.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ३७ वा आत्मानुभव



अध्याय ३७ वा

आत्मानुभव

 

 

’ अनुभव ’ ऐसा शब्द ऐकला । त्यावरि श्रोत्यांनी प्रश्न पुसला ।

 आत्मानुभवाचा मार्ग सांगितला । पाहिजे आम्हां ॥१॥

 

केले प्रयत्न तुम्हीं कोण कैसें गेलें तुमचें जीवन 

खरी आत्मानुभवाची खूण । काय आहे ॥२॥

 

मित्रांनो ! ऐका सावकाश । प्रत्येक जीव देवाचा अंश ।

 आपुल्या कर्तव्यें पद त्यास । प्राप्त होय हवें तें ॥३॥

 

करणी करितां विवेकें पूर्ण । नरचि होय नारायण ।

 प्रारब्ध आणि परिस्थिति जाण । वाट देई तयासि ॥४॥

 

ज्यासि करूं आवडे उन्नति । निसर्ग होई ग्रंथ त्याप्रति ।

 साधन होई एकेक वृत्ति । जाणत्यासि ॥५॥

 

आधि पाहिजे सुंसंस्कार । पुढे जाण्याचा निर्धार ।

संतग्रंथ कायअवघाचि संसार । सहायक होई तयासि ॥६॥

 

बुडतें जग त्यासि जागवी । संकटें स्फूर्ति देती नवी ।

 अघातांतूनि हितचि भावी । साधक तो ॥७॥

 

मनीं आत्मोन्नतीची तळमळ । त्यासि वाट देती सकळ ।

 आपुलें आपणांतचि बळ । पाहिजे आधी ॥८॥

 

सत्य संकल्पाचा निश्चय । लावी जीवनासि सोय ।

 वाट चालतां निर्भय । मुक्काम पावे ठायींच ॥९॥

 

आपुल्या अंगीं प्रकाश भरला । तो पाषाणचि हिरा ठरला ।

 खाणींत शोधूनि आणिती त्याला । प्रयत्नें जन ॥१०॥

 

मृगनाभीची कस्तुरी । ती स्थान पावे राज-शिरीं ।

कमल चढे देवावरि । चिखलीं जन्मूनि स्वगुणांनी ॥११॥

 

हाचि अनुभव प्रमाण । यत्नाअंगींच देवपण ।

हें संतग्रंथांचें सत्यचि कथन । जाणावें श्रोतीं ॥१२॥

 

तुम्हीं विचारिलें माझें जीवन । म्हणोनि करितों थोडे कथन ।

 जनासह आपण जनार्दन । हीच खूण अनुभवाची ॥१३॥

 

हीच अनुभवावयासाठी । सर्व कराव्या आटाआटी ।

 ऐसेंचि प्रत्यया येई शेवटीं । साधकाच्या ॥१४॥

 

देवत्वाची ज्योत दीप्तिमान । परि आवरण पडलें मलीन ।

 तें साफ करावयासीच प्रयत्न । म्हणती साधन त्यालागी ॥१५॥

 

ऐसीं साधनें निमित्तमात्र । स्वरूप एकचि असे सर्वत्र ।

तें अनुभवा आणी वृत्ति पवित्र । हेंच सूत्र उन्नतीचें ॥१६॥

 

या उन्नतिमार्गी जो लागला । विवेकें अंतरीं जागला ।

 तो स्वयें उध्दरोनि गेला । तारक झाला जनांसि ॥१७॥

 

हें प्रयत्नाचें शुध्द महिमान । ऐकोनि मींहि केलें साधन ।

 तें कळाया करितों  वर्णन । थोडकेपण आयुष्याचे ॥१८॥

 

लहान ऐशा गांवामाजीं । मागासलेल्या जनसमाजीं ।

उपासाचीच लाभे रोजीं । ऐशा ठायीं जन्मलों ॥१९॥

 

घरीं दारिद्रयाचें वरदान । परि भावभक्तीची नसे वाण ।

 ऐकत सुसंस्कारांचें गान । सोशीत कष्ट वाढलों ॥२०॥

 

अंतरीं जिज्ञासा असे खूप । ती घरी हूडपणाचें रूप ।

 अल्लडपणें साहोनि ताप । सर्वांमाजी वावरलों ॥२१॥

 

ऐकिलें श्रवणीं थोडें कीर्तन । त्यावेळीं होतें आर्तपण ।

धृवप्रल्हादाचें आख्यान । मना वाटे ऐकावें ॥२२॥

 

कांही ऐकिली संतचर्चा । कांही कथां  ऐंकिल्या पुरानीच्या ।

 कांही वाढविल्या भावना मनाच्या । वैराग्ययोगें ॥२३॥

 

झाली परिस्थितीहि कारण । धरावया एकान्तीं मुद्राध्यान ।

 तें सर्व केलिया कथन । वेळ पुरेना वर्षाचा ॥२४॥

 

महत्त्वाचेम सांगावें वाटतें । साधकाला मिळेल आइते ।

 आत्मानात्म-विचार येथे । श्रोते ऐकती म्हणोनि ॥२५॥

 

कांही संगतीचें लाभलें फळ । आलें आत्मचिंतनासि बळ ।

 देवदर्शनाची खळबळ । झाली हृदयीं दृढ ऐसी ॥२६॥

 

पुढे कल्पना सरसावली । धृवानेच कां तपस्या केली ?

 आपणासहि कां न घडली । पाहिजे तैसी ॥२७॥

 

काय करावें वाटे मनीं । कैसें ध्यान करावें नेत्र लावोनि ।

 कोणा विचारावेंसमाधानी । वृत्ति व्हाया जीवाची ॥२८॥

 

मग बळेंचि रानीं जावें । वृक्षाखाली ध्यान धरावें ।

 कधी मूर्तिपूजनचि करावें । मंदिरामाजीं ॥२९॥

 

कधी रेणुकांची करावी मूर्ति । वनपुष्पपत्रें पूजावी ती ।

 भजन करावें अहोरातीं । तन्मय चित्त करोनिया ॥३०॥

 

ऐसा वाढला प्रेमनिश्चय । मानसिक संकल्पांचा समुच्चय ।

 धरिली ध्यान-मुद्रेची सोय । एकांतामाजीं ॥३१॥

 

परि झालें नाही समाधान । चित्त उडे मधून मधून ।

तशांतचि करावें कीर्तन । तळमळोनि ॥३२॥

 

आपणचि मना समजावावें । आपणचि समाधान मानावें ।

 गावें नाचावें बोलत जावें । आपल्याशींच एकान्तीं ॥३३॥

 

परि प्रारब्धभोग आडवा पडे । विषयांकडे वृत्ति ओढे ।

 कधी दुष्परिणाम घडे । देह-धारणेने ॥३४॥

 

म्हणोनि निघालों घर सोडून । बावळट ऐसा वेष घेऊन ।

कधी कधी विसरों देहभान । चिंतेंत देवदर्शनाच्या ॥३५॥

 

राहिलों वनींघोर रानीं । रानवट लोकींधनिकाभुवनीं ।

 अनेक अनुभव आले जीवनीं । स्फुरले मनीं सदभाव ॥३६॥

 

कांही योगाचें साधन । थोडें अध्यात्म-वाचन ।

विशेष विश्वनिरीक्षण । केलें मनन सर्वकाळ ॥३७॥

 

भजनसप्ताहयज्ञयाग । महोत्सवव्रतेंमहाप्रसंग ।

नाना कार्येंसाधनप्रयोग । असंख्य केले ॥३८॥

 

केलें बहुत पर्यटन । वनभ्रमण तीर्थाटन ।

पाहिले सर्व प्रांत फिरून । आयुष्यांत ॥३९॥

 

नाना मंदिरेंदेवालयें । संस्थाआश्रमवाचनालयें ।

दरीं कंदरीं होऊनि निर्भय । पाहिलीं स्थानें ॥४०॥

 

भेट घेतली वरिष्ठांची । पाहिली भिन्नता रीतिरिवाजांची ।

 रुचि घेतली खाण्यापिण्याची । देशीं-भेंषीं ॥४१॥

 

पाहिले अखाडे साधुजनांचे । गोसाव्यांचेसंन्याशांचे ।

 वैराग्यांचेमहानुभवांचें । वारकर्‍यांसहित ॥४२॥

 

प्रवास केला बैलगाडीचा । घोडेटांगेहत्ती-अंबारीचा । 

सायकलमोटारविमानाचा । सर्वकाही ॥४३॥

 

पाहिले सागरभव्य स्थानें । सातपुडा सह्याद्रि विंध्याद्रिरानें ।

 हिमालयासहित अति उंचपणें । गगनभेदी ॥४४॥

 

निसर्गाचीं दृश्यें अपूर्व । मानवकृत चमत्कार-वैभव ।

 सुखसाधनें ज्ञानसाधनें सर्व । पाहिलीं लोकीं ॥४५॥

 

हें सर्वकांही पाहूनि पूर्ण । नाहीच झालें  शांत मन ।

 शेवटीं घ्यावा लागला अनुभव जाण । आपणामाजीं ॥४६॥

 

बहिर्मुख दृष्टीने पाहतां । समाधान न लागे हातां ।

 हीच असे अनात्मता । दु:खदायी सर्वांसि ॥४७॥

 

विश्व कोण मी कोण यांचें मुळांत एकपण ।

 तें जाणतां विचारें पूर्ण । अंतर्मुख वृत्ति होय ॥४८॥

 

एकचि तत्त्व चैतन्यघन । सागरीं बर्फ-तुकडयांसमान ।

त्यावरि सजलें विविधपण । हीच खूण अनुभवाची ॥४९॥

 

मीच आहे सकळांस कारण । माझ्याच आत्म्याचें हें विशालपण ।

ओळखी होतां कळलें पूर्ण । अद्वैतपण सर्वांचें ॥५०॥

 

मग मुरली पाहण्याची हौस । निवांत झालों सावकाश ।

 जें जें दिसे या  दृष्टीस । तें तें भासे आपणचि ॥५१॥

 

वाटे सर्वचि येथे आमचे । भिन्न कोण निवडायाचे ?

 हर्ष न समायेमनाचें । मोठेपणीं आतलाचि ॥५२॥

 

मुंगी आणि ऐरावत । अणुरेणु आणि मेरूपर्वत ।

सर्व माझेचि संकल्प मूर्त । कळों आलें ॥५३॥

 

अजूनि कितीतरी आत्मा थोर । न चाले मोजमाप अनिवार ।

अनंत ब्रह्मांडें विश्वाकार । संचले असती ॥५४॥

 

मायाईश्वरब्रह्मसृष्टि । सर्व आत्मरूपाचिया पोटीं ।

 पोटपाठहि नाही शेवटीं । तेंचि तत्त्व मी ॥५५॥

 

ब्रह्म म्हणती सर्वांत मोठें । परि ही भाषा परकी वाटे ।

 अनुभव घेतां वेगळें न भेटे । ब्रह्मपण आटे आपणांत ॥५६॥

 

प्रथम गांव-मंदिर मोठें वाटलें । मग तीर्थाटन मोठें झालें ।

 आणि पुढे निसर्गरूप दिसूं लागलें । मोठें मोठें ॥५७॥

 

परि त्याच्या मुळाचा अनुभव घेतां । मोठा कळलाच नाही कोणता ।

हा आत्म्याचा विलासचि तत्त्वता । अनुभवा आला ॥५८॥

 

मोठा तो पंचतत्त्वादि भेदोनि । लहान तोचि अणुरेणूहूनि ।

 पाहतां पाहणें दुरी सारोनि । कळला एकपणीं जवळचि तो ॥५९॥

 

तेथेचि झालें पूर्ण साधन । मग दिसों लागलें एकचिपण ।

 सुखदु:ख आणि जन्ममरण । सारिखेंचि ॥६०॥

 

भिकारी आणि धनवान । हे तों संकुचित भावें दोन ।

 विकास होतां न राहती भिन्न । होती समान उन्नत ॥६१॥

 

नाही जातिपंथादि भेद । आपपरभाव हर्षखेद ।

 प्रकट होई सच्चिदानंद । सर्व ठायीं समरूपें ॥६२॥

 

जन्मणें मरणें झाला खेळ । सुखदु:ख सर्व झालें शीतळ ।

संकटें येतां वाटे प्रेमळ । प्रवाह आला ॥६३॥

 

आता विषादचि नाही उरला । विचार विस्ताररूपें व्यापला ।

 जें जें करणें असेल निसर्गाला । रुचि वाटे तयाची ॥६४॥

 

यासीच खरा बोलती प्रारब्धवाद । ज्यांतूनि आसक्तीचा उच्छेद ।

 इच्छेविरहीत आनंद । सर्वांसाठीं निर्विषय ॥६५॥

 

नाही शृंगार सौंदयाचा । नाही पाल्हाळ काव्यकलांचा ।

 जें असेल जैसें तयाचा । आनंद वाटे चित्तासि ॥६६॥

 

हें सर्व कासयाने झालें यासाठी काय साधन केलें ?

 कासयाने द्वैतपण मुरलें । आपणामाजीं ॥६७॥

 

हें आठवतां भान येतें । साक्षित्वरूपें पाहतां कळतें ।

 अंतरंगीं विचारितां वळतें । कार्यमर्म सर्वकांही ॥६८॥

 

बुध्दीसि स्वातंत्र्य दिलें । जैसें जें दिसलें तें विचारिलें ।

 त्यापरी कार्यसंबंध जोडले । आत्मत्व आलें देहभावा ॥६९॥

 

आपण तैसे सकळ जन । मग कासया मानावें भिन्नपण ?

 ऐसा होतां झालें सावधान । ज्ञानमार्ग सर्वकांही ॥७०॥

 

ऐसा जीवेंचि मंत्र धरिला । न कळे कोणीं वरदहस्त ठेविला ।

परि सदभावें मीं नमस्कारिला । आडकोजी गुरुस्थानीं ॥७१॥

 

बहिरंग बोध नाही केला । स्वयेंचि श्रध्दाभावें घेतला ।

अहंकार न हो म्हणोनि पूजिला । सदगुरुराजा ॥७२॥

 

परि अंतरीं कळलें मर्म । गुरुशिष्यपण आहे भ्रम ।

आहे एकचि वस्तु अगम्य । दोघांमाजीं ॥७३॥

 

हें कळावयासि संगति लागे । संगतियोगें भावना जागे ।

 भावना जागतां अंतरंगें । दिसे मुळींचें आत्मरूप ॥७४॥

 

मग जें जें मागे पाहिलें । तें तें सर्व सहज झालें ।

 स्वाभाविकपणचि अंगीं आलें । स्वरूपानुभवें ॥७५॥

 

स्वरूप म्हणजे अखंड स्थिति । जी आत्म्याची सहजगति ।

 नाही कृति ना विकृति । स्वरूपामाजीं ॥७३॥

 

अखंड प्रेम अगाध ज्ञान । अबाधित सत्य आनंद पूर्ण ।

 हेंच स्वरूपाचें लक्षण । अवीट अभिन्न अक्षय जें ॥७७॥

 

परि हें प्रथम कळलें नव्हतें । म्हणोनि धुंडिलें स्थानमानातें ।

नवल तोंवरि वाटलें होतें । न लक्षितां स्वरूपस्थिति ॥७८॥

 

जैसी जैसी जाणीव वाढवी । तैसी शक्ति व्यापक झाली ।

पुढे वाटली पर्वतावलि । गोवरी जैसी ॥७९॥

 

राजाहि वाटला घरचा गडी । सुचवावयाची झाली तातडी ।

संसार झाला आपुला सवंगडी । याचि गुणें ॥८०॥

 

आपुला आनंद पैसावला । सुखवूं पाहे दु:खिताला ।

 निद्रेत कोणी ओसणला । तरी ये दया त्याची जैसी ॥८१॥

 

परकेपणाची दृष्टीच गेली । वासना भावनेंत विरूं लागली ।

दुसर्‍यांचीं सुखदु:खें झालीं । आपणाऐसीं सहजचि ॥८२॥

 

मग माघारलीं पूजामंदिरें । दिसूं लागलीं जिवंत शरीरें ।

 यानेच दिसे सर्वांचें बरें । देवकृपा व्हावयासि ॥८३॥

 

जिकडे जिकडे उणीव भासे । तिकडे तिकडे मन उल्हासें ।

 धाविनो करी आपणाऐसें । एकचि अंग समजोनि ॥८४॥

 

जंव अंतरीं आत्मा कळला । तंव आपल्यांतचि विश्व पाहों लागला ।

 जैसा दिव्यदृष्टीचा प्रकाश गवसला । अर्जुनालागी ॥८५॥

 

मग अनंत उदरें अनंत हस्त । दिशा व्यापूनिया समस्त ।

दिसे विराटरूप महासमर्थ । ठायींच्या ठायी ॥८६॥

 

ही दृष्टि सर्वांसचि आहे । परि विचारें उघडील तोचि पाहे ।

 तो अनुभवमार्ग सांगती लवलाहें । संतसज्जन ॥८७॥

 

जैसे आकाशाचे तुकडे नोहे । ते घटोपाधीमुळेचि भासती पाहे ।

 तैसा जीव अल्पज्ञ वेगळा न राहे । अनुभव घेतां ॥८८॥

 

नुरे जीवाचें जीवपण । दारिद्यदु:ख रंकपण ।

आनंदाचें शिखर पूर्ण । प्राप्त होई निश्चयें ॥८९॥

 

मग प्रारब्ध तयाचा खेळ । प्रयत्न लीलारूप केवळ ।

आत्मरूपें विश्व सकळ । अनुभवा ये एकपणें ॥९०॥

 

जीव आपुली वारी व्यथा । तैसाचि सुखवी जगा समस्ता ।

उरला उपकारापुरता । सर्वांचिया आत्मभावें ॥९१॥

 

त्यासि नाही उरली कामना । निष्काम कर्म त्याचा बाणा ।

 मग बाधक होईल कोणा । कैशापरी संसारीं ॥९२॥

 

तो जें करी तें ईश्वरपूजन । बोलेल तेंचि वेदवचन ।

 त्यांच्या शब्दें आंदोलन । करिती जन सदभावें ॥९३॥

 

सत्तेविण त्याची सत्ता । क्रांतीहूनि सेवेची महत्ता ।

इशारा होतां मालमत्ता । लोक लाविती सत्कार्यीं ॥९४॥

 

त्याच्या संदेशाचें बळ । गांवीं करी प्रेमाचा सुकाळ ।

सुखी होती लोक सकळ । गांवोगांवींचे ॥९५॥

 

त्याच्या ज्ञानें भारले अज्ञजन । ते ज्ञानियांसि देतील शिकवण ।

 झुंजती काळाशीं दारूण । स्त्रिया मुलेंहि ॥९६॥

 

हें आत्मविकासाचें बळ । मानवी प्रयत्नाचेंचि फळ ।

 देव होवोनि करील सकळ । लोकचि देव ॥९७॥

 

मित्रा ! ऐसा अभ्यास करि । धरोनि मार्ग-बोध अंतरीं ।

मग दिसेल याच शरीरीं । तो श्रीहरि व्यापला ॥९८॥

 

लाभतां अनुभवाची खूण । जनता होईल जनार्दन ।

गांवीं ऐसा एकटाहि जाण । उन्नत करी गांव सारें ॥९९॥

 

तो प्रलोभनीं कोठे फसेना । रागद्वेषेंहि गोंधळेना ।

 त्याच्या सहवासेंचि ग्रामजीवना । अमृत लाभे ॥१००॥

 

ऐसा सेवकचि पाया जगाचा । गांवचा रत्ननिधिच तो साचा ।

अभ्यास करा सक्रिय अध्यात्माचा । याचसाठी ॥१०१॥

 

प्रयत्नें मानव होई देव । प्रयत्नें स्वर्गतुल्य होई गांव ।

संतांच्याहि अभेदभक्तीचें वैभव । ग्रामसेवा-प्रयत्नीं ॥१०२॥

 

ऐसे लोक निर्माण करावे । तरीच उदया ये जग नवें ।

नांदेल ग्रामविश्ववैभवें । सर्वकाळ तुकडया म्हणे ॥१०३॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभव संमत ।

स्वानुभवें कथिला अध्यात्मपथ । सदतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥



अध्याय३७वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।