अध्याय २८ वा
प्रार्थना व
विश्वधर्म
सर्व धर्माचा
समन्वय । विश्वशान्तीचा उपाय ।
लोकसुधारणेचें विद्यालय । सामुदायिक प्रार्थना
॥१॥
ऐसें झालें
प्रतिपादन । परि आमुचां ऐका प्रश्न ।
सर्व धर्मांची प्रार्थनापध्दति भिन्न । ते होतील
एक कैसे ? ॥२॥
कैसा रुचेल एक
पाठ ? प्रत्येकाची वेगळीच वाट ।
कैसे बसतील एकवट । भक्त भिन्न देवांचे ? ॥३॥
दुसर्या
धर्मीयांमाजीं बसतां । झाली वाटे धर्मभ्रष्टता ।
यासाठी उपाय सांगा कोणता । सामुदायिकतेसि ? ॥४॥
श्रोतियांचा
ऐकोनि प्रश्न । संक्षेपें करितों उपाय कथन ।
लोकां पटवावें तत्त्वज्ञान । सदधर्माचें नानापरी
॥५॥
जगीं दिसती
विभिन्न धर्म । परि सर्वांचें एकचि वर्म ।
विश्वधारणेचा मार्ग उत्तम । सदधर्म तोचि ॥६॥
व्हावी विश्वाची
उत्तम धारणा । शांति लाभावी सर्वजना ।
या एकाच उद्देशाने प्रयत्न नाना । केले
धर्मप्रवर्तकांनी ॥७॥
’ सर्व विश्व आर्य करीन ’ । ’ तिन्ही लोक आनंदें भरीन ’ ।
हें संतऋषींचें विशाल बंधुपण । नव्हतें
स्वार्थासाठी ॥८॥
लोक प्रतिमापूजक
नसावे । त्यांनी एका ईश्वरासि प्रार्थावें ।
हा महंमदाचा उपदेश नव्हे । एकाच देशासाठी ॥९॥
येशू ख्रिस्ताने
प्रेमपाठ दिला । प्राणहि पणास लावला ।
तेथे अन्य मानव नाही वगळला । कळपांतूनि देवाच्या
॥१०॥
बुध्द आणि महावीर
। श्रीकृष्ण आणि झरतुष्ट्र ।
यांनाहि सर्वांचीच फिकीर । विश्व सुखी होवो
म्हणोनि ॥११॥
त्या त्या
देशधर्माच्या संतीं । हीच व्यापक धरोनि वृत्ति ।
विशाल मानवसमाजाप्रति । सेवा दिली आपुली ॥१२॥
अन्य देशांचे आणि
भाषांचे । झालेले आणि होणारे साचे ।
थोर पुरुष गौरविले त्यांनी वाचें । आपुल्या
ग्रंथीं ॥१३॥
धर्मभ्रष्टतेची
कल्पना । ही मान्यचि नव्हती धर्माचार्यांना ।
सर्व विश्वाचीच त्यांना । काळजी होती समान ॥१४॥
सर्व विश्वाचा
एकचि देव । त्याचीं मुलें सर्वचि जीव ।
जरी वेगवेगळें दिलें नांव । तरी भाव हाचि
त्यांचा ॥१५॥
हिंदूंचा देव
हिंदुत्व धरी । मुसलमानांचा मुस्लिम करी ।
ख्रिश्चनाचा
ख्रिस्त्यांनाचि तारी । ऐसें म्हणणें आकुंचित ॥१६॥
सर्वांत उच्च ऐसी
भावना । जगच्चालकाची कल्पना ।
तेथे कैचा उरे भिन्नपणा ? आप-पर कोण ? ॥१७॥
भिन्न
मार्ग-मार्गी असती । परि देव नाही भिन्नस्थिती ।
मूळ धर्माचीहि नाही गति । भिन्नत्वाची ॥१८॥
सर्वचि म्हणती
जगत सारें । केलें आमच्या ईश्वरें ।
धर्माचा आदेश श्रेष्ठाद्वारें । दिला आम्हां
॥१९॥
ऐसे सर्वाधिपति
ईश्वर । काय जगीं असती शंभर ?
एकचि जगच्चालक परमेश्वर । तोचि सर्वांचा ॥२०॥
अल्ला, गॉड, अर्हत, देव । अहूरमज्द, निर्वाण, शिव ।
परमेश्वरासि ठेवा नांव । एक गुरुदेव तोचि माझा
॥२१॥
जगासि सुखी उन्नत
करावें । हेंचि त्या जगन्नियंत्या रुचावें ।
मग धर्माचें रूप याहूनि असावें । भिन्न कैसें ? ॥२२॥
आपणाऐसें
सर्वांचें सुखदु:ख । जाणोनि वागावें उपकारक ।
सर्व धर्मी हाचि आदेश एक । दुमदुमताहे ॥२३॥
यांचा करूं जातां
विचार । सर्व पंथधर्म भक्तिप्रकार ।
एकतत्त्वी कळती साचार । भेद भक्तांनी कां घ्यावा ? ॥२४॥
ज्याची बुध्दि
अल्पबल । ते घरांत करिती घरकुल ।
परि हें विश्व एकचि दल । मानवांचें ॥२५॥
एकचि भूमि
सर्वांकरितां । एकचि हवापाणी, सुख-व्यथा ।
पंचभूतांचीच सर्वथा । शरीरें सर्वांची ॥२६॥
एकचि जीवनाचें
मूळ । एकचि शेवटचें स्थळ ।
एकचि सेवाधर्म निर्मळ । नाना रूपीं ॥२७॥
सर्वांच्या
नेत्रीं एकचि ज्योति । सर्वांच्या अंगीं एकचि शक्ति ।
सर्वांठायीं एकाचीच व्याप्ति । तेथे भिन्न कोण
आले ? ॥२८॥
मुस्लिम ख्रिस्ती
जमात कांही । आकाशांतून आली नाही ।
त्यांचे पूर्वीहि होती मही । मानवांनी नटलेली
॥२९॥
एकाचें जग देवाने
केलें । आणि एकासि भुतांनी जीवन दिलें ।
ऐसें मानतां जग वेगळालें । दिसेना पंथधर्मांचें
॥३०॥
धर्मात नाही
हिंदु मुसलमान । धर्मांत नाही पारशी-खिश्चन ।
धर्मांत नाही शिख-जैन । पाहतां मुळीं ॥३१॥
लोक धर्मांची
व्याख्याच विसरले । धर्में हिंदु मुसलमान झाले ।
मूळचें मानवपणहि आपुले । हरविलें त्यांनी ॥३२॥
देशभाषेचे बुरखे
घातले । हवापाण्याने रिवाज बदलले ।
त्या बहिरंगासीच धर्म म्हणों लागले । अल्पज्ञानी
॥३३॥
देशाचारी राहणी
झाली । हवापाण्यापरी विशेषता आली ।
उत्पादनापरी आरंभिली । भोजन-व्यवस्था ॥३४॥
म्हणोनि काय
मानवत्वहि बदललें ? सत्यसिध्दान्ती अंतर पडलें ?
पाप-दु:खहि उचित वाटलें । उलटें कोणा ? ॥३५॥
हें म्हणणें मला
आवडेना । मी एकचि मानतों सर्वांना ।
आधी मानवता सर्वांचा बाणा । पंथभेदांना स्थान मग
॥३६॥
भिन्न राहणी
भिन्न उपासना । म्हणोनि का पारखा मानवपणा ?
जरी भिन्न पध्दतींनी केली प्रार्थना । तरी काय झालें ? ॥३७॥
एकाचि सागराची
वाफ । होऊनि आली पाणीरूप ।
थेंब कामें करोनि
खूप । जातील शेवटीं एका स्थळीं ॥३८॥
तैसेचि आहे
मानवांचें । मानव कोणत्याहि धर्माचें ।
परंतु समाजरचनेसाठी त्यांचे । महत्त्व सारिखें
॥३९॥
आदि-अंतीं सर्वचि
एक । मध्ये समाजसेवेचें कौतुक ।
त्याचेंहि मूल्य
समान देख । मानवधर्म-दृष्टीने ॥४०॥
धर्म सांगे
पुजारी व्हावें । धर्मचि सांगे भंगी व्हावें ।
धर्म म्हणतो
गावें-नाचावें । सर्वांसाठी ॥४१॥
ऐसें वेगवेगळें
कर्म केलें । तरी परकेपण नाही ठेविलें ।
सर्व मिळोनि एक झाले । तोचि धर्म ॥४२॥
धर्मामाजीं सर्व
येतें । परंतु तारतम्य पाहिजे तेथे ।
मानवाशीं होय
विद्रोह ते । न करावें धर्म म्हणे ॥४३॥
धर्माची आखणी
मानवता । मानवतेसाठी करावी व्यवस्था ।
कोठेहि होतां अव्यवस्था । धावोनि जावें ॥४४॥
ही व्यवस्था
जेव्हा अपुरी पडली । तेव्हाचि गट वृत्ति निर्माण झाली ।
व्यक्तिमत्वाचीं प्रलोभनें वाढलीं । भिन्न
मार्गांनी ॥४५॥
विश्वाचे ऐसे
झाले तुकडे । कोणीहि गेला कोणीकडे ।
नांवरूप धरोनि वेडेंवाकडें । फुटला धर्म ॥४६॥
देशकालादिकासि
बघून । केलीं साधनें निर्माण ।
त्या फांद्यांनाचि धर्मवृक्ष मानून । आखणी झाली
गटांची ॥४७॥
म्हणोनि पडलें
विभिन्न नाम । हिंदु-मुसलमान-ख्रिश्चन धर्म ।
जैन-शिख-महानुभाव-ब्राह्म । नामें धर्मामाजीं
॥४८॥
अजोनि खुंटली
नाही संख्या । जेवढी पंथसंप्रदाय-व्याख्या ।
सर्वांसीच धर्मनामाअख्या । पुढे लागे ॥४९॥
घराघराचा अलग
धर्म । धर्म एकेक व्यवहारकर्म । ’
आपलें जगणें ’ हेंचि सत्याचें वर्म । ऐसा भ्रम जाहला ॥५०॥
ऐसी जंव वाढली
प्रथा । तंव झाली सर्वांसीच व्यथा ।
मग म्हणती विरोधी
धर्मपंथां । केलें पाहिजे शासन ॥५१॥
हें आवराया
निर्मिली सत्ता । सामदामदंडभेद-प्रथा ।
हा राजधर्महि
लावण्यासि व्यवस्था । मानवांची ॥५२॥
जे धर्ममार्गी
संघटित झाले । त्यांनी न्यायसत्र आरंभिलें ।
आपापल्या परींनी केलें । स्थापन राज्य ॥५३॥
राज्य केलें
धर्मासाठी । परि उपभोगचि लागला पाठीं ।
लागली अहंतेची आटाआटी । आसक्तीमुळे ॥५४॥
मग धर्मचि वगळून
गेला । राजकारण धर्म झाला ।
त्यासाठी गलबला वाढला । सर्व देशीं ॥५५॥
विसरोनि सेवाधर्माचें
अधिष्ठान । राज्य करावें हेंचि मोठेपण ।
राबवावें मानवां पूर्ण । ऐसें झालें ॥५६॥
मग मानवाच्या
सुखासाठी । मानव द्यावेत बळी संकटी ।
पडली ऐसीच राहटी । लोकांमाजीं ॥५७॥
गेलें प्रेमाचें
समजावणें । लागलें तलवारीस धार देणें ।
जो करील हिंसा अधिकतेने । तो विजयी ठरला धर्मवान
॥५८॥
सत्ताबळ संख्याबळ
। त्यावरि धर्म ठरला प्रबळ ।
तेथे सत्याचें
फुटलें कपाळ । शक्तियोगें ठरतां धर्म ॥५९॥
मग धर्मचि झालें
हतियार । धर्माकरितां युध्द संहार ।
धर्मयुध्दाचें
बंड थोर । वाढलें लोकीं ॥६०॥
सत्य त्याग
सेवेसि कोणी पुसेना । आपुलींच मतें मिरविती नाना ।
ऐसा हा झाला धिंगाणा । पृथ्वीवरि ॥६१॥
बिघडोनि गेली
धर्माची रीति । ती सुधारावया अपुरी शक्ति ।
म्हणोनि
देवादिकांनाहि हातीं । शस्त्रें धरावीं लागली ॥६२॥
तें धर्मयुध्द
न्यायाचें होतें । उन्मत्तता मुळीच नसे जेथे । ’
बळी तो कान पिळी ’ हें तेथे । लावणें हा अधर्म
॥६३॥
न्यायदानांत
द्वेषपाप नसतें । परि जेव्हा आसक्ति देशाची घेरते ।
तेव्हा माणसाची
बुध्दि जाते । विनाशाप्रति ॥६४॥
मग युध्द
राष्ट्राची अरेरावी । घमेंड कुटिलतेच्या उठाठेवी ।
अधर्म तो जरि
असेल युध्दचवी । कोणाचीहि अन्यायी ॥६५॥
माणूस माणसासि
मारी । अपराध नसतां दमन करी ।
तें युध्दहि परि दुराचारी । बोलिलें शास्त्रीं
धर्मांचेंहि ॥६६॥
हा न्याय जेव्हा
सकळांना कळे । तेव्हा थांबे युध्दाचें वारें सगळें ।
मानवसमाज
माणुसकीशीं मिळे । न्यायदेवतेपुढे ॥६७॥
जें युध्दांचें
तेंचि लहान झगडयांचें । तैसेंचि कुटुंबांमधील कलहांचें ।
हें सारें प्रदर्शन अज्ञानाचें । वेगळाल्यापरीं
॥६८॥
धर्म, पंथ आणि पक्ष, देश । यांच्या नशेचा अभिनिवेश ।
धर्मवेडें करोनि मानवास । न्यायमार्गें जाऊं
नेदी ॥६९॥
जेव्हा मुसलमान
राज्य करी । तेव्हा देवळें पाडोनि मशिदी उभारी ।
आपण शहाणे म्हणोनि वाजवी भेरी । लौकिकामाजीं
॥७०॥
त्याची सत्ता
विलया गेली । तेव्हा हिंदूने मसजिद पाडली ।
आपलीशी करोनि
सोडली । दुसर्या पंथीं ॥७१॥
जेव्हा
ख्रिश्चनाचें बंड आलें । तेव्हा त्याने चर्च वाढवले ।
आपुलें जाळें पसरोनि दिलें । मनमाने त्यांनी
॥७२॥
रागद्वेषांचें
समाधान । अभिलाषापूर्तीचें साधन ।
म्हणोनि केलें
युध्द वा दमन । सूडबुध्दीने ॥७३॥
हा तो नव्हे
धर्मविचार । हा आहे शक्तीचा व्यवहार ।
धर्मात मान्य नाहीच संहार । निरपराध मानवांचा
॥७४॥
धर्मांत आहे
सुव्यवस्था । शांति, बुध्दि, न्यायप्रियता ।
अहिंसेने
समजावितां । होतो धर्म श्रेष्ठ ऐसा ॥७५॥
मानव मानवासाठी
कष्टतो । दुसर्याच्या सुखीं सुखावे, श्रेष्ठ तो ।
परि मानवास मानव संहारतो । अधर्म याहूनि कोणता ? ॥७६॥
हेंचि जयांना
अंतरीं कळलें । तेचि महामानव समजले गेले ।
मग कोणतेहि पंथ
धर्म जरी असले । सर्व चांगले आम्हांलागी ॥७७॥
सर्वचि
धर्मपंथांचे देव । धर्मप्रवर्तक महामानव ।
यांचा ऐसाचि असे भाव । व्हावे मानव सर्व सुखी
॥७८॥
जगीं नांदावी
सुखशांति । सर्वांनी आचरावी बंधुप्रीति ।
यासाठीच झटले
असती । महापुरुष अभेदत्वें ॥७९॥
धरोनि हाचि विशाल
हेत । कालानुसार काढिले पंथ ।
केला उपदेश लिहिले ग्रंथ । परोपरीं त्यांनी ॥८०॥
याचसाठी आजवरि
झालीं । कुराणें पुराणें धर्ममतेंहि भलीं ।
परि अहूनिहि नाही
आकळली । खोली याची सर्वांना ॥८१॥
पूर्वीपासूनि
प्रयत्न झाले । न कळणारांनी विरोधिलें ।
अजूनहि प्रयत्न चालले । याचि मार्गाचे ॥८२॥
आम्ही आहोंत
प्रयत्नवादी । देवादिकांचे विशाल संवादी ।
जगासि तैसी लाभो सदबुध्दि । म्हणोनि प्रार्थना
आरंभिली ॥८३॥
यांत नवीन नाही
गोविलें । पूर्वीच्या धर्माचें हृदगत भलें ।
तेंचि एकत्र
करोनि ठेविलें । वेगळया स्वरूपें ॥८४॥
सर्वचि थोरांचे
थोर विचार । सर्वाच्या पध्दतींचा सार ।
करोनि ठेविला गुच्छाकार । समाजापुढे ॥८५॥
ज्यांत
परस्परांचें समाधान । जेणें सकलांचें सुंदर जीवन ।
तेंचि साधावया अनुसंधान । प्रार्थना केली ॥८६॥
समन्वयकारी
प्रार्थनापाठ । ही नव्हे पोलादी चौकट ।
येथे प्रत्येकासि
वाव असे स्पष्ट । आपुलें गोवाया ॥८७॥
तात्त्विकता
कुठूनहि घ्यावी । आपुलीच ’ एक टांग ’ नसावी ।
सर्वांच्या समाधानाची ठेवावी । सहनशील बुध्दि
॥८८॥
ऐसी प्रार्थनाच
शान्ति-प्रभावी । शान्तीसाठी विशालता हवी ।
विशालतेसाठी सोय व्हावी । परस्परांची ॥८९॥
परस्परांच्या
हृदयांसि स्पर्शता । जवळ येईल आत्मीयता ।
तेणेंचि विश्वासि
प्रेमें जिंकतां । होईल प्राप्ति सुखशांतीची ॥९०॥
धर्म-पंथ-देशांचें
भांडण । न मिटे ऐक्य-प्रेमाविण ।
तें प्रेम साधाया
प्रार्थनेसमान । पातळी नाही उत्तम ॥९१॥
सर्वचि धर्मीं
प्रार्थनातत्व । सात्विकतेंतचि टिकाऊ एकत्व ।
याचें जाणोनिया
महत्त्व । आणावें सर्वां एके ठायीं ॥९२॥
परस्परांचा संबंध
नव्हता । म्हणोनि पध्दतींत बदल होता ।
त्यांस आतां जवळ
आणतां । पाप कैसें ? ॥९३॥
सर्व विश्वाची
एकचि प्रार्थना । सर्व विश्वाचा एकचि बाणा ।
सर्व विश्वांतचि
एकपणा । कां न यावा ? ॥९४॥
न येण्याचें एकचि
कारण । आकुंचित आमुचें ज्ञान ।
म्हणोनि आपापल्या
परीने मंडण । केलें असे धर्मांचेंहि
॥९५॥
देवापासूनि एक
होती । तेचि विशाल मन करिती ।
अल्प ज्ञानियापाशी फजीती । मानवधर्माची ॥९६॥
ते समजती
भ्रष्टाकार । इतर तुच्छ आपण थोर ।
त्यांना
स्वत:चाहि धर्म-विचार । कळला नाही ॥९७॥
प्रार्थनीं
सर्वांनी फड मांडावे । प्रार्थना संपतांचि वितंडावें ।
ते प्रार्थी
नव्हेत पेंढारी म्हणावे । स्वार्थी ऐसे ॥९८॥
लोक स्वार्थांनी
दुरावले । आपसांत लढूं लागले ।
ते उपासनेने जवळ आले । होईल ऐसें ॥९९॥
त्यासाठी त्यांना
ज्ञान द्यावें । धर्मसमानत्व शिकवावें ।
न पटे तोंवरि प्रार्थनेसि लावावें ।
स्वधर्माच्याचि ॥१००॥
भिन्न धर्मांनी
भिन्न प्रार्थना केली । परि प्रार्थनातत्त्वें प्रतिपादिलीं ।
तरी आदरभावना सर्वत्र वाढली । होईल ऐसें ॥१०१॥
याने तयार होईल
भूमिका । प्रत्येक धर्म आपणासारिखा ।
तेणें विश्व शान्तिसुखा । पावेल एक होऊनि ॥१०२॥
म्हणोनि धरिली ही
साधना । साधा सामुदायिक प्रार्थना ।
सामुदायिक होण्याचीच धारणा । आरंभिली सात्विक
॥१०३॥
ईश्वराची जी
मनोकामना । एकापसोनि अनेकपणा ।
अनेकान्तरीं एकत्व भावना । उपभोगावी या द्वारें
॥१०४॥
सर्वांनी
चहूकडोनि यत्न करावे । आपल्यापरीने जवळ यावें ।
सिध्दान्तांचें
गोडवे गावे । म्हणजे वेळ न लागे ॥१०५॥
सिध्दान्तरूप
तत्त्वज्ञान । लोकांमाजीं रुजविल्याविण ।
न होय पंथद्वेषादिकांचें उच्चाटन । नेहमीकरितां
॥१०६॥
सामुदायिक
प्रार्थनारूपें । हें तत्त्व रुजविणें असे सोपें ।
म्हणोनि लागा खटाटोपें । कार्यासि या गांवोगांव
॥१०७॥
गांवोगांवीं
धर्मसमभाव । मग आपैसेंचि सुखावे विश्व ।
पृथ्वीसि लाभेल स्वर्ग-गौरव । तुकडया म्हणे
॥१०८॥
इतिश्री
ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
धर्मसमन्वय कथिला येथ । अठ्ठाविसावा अध्याय
संपूर्ण ॥१०९॥
अध्याय २८वा ऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा