें ॥४१॥
परि देव मोठा
नव्हे श्रृंगाराने । देव मोठा नव्हे भव्य देवळाने ।
देव मोठा नव्हे
घंटे वाजविल्याने । अहोरात्र ॥४२॥
देव मोठा नव्हे
नंदादीपाने । देव मोठा नव्हे होम-हवनाने ।
देव मोठा नव्हे साळुंकेने । पर्वता एवढया ॥४३॥
देव मोठा नव्हे
निसर्गशोभेने । देव मोठा नव्हे महायात्रेने ।
देव मोठा नव्हे
वैभवप्रतिष्ठेने । पूजकांच्या ॥४४॥
देव मोठा भावनेने
। भावनेच्या उच्चतेने ।
अंतरींच्या
उपासनेने । सर्वांसि सारिखा ॥४५॥
मग तो असो कोणीहि
देव । तेथे वाया भेदभाव ।
एकाचि चैतन्याचे ओतीव । अलंकार ते ॥४६॥
देव एक असोनि
अनंत झाला । नाना रूपें धरोनि नटला ।
परि तो पाहतां एकचि दिसला । कार्यरूपाने ॥४७॥
हरिहरा भेद नाही
। एक एकाचे हृदयीं ।
रामरहीम एकचि पाही । देवी-देवहि एकात्मक ॥४८॥
धनुर्धारी झाला
राम । मुरली धरतां मेघश्याम ।
कटीं कर ठेवितां
सगुणब्रह्म । विठ्ठल म्हणवी ॥४९॥
सर्व देव एकचि
असती । भिन्न साधना करोनि स्मरती ।
भिन्न रूपें धरिलीं किती । तरी तत्त्वत: एकी
तयांची ॥५०॥
एकचि व्याप्ति
एकचि दीप्ति । प्रसंगें नानारूपें धरिती ।
एकाच ध्येयासाठी लाविती । प्राण पणीं देव सर्व
॥५१॥
कोणा सज्जना दु:ख
न व्हावें । कोणी दीन भुकेले न राहावे ।
यासाठी प्राण समर्पावे । प्रसंग पडतां ॥५२॥
ऐसें ज्यांनी
अंगें केलें । त्याच कारणीं धारातीर्थी पडले ।
ते सर्व देवदेवता
झाले । मृत्युलोकीं ॥५३॥
सज्जनांचें
परित्राण । कंटकांचें निर्दालन ।
सत्य न्याय
सदगुणांचें रक्षण । कार्य हें सर्व देवांचें ॥५४॥
ऐसें असतां
वितंडणें । देवादेवांचीं करावीं भांडणें ।
आपुल्या हौसेसाठी कां बुडविणें । चरित्र
दैवतांचें ? ॥५५॥
सज्जनें टाळावी
ही वृत्ति । आदर द्यावा सर्वाप्रति ।
भिन्न न ठेवावे कोणी पंथी । एकचि असती म्हणोनिया
॥५६॥
सर्वांना
मंदिराचें मूळतत्त्व । आणि उपासनेचें महत्त्व ।
समजावोनि द्यावें देवत्व । कवण्या कार्यी असे
तें ॥५७॥
तेणें निरसूं
लागेल भेद कल्पना । आकळेल यथार्थ उपासना ।
साधेल आपापल्या देवस्थानां । मूळतत्त्वीं सार्थक
॥५८॥
यावरि एकाने केला
प्रश्न । देवस्थानांचें मूळतत्त्व कोण ?
हीं मंदिरेंचि भिन्न भिन्न । झालीं कारण पंथभेदा ॥५९॥
यांच्यावरोनि
फिरवावा ट्रॅक्टर । म्हणजे सर्वचि होतील एकाकार ।
काय मंदिरांवांचूनि पडेल अंतर । भक्तींत कांही ? ॥६०॥
याचें ऐका समाधान
। ऐक्य न साधे भावना दुखवून ।
त्यासाठी मंदिराचें तत्त्वज्ञान । उजळणें हेंचि
उचित ॥६१॥
सुंदर निसर्गरम्य
स्थान । तेथेहि साधे देवाचें भजन ।
मठमंदिर नसतांहि
मोहून । मन पाही देवाकडे ॥६२॥
परि समाधिस्थानें
मठमंदिरें । देवदेवळें देव्हारे ।
यांच्या
स्थानप्रभावें स्फुरे । सदभाव मनीं सकळांच्या ॥६३॥
म्हणोनि संतीं
घातला पाया । लोकीं चारित्र्यनीति वाढाया ।
अभ्यासियांसि एकान्त द्याया । मंदिरायोगें ॥६४॥
पुरुष व्यवहारीं
भांबावती । कोठे पुत्रपौत्रामाजीं कलह होती ।
क्षणभरीहि न मिळे शांति । विचारासाठी ॥६५॥
ऐशावेळीं
उपासनास्थळीं जावें । महापुरुषांचें स्मरण करावें ।
त्यांचें
धारिष्टय चिंतोनि घ्यावें । समाधान ॥६६॥
वेळोवेळीं विसरे
वृत्ति । विचारांचा आठव मंदिरें देती ।
सतकर्तव्य-भावना जागविती । स्थळें ऐसीं ॥६७॥
वार्षिकोत्सव, पुण्यतिथि । चातुर्मास्य आणि जयंति ।
सामुदायिकपणें
होतीं । मंदिरस्थानीं ॥६८॥
सामुदायिकतेचें
साधन । गांवाच्या आनंदाचें स्थान ।
पावित्र्याचा उगम पूर्ण । स्थानीं ऐशा ॥६९॥
मंदिरें म्हणजे
पाठशाळा । चाले शिक्षणाचा सोहळा ।
झाला निधि सर्व
गोळा । याच कार्यी लावावा ॥७०॥
जागवावी
गांव-संस्कृति । वाढवावी सर्वांत प्रीतिनीति ।
यांचीं केंद्रें म्हणोनि होतीं । मठमंदिरें
सर्वहि ॥७१॥
सर्वांभूतीं
प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव ।
यासाठीच गांवोगांव । मंदिरें केलीं निर्माण ॥७२॥
ऐसी उच्च धरोनि
भावना । झाली मंदिरांची स्थापना ।
परि आज तयांची
रचना । विपरीत दिसे ॥७३॥
मंदिरें
क्षेत्रें दुकानें झालीं । पूजा कमाई करूं लागली ।
दक्षणापात्रें पुढें आलीं । पोटासाठी ॥७४॥
मंदिरीं बांधती
म्हशीगायी । घाण दिसे ठायीं ठायीं ।
कसली पूजा
धूपदीपहि ? सारा धुव्वा तंबाखूचा ॥७५॥
पुजारी खेळती
चौसरी । वेश्यादिकांचें गाणें मंदिरीं ।
होती
तमाशे-दंढारी । परोपरीं देवळामाजी ॥७६॥
मंदिराचा भव्य
वाडा । झाला गुंडांचा आखाडा ।
धाक पडे घालाया मोडा । सज्जनासि ॥७७॥
स्त्रिया बापडया
मंदिरीं जाती । अंधानुकरणें ऐकती पोथी ।
सर्व लक्ष
रंजनाप्रति । स्थिरत्वें कोणी ऐकेना ॥७८॥
पदोपदीं भांडणें
होतीं । भोळया भक्तांची फजीतीं ।
धनासाठी ओढाताण करती । पंडेपुजारी ॥७९॥
ऐशा स्थितीला
बसाया आळा । सर्व लोकांनी करावा निर्वाळा ।
मंदिराचा निधि सगळा । समाज-कार्या लावावा ॥८०॥
पुजारी असतील
बेढंगे । सांगोनियाहि सरळ न वागे ।
तें बदलावे संघटनेयोगें । सर्व गांव मिळोनि ॥८१॥
पुन्हा सुधारावी
मंदिर-योजना । सुरू करावें लोकशिक्षणा ।
गांभीर्य आणावें तया स्थानां । सदविचार वाढावया
॥८२॥
नवें मंदिर न
बांधावें । जुनें तें स्वच्छ सुंदर करावें ।
आहे त्यासचि
लावावें । पुन्हा सत्कार्यीं ॥८३॥
सांवरोनि गलिच्छ
पसारा । निर्मळ करावें देवद्वारा ।
प्रसन्न फुलें झाडें वारा । शांति द्याया
उपासकां ॥८४॥
उघडावीं त्यांत
वाचनालयें । औषधालयें, योगविद्यालयें ।
उपासनेची ठेवोनि सोय । सर्वांकरितां ॥८५॥
आपुले आपुले
देवुळींच जावें । इतरांनी दुरूनीच पहावें ।
देव वाटेल ऐसें बरळावें । हें तों असे वेडेपण
॥८६॥
एकाचा देव दुसर्यासि
शिवे । तरि पाप वाढेल गाडे पेवें ।
म्हणोनि ज्याचे
देव त्यानेच पुजावे । म्हणती न मानावे येरांनी ॥८७॥
हें तों म्हणणें
सांप्रदायिकांचें । अल्पज्ञानी व्यापारियांचें ।
माझ्या मतें हें विकासाचें । धोरण नव्हे ॥८८॥
ऐसें करणें
सोडोनि द्यावें । असतील त्या देवळां निर्मल ठेवावें ।
सर्व लोकांसि खुलें असावें । दर्शनासाठी स्थान
तें ॥८९॥
देव असे पतितपावन
। तो न पळे पतिताला भिऊन ।
सर्वचि त्याचीं लेकरें समान । तयालागी ॥९०॥
देवासि नाही
जातपात । देव भक्ताचाचि जातिवंत ।
तेथे नसावा अभक्ताचा पंथ । देवळामाजीं ॥९१॥
देव महार मांग
चांभार । देव भंगी लभाणी वडर ।
देव माळी ब्राम्हण कुंभार । सर्व जाती ॥९२॥
देव क्षत्रिय
वैश्य गोवळी । देवें सृष्टि व्यापली सगळी ।
देवचि देव भूमंडळीं । संचला आहे ॥९३॥
म्हणोनि असावें
सर्वांचें मंदिर । ब्राह्मण असो वा महार ।
शुध्द करील जो
आचार । त्यासि अधिकार मंदिराचा ॥९४॥
देवळाचे पंच गांव
। गांवचा प्रत्येक मानव ।
मानवांचा वाढेल
गौरव । प्रचार व्हावा ऐसाचि ॥९५॥
सर्वांनी एक वेळ
ठरवावी । मिळोनिया प्रार्थना करावी ।
प्रार्थनीं उत्सवीं भाषणें द्यावीं । योग्य ऐसीं ॥९६॥
प्रत्येकाला
बोलतां यावें । सर्वांनी हें अभ्यासावें ।
आपुलें सुखदु:खहि
मांडावें । भाषणायोगें ॥९७॥
तैसींच ठेवावीं
प्रवचनें । राष्ट्रीय वृत्ति वाढे जेणें ।
माणसासि माणसाने । पूरक व्हावें म्हणोनिया ॥९८॥
प्रमाणें द्यावीं
ऋषिजनांचीं । आठवण मागच्या इतिहासाची ।
तैसीच बांधावी धारणा पुढची । भाषणायोगें ॥९९॥
कीर्तन, उत्सव, प्रवचन । नुसतें नसावें मनोरंजन
।
गांवकर्यांचें
उजळेल जीवन । ऐसे कार्यक्रम करावे ॥१००॥
ऐसें हें मंदिर
सजवावें । उपद्रवी लोक बाहेर करावें ।
सत्कीर्ति
सुबुध्दीने भरावें । देवस्थानांसि ॥१०१॥
मानवता-विकासाचें
केंद्र । सात्विक संपत्तीचें आगर ।
ऐसें ठेवावें गांवीं मंदिर । ग्रामसंस्कृति
राखाया ॥१०२॥
शुध्द प्रेम
वाढावया । मंदिरांची उपासना या ।
उपासनेसि
सक्रियता द्याया । लागा सर्व गांवकरी ॥१०३॥
नका पाहूं
पंथ-भेद । नका उकरूं नसते वाद ।
मंदिरादिकांचा
हेतु हाचि शुध्द । जवळ यावा मानव ॥१०४॥
म्हणोनीच देवाची
मध्यस्थी । एरव्ही देवाचीच सर्व क्षिति ।
परि जाणिवेने जन लाभ घेती । एरव्ही नाडती प्राणी
सारे ॥१०५॥
ती जाणीव द्याया
देवस्थान । साधुसंतीं केलें निर्माण ।
तेथे शिकावें ’ जनीं जनार्दन ’ । हेंचि सूत्र ॥१०६॥
कोणत्याहि
देवुळीं जावें । तेथे आपुलें उपास्यचि पाहावें ।
सर्व रूपीं
अवलोकावें । एक तत्त्व, हीच निष्ठा ॥१०७॥
सर्व देवांसि
आदरावें । जेथे सात्विक पूजेचे गोडवे ।
दिव्य
गुणकर्मानेचि देवत्व पावे । प्रत्येक व्यक्ति ॥१०८॥
तेथे भेद कां
मानावा ? कोणीहि भजो कोणत्या देवा । ’
भावचि देव ’ कळतां ठेवा । एकचि लाभे सर्वांसि ॥१०९॥
शंकराचार्ये
देव-पंचायतन । मांडोनि साधिलें भक्तसंघटन ।
इष्टदेवासह
इतरांचें पूजन । कुठलें स्थान विरोधासि ? ॥११०॥
विरोध देवांचा तर
काय । परि जीवांचाहि येथे न साहे ।
सर्व जीवीं देवचि आहे । म्हणोनि प्रेम द्यावें
तयां ॥१११॥
सुखी-समृध्द
करावें गांवा । यासाठीच मंदिर-निधि योजावा ।
ही सेवाचि आवडे देवा । आपुलिया जीवांची ॥११२॥
जीवांचिया
सेवेचें तत्त्व । तैसेंच कार्याचें महत्त्व ।
आणि स्वरूपाचें
दिव्यत्व । सर्वचि देवांचें समान ॥११३॥
ऐसी समान धारणा
मनीं । धरोनि वागतां सर्वांनी ।
मठमंदिरें पंथभेद
कोणी । आड न येती विकासाच्या ॥११४॥
ऐक्य वाढवाया
कारण । होईल प्रत्येक देवस्थान ।
करितां शुध्द
तत्त्वें पुनरुज्जीवन । तुकडया महणे ॥११५॥
इतिश्री
ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-सानुभव संमत ।
मंदिर-मर्म कथिलें येथ। पंचविसावा अध्याय
संपूर्ण ॥११६॥
अध्याय२५ वाऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा