.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ५ वा वर्ण-व्यवस्था

अध्याय ५ वा


(स्वामी रामतीर्थ यांच्या बद्दल अधिक माहिती साठी  क्लिक करा )


वर्ण-व्यवस्था


साधावया पुरूषार्थ परम । आचरावया मानवधर्म ।

निवेदले चार आश्रम ।   गृहस्थाश्रम मुख्य त्यांत ॥१॥

 

गृहस्थाश्रमीच समाज बहुतेक । त्याच्या गरजा असती अनेक ।

आणि प्रकृतीनेहि लोक । भिन्न भिन्न ॥२॥

 

जरी मानव दिसती समान । दोन हातपाय डोळे कान ।

तरी स्वभावाचें भिन्नपण । ओळखूं येतें ॥३॥

 

स्वरूपाची धारणा वेगळी । जी विचारें भरली सगळी ।

संस्कार खेळती चेंडूफळी । वेगळाले ॥४॥

 

एक शांत एक उग्र । एक चंचल एक एकाग्र ।

कोणें निवडावीं समग्र । गुणकर्में तीं ॥५॥

 

मग मानव कैसा म्हणावा एक । अधिकारहि न दिसे सम्यक ।

त्याचें जीवनहि भिन्नतेचें निदर्शक । स्वभावापरी ॥६॥

 

भिन्न वृत्ति भिन्न प्रकृति । भिन्न कुटुंबें भिन्न संगति ।

तीं आदळतीं परस्परांवरती । ज्ञान नाही म्हणोनि ॥७॥

 

त्यांत एक संधि ओळखूं येते । स्वभावसाम्य निवडलें जातें ।

 राजस तामस सात्विक दिसते । प्रकृति वेगळाली ॥८॥

 

स्वभावाचे तीनचि प्रकार । त्यांत बसती सर्व प्राणीमात्र ।

जितुकें म्हणोनि विषयमंत्र । या जगीं जीवकोटीचें ॥९॥

 

ज्याचें अंगी जो मुख्य गुण । त्यापरीच त्याचें सारें वर्तन ।

 प्रत्येकाचें कर्म भिन्न । एकमेकापासूनि ॥१०॥

 

प्रत्येक भिन्न दिशेस जाई । तरि समाज कैसा सुदृढ राहीं

मग कैसी उन्नति होई । व्यक्तीची आणि देशाची॥११॥

 

हें धर्मवेत्त्यांनी जाणलें । गुणकर्मविभाग ध्यानीं घेतले ।

 परस्परांसि पूरक बनविले । समाजव्यवस्थेकारणें ॥१२॥

 

सत्त्वप्रधान रजप्रधान । मिश्रित आणि तमप्रधान ।

शुध्दाशुध्द लक्षूनि गुण । विभाग चार नेमिले ॥१३॥

 

निसर्गावरि केली रचना । म्हणोनि म्हणती ईश्वरी योजना ।

कल्पिलें बुध्दि - बाहु - उदर - चरणा । समाजपुरूषाच्या ॥१४॥

 

मुळांत सर्वचि एकसम आहे । परि अनंत गुणें व्यापलें राहे ।

 गुण गुणासि पोषक होय । यासीच संसार बोलती ॥१५॥

 

धंदे असती अनेक गुणांचे । परि मुख्य भेद चारचि त्यांचे ।

म्हणोनि चातुर्वर्ण्य नांव याचें । ठेविलें ऋषिजनीं ॥१६॥

 

संरक्षण देती ते क्षत्रिय । व्यापार करिती ते वैश्य निर्भय ।

न्यायदर्शन योजनाकार्य । ब्राह्मणवर्णा नेमिलें ॥१७॥

 

या तिन्ही कामीं अनधिकारी। तया शूद्र नाम निर्धारीं ।

करी सर्वाची सेवाचाकरी । तोहि सर्वांसि पूरक ॥१८॥

 

सत्य न्याय अस्तेय संयम । सर्वांसि सारखाचि नियमधर्म ।

परि आपापलें भिन्न कर्म । वाहूनि पूजिती समाजदेवा ॥१९॥

 

जो ज्यापाशीं उत्तम गुण । त्यानेच त्याचें चालावें जीवन ।

व्हावें समाजाचेंहि धारणपोषण । हीच योजना चातुर्वर्ण्यीं ॥२०॥

 

भिन्न गुणांचा सहकार्य - संगम । त्यांत सर्वांचाचि योगक्षेम ।

मग कैसा चाले जीवनसंग्राम । वर्गकलह न राहे ॥२१॥

 

सर्वकालीं सर्वदेशीं । नैसर्गिक गुणभिन्नता ऐसी ।

म्हणोनि वर्णाश्रमयोजना जगासि । शांतिदायी ॥२२॥

 

परि हें तत्त्व राहिलें मागे । आसक्तीचे जडतां धागे ।

आपुला पुत्र शूद्रापरी वागे । तरी त्या गणावें आपुल्यावर्णीं ॥२३॥

 

नजरेआड केले कर्मगुण । जन्मावरोनि चालले वर्ण ।

धंद्यांवरोनी जाति भिन्न । वाढल्या लोकीं ॥२४॥

 

त्यांतहि ज्ञात्यांनी । ठेविलें धोरण । कर्मांतूनि गुण निर्माण ।

 केले संस्कारांची देऊनि घडण । जन्मलेल्यासि त्या वर्णाचे ॥२५॥

 

पूर्वी त्यासाठी होते संस्कार । शिक्षणक्रम शिकवी व्यवहार ।

 मागील ऋषी असती चतुर । समाजव्यवस्था चालवाया ॥२६॥

 

तयांनी कुटुंबेंच संस्थामय केलीं । बालपणापासून शिकवण दिली ।

परंपराचि तैसी बनविली । प्रयत्नांनी गुणकर्मांची ॥२७॥

 

शेतकर्‍याच्या मुलास शेती । तरवार क्षत्रियपुत्राहातीं ।

वैश्याचीं मुलें तराजू धरती । लहानपणापासूनि ॥२८॥

 

ब्राह्मणाच्या मुला मंत्रजप । शिकविला जाई आपोआप ।

ऐसा हा परंपरेचा व्याप । चालला होता ॥२९॥

 

जो जयाने धंदा केला । त्याचा स्वभावचि तो बनला ।

 स्वभाव बनतां संस्कार जडला । अंगी तयाच्या ॥३०॥

 

तैसेचि मग त्याचें वर्तन । तैसेंचि खेळणे बोलणें भोजन ।

अंगे - अंगे जाती बनून । संस्कारसंगे ॥३१॥

 

परि ही परंपराहि मोडली । सत्तालोभें फूट पाडली ।

लहानथोरासि भावना वाढली । उपभोगाची ॥३२॥

 

कांही आपत्ति कांही संगति । कांही सत्ता कांही प्रकृति ।

यामुळे दुसर्‍यांचे धंदे हाती । घेतले सुखास्तव ॥३३॥

 

वैश्यधंदा एकाने धरला । व्याजभोगी व्यापारी बनला ।

आपुल्याहि मित्राचा घेतला । मुनाफा त्याने ॥३४॥

 

त्यांत तारतम्यचि न राही । भरमसाट वाढली मुनाफशाही ।

जनतेचें हित कोण पाही । मिसळून देई माल खोटा ॥३५॥

 

खोटें बोलणें सहजीं घडे । स्वार्थापायी पाप वाढे ।

यास कोण सांभाळील चोखडें । सत्ता नसतां जागरूक ॥३६॥

 

सहज कोणी त्यास म्हणावें । तरि शत्रुभाव अधिक बळावे ।

मग दोघांचेहि धंदे बरवे । एकाच मार्गीं ॥३७॥

 

गांवचे लोक विरुध्द होती । म्हणती आमुचीच कां धर्में फजीती

तेहि पुढे कामचोर होती । अडवणूक करिती वैश्याची ॥३८॥

 

सर्वांमध्ये कलह माजे । त्यासि निवारावें क्षात्रतेजें ।

तरि तेहि बिचारे पोटाच्या काजें । धावती स्वैर ॥३९॥

 

जिकडे पैसा मान मिळे । तिकडे धावंती क्षत्रियबाळें ।

न्यायनीती कोण सांभाळे । झुके पारडे पैशांनी ॥४०॥

 

चोरी पकडण्या चोर धावले । शिपायीबाणा घेऊनि भले ।

तेणें चोरांना अधिकचि फावले । चोरी करण्या गांवाची ॥४१॥

 

तेथे ब्राह्मणांनी करावे न्यायदान । सर्वांसि ठेवावें सेवापरायण ।

तरि तेहि पाहूनि दान मान । झाले त्यांचेंच साह्यकारी ॥४२॥

 

पुढे ऐसीच झाली रीति । दंडुकेशहासि क्षत्रिय म्हणती ।

चोरव्यापारी त्यासि बोलती । लोक वैश्याधिकारी ॥४३॥

 

बुध्दीने जो फाटाफूट करी । तो ब्राह्मण जाहला निर्धारीं ।

ऐसी बिघडली वर्णव्यवस्था पुरी । गांवोगांवीं ॥४४॥

 

त्यामाजीं जो कमजोर ठरला । तो शुद्र म्हणोनि बाहेर काढला ।

अन्नान्नदशा करोनि सोडला । जीवनकलही ॥४५॥

 

वर्णजातींचे गुणकर्म नाही । मोडून केली नोकरशाही ।

नागविली भावना सर्वहि । वर्णाश्रमाची ॥४६॥

 

अभिमान राहिला वर्माचा । चुराडा झाला गुणकर्मांचा ।

ऐसा घडविला संस्कार गांवाचा । घडी काही बसेना ॥४७॥

 

ऐसें मुळीच पूर्वी नव्हतें । परस्परपूरक धंदे सर्व ते ।

 सर्वांचेच कल्याण त्यांत होतें । समभावाने ॥४८॥

 

परि तो सारा वर्णाश्रम । आज होऊनि बसला भ्रम ।

वर्णांश्रमांतील नेमिलें काम । बहुतेकांनी सोडलें ॥४९॥

 

ब्राह्मण जोडे शिवण्यासि लागला । चांभार तो पुजारी बनला ।

 क्षत्रियें नोकरीपेशा धरिला । वैश्याघरीं ॥५०॥

 

वैश्य लढे सैन्यांत जाऊन । शुद्र करिती कथाकिर्तन ।

यासि वर्णसंकर म्हणती जन । करिती मात्र सर्वचि ॥५१॥

 

परि जाति मागचीच सांगती । कामे मात्र भलतींच करिती ।

तेणें होते अनिश्चिती । समजावया लोकांसि ॥५२॥

 

वडिलांचा धंदा भिन्न होता । तो मुलाच्या जंव नसे हातां ।

तरि वडिलांचा धंदा मुलाने सांगतां । अर्थ काही निघेना ॥५३॥

 

म्हणोनि जेणें जें काम करावें । त्याच वर्णजातीचें म्हणवावें ।

 ऐसें तरी असावें बरवें । वर्णजाति मानलिया ॥५४॥

 

ऐसेंचि नामाभिधान चालतें । आणि सर्व लोक तैसेंचि वागते ।

तरि वर्णव्यवस्था भ्रष्ट झाली म्हणतें । कोण कैसें॥५५॥

 

परि जन ऐसें म्हणवाया लाजती । कर्में मात्र विपरीत करिती ।

पूर्वजांचिया नावें जगती । आळशापरी ॥५६॥

 

जरी झालो कर्मभ्रष्ट । तरी आपण इतरांहूनि श्रेष्ठ ।

ऐसा प्रतिष्ठेसाठी बळकट । धरिली रूढि ॥५७॥

 

वास्तविक कामाकरितां वर्ण झाले । समाजासि सर्वचि लागलें ।

म्हणोनि सर्वांनाचि महत्त्व भले । ब्राह्मणापासोनि महारावरि ॥५८॥

 

त्यांत तूं नीच मी उच्चम्हणोन । वाढविलें आडंबर पूर्ण ।

 त्यानेच जाहलें पतन । वर्णांचें आणि गांवाचें ॥५९॥

 

प्रत्येक धंद्याचें गम्य भिन्न । वेगळी खुराक वेगळें वळण ।

 यासाठीच होतें वेगळेपण । रोटीबेटी - व्यवहाराचें ॥६०॥

 

तेथे अज्ञानाने भेद पाडले । हाती सत्ता ते मोठे ठरले ।

समाजाची स्वच्छता करीत मेले । ते ते बोलिले नीच ऐसे ॥६१॥

 

वास्तविक नीचता दुराचारें होते । खरी उच्चता तपाने लाभते ।

जातीमातीवरि कैसी ठरते । उच्चनीचता ॥६२॥

 

ज्याने कांही नीचता केली । समाजाने त्यास शिक्षा दिली ।

म्हणोनि अस्पृश्यता बोलली । कांही कारणें ॥६३॥

 

परि त्यांची पीढीच नीच समजावी । आपुली नीचता ती लपवावी ।

दुसर्‍याची उत्तमताहि न गौरवावी । प्रथाच पडली यापरी ॥६४॥

 

अरे ! हें कुठलें न्यायदान । हें तों गुलामीचें लक्षण ।

याने कैसे होईल पुनर्निर्माण । गांवाचें आमुच्या ॥६५॥

 

म्हणोनि अस्पृश्यता क्रियेवरि मानावी । जाति सर्व एक जाणावी ।

आपापल्या परीने उचलावीं । कामें सकळांनी ॥६६॥

 

जाति सर्वांचि एकचि आहे । परि धंदा गुणकर्मांसम राहे ।

आपल्या उद्योगाच्या प्रवाहें । ओळखी द्यावी ॥६७॥

 

येरव्ही सर्वत्रचि सर्व वर्ण । सर्वांतचि दिसती सर्वगुण ।

परि कोणतें गुणप्राधान्य । तेंचि ओळखावें मुख्यतः ॥६८॥

 

शुद्राघरीं उत्तमवर्तनी जन्मला । तो शूद्रचि कैसा राहिला

तैसा क्षत्रियाघरीं भ्रष्ट निपजला । तो क्षत्रिय कैसा ॥६९॥

 

एक ब्राह्मण दुकानीं बैसला । मांसमच्छी विकों लागला ।

त्याची पूजा कराया एक गेला । शोभा देईल काय तें ॥७०॥

 

ब्राह्मण म्हणवूनि विलास करी । नाना व्यसनें अंगीकारी ।

करी नोकरी सावकारी । तो ब्राह्मण कां मानावा ॥७१॥

 

परंपरेने गोसावी होणें । मग त्याने विवाहाचा थाट करणें ।

तें केवढें होय लाजिरवाणें । लोकांमाजी ॥७२॥

 

आचार्य आणि आचारी । एकाच जातीचे अधिकारी ।

म्हणोनि काय आदर एकाचपरी । करावा लोकीं निष्ठेने॥७३॥

 

ऐसें कोणासहि ब्राह्मण म्हणावें । पूजूनि त्याचे पाय वंदावे ।

 त्याने जोडयांच्या दुकानीं नोकर कां न व्हावें । पाय पुसाया ॥७४॥

 

वास्तविक जातिवंत जे ब्राह्मण । त्यांनी स्वतःच टाळावें हें पूजन ।

म्हणावें माणुसकीनेच नमन । करूंया सर्वां ॥७५॥

 

आपण वेगवेगळा धंदा करणारे । सर्व बरोबरीचे मित्र बरे ।

 हें पूजेचें ढोंग सारें । आम्हीच कासया करावें ॥७६॥

 

ऐसें लोकासि शिकवावें । बिघडलें दिसेल तें सुधरावें ।

जनासि उद्योगि बनवावें । आपुल्यापरी ॥७७॥

 

जेथे दिसती ब्राह्मणाचे गुण । त्यासि आदरें म्हणावें ब्राह्मण।

 ऐसा स्थापिलाचि आहे सनातन । नियम वर्णाश्रमाचा ॥७८॥

 

म्हणोनि गुणांवरचि लक्ष द्यावें ।जो ज्या गुणीं तो त्या वर्णीं म्हणावें ।

सर्व गुणांचा आदर स्वभावें । सर्वांकरितां असावा ॥७९॥

 

जो जैसा कर्म करूं लागला । तो त्याचि वर्णाचा अधिकारी झाला ।

 सर्वत्र नियम हा चालला । तरीच होईल सुव्यवस्था ॥८०॥

 

येथे संशय उभा झाला । विविध कर्में करावी लागती एकाला ।

तरि काय वेळोवेळीं म्हणो त्याला । ब्राह्मण क्षत्रियादि गुणाऐसें ॥८१॥

 

एक वैश्यकर्मी असला । परि ध्यानासाठी मंदिरी बसला ।

 तरि तो वैश्य कैसा ठरला । तया स्थानी ॥८२॥

 

एक भंगी - काम करी । वेळ मिळतांचि ये प्रार्थनामंदिरी ।

 त्याचें भंगी नामचि उच्चारी । कोणत्या न्यायें ॥८३॥

 

त्यां क्षणी तो खराच ब्राह्मण । परि त्याचें नित्यकर्म अन्य ।

 म्हणोनि प्रामुख्याने नामाभिधान । धंदे पाहूनि ठेविती ॥८४॥

 

एकाचें लक्ष्य मुख्यतः व्यापार । परि तो करितो कीर्तन सुंदर ।

 म्हणोनि त्यास ब्राह्मण म्हणणे साचार । होईल कैसे ॥८५॥

 

सदब्राह्मण शेती करू लागला । म्हणोनि तो माळीच मानला ।

याने येईल क्षणाक्षणाला । अनवस्थाप्रसंग ॥८६॥

 

बहुरूपी कधी राजे बनती । म्हणोनि काय राज्य चालविती

ज्याची कला त्याचे सांगाती । येरां काय वैभव तें ॥८७॥

 

म्हणोनि याची ऐसी आहे रीती । ज्यांत ज्याची मुख्य अंतरवृत्ति ।

त्याच्या जीवनाची निश्चिती । दाखवि तें विशेष कर्म ॥८८॥

 

त्याचें विशेष कर्म कोणतें । गुण कोणते विषय कोणते ।

अंग कोणते अंतरंग कोणतें । तें पाहूनि नाम ठेवावें ॥८९॥

 

ज्यामध्ये ज्याचें सर्व तनुमन । सर्वस्व ज्यांचें ज्यांत लवलीन ।

ऐशा प्रमुख गुणावरून । म्हणावा तो त्या वर्णाचा ॥९०॥

 

येथे म्हणण्याचेंचि नाही महत्त्व । जें जयाचें असेल सर्वस्व ।

त्यापरी त्याचा व्हावा गौरव । समाजामध्ये ॥९१॥

 

समाजाची रचना नेटकी । बसेल तैसें करावें कौतुकीं ।

 दीक्षा घ्यावी समजोनि निकी । गुणकर्माची ॥९२॥

 

जाणत्यांनी तत्त्वें अभ्यासावी । रूपांतरें व्यवहारी आणावीं ।

बिघडली घडी दुरुस्त करावी । समाजाची ॥९३॥

 

सुखी व्हावा गृहस्थाश्रम । मिटावा जीवनाचा संग्राम ।

सहकार्याने नांदावे ग्राम । यासाठी बुध्दि सर्वां द्यावी ॥९४॥

 

जेव्हा गुण गुणांशी द्रोह करी । तेव्हां पडे बुध्दि अपुरी ।

हें सांभाळण्याचें कार्य करी । ब्राह्मण तें ॥९५॥

 

गुणासि गुणाचें सहकार्य । मिळोनि व्हावें सफल कार्य ।

हा सृष्टिक्रमाचा व्यवसाय़ । ब्राह्मण्याकडे ॥९६॥

 

हें करावया ऐक्य निर्माण । आज पाहिजेत गुणवंत ब्राह्मण ।

ब्राह्मण्यावाचूनि हें साधन । घडेचि ना ॥९७॥

 

सामुदायिक बुध्दीची शिकवण । सर्व जीवांत समत्वस्थापन ।

 विषम पात्रांचें समाधान । करूण देणे ब्राह्मणकर्म ॥९८॥

 

ब्राह्मण तो दूरदृष्टि । त्याचें घरचि समष्टि ।

 सुरळीत चालण्या होय कष्टी । ब्राह्मण तो ॥९९॥

 

ब्राह्मण ह्रदयाचा अति निर्मळ । दुष्टबुध्दीचा महाकाळ ।

 हिंसेवाचूनि करी प्राजंळ । मन दुर्जनांचें ॥१००॥

 

शक्तियुक्तीचा उदार । भक्तिमुक्तीचा आधार ।

सर्वोदयाने संसार । नटवी जो ॥१०१॥

 

जो सर्वांसि प्रेमें सांभाळी । गांवसेवाचि मानी आगळी ।

उणें पडों नेदी कधीकाळी । कोण्या प्रकारें ॥१०२॥

 

त्याचें लक्ष नोहे येरव्ही । जें बिघडेल तें नीटचि करवी ।

 जुळवाजुळवीची पैरवी । ब्राह्मणाकडे ॥१०३॥

 

सर्वांशी सर्वाचें जळवावें । कीर्तिस्फूर्तीने ग्राम भरावें ।

लौकिक पारमार्थिक पडों न द्यावें । उणें ग्रामवासियांचें ॥१०४॥

 

गांव करावें व्यवहारचतुर । त्यांत भरावे निर्मळ संस्कार ।

परस्परांत निर्मावा सहकार । न्यायनीतीने चालण्या ॥१०५॥

 

हें शिकवाया थोरांच्या कथा । सांगत जाव्या मिटाया व्यथा ।

 त्याग वाढवावा उचित प्रथा । थोरामोठयांच्या दावूनि ॥१०६॥

 

त्यासाठी कृष्णकथा रामजन्म । चालवावा महात्म्यांचा पुण्यतिथिक्रम । 

ग्रंथांतरीचा न्यायसंग्राम । शिकवावा निर्भय व्हाया ॥१०७॥

 

प्रत्येकाचें कर्तव्य सांगोनि । आपुल्या उत्साहें उद्योगी लावोनि ।

करावी ग्रामाची मेळणी । विशाल मार्गे ब्राह्मणें ॥१०८॥

 

असोनिया गांवी ब्राह्मण । पडली तटे चाललें भांडण ।

तरि समजावें । तो पावला पतन । गांव मोकाट सुटलें हें ॥१०९॥

 

त्याने आपली निष्ठा सोडली । म्हणोनि लोकांनी हेळसांड केली ।

त्याचेकडे कां न आली । पुकार लोकांची ॥११०॥

 

जंव ब्राह्मणचि चुकों लागले । तंव गांवचि स्वैराचारी झालें ।

नाना तर्‍हेचे तमाशे माजले । गावांमाजीं ॥१११॥

 

लोकश्रध्देत व्हावया बदल । काय कारण घडलें प्रबल

हें जाणेल तोचि निर्मल । त्यागी तपस्वी ॥११२॥

 

प्रभाव ऐसा अंगी यावया । त्याग यपनियमांची दीक्षा तया ।

पाहिजे म्हणोनि तपश्चर्या । करावी लागे ब्रह्मकर्म्या ॥११३॥

 

आबालवृध्दा समजविण्यासाठी । ओज तेज असावें पाठी ।

म्हणोनि जपतप सदग्रंथ कंठी । धारण करावे ब्राह्मणाने ॥११४॥

 

उपदेश देतां रागावूं नये । लोभें चुकवूं नये निर्णय ।

म्हणोनि सांभाळावा इंद्रियजय । अध्यात्मउपाय त्यासाठी ॥११५॥

 

आधी त्याग त्याने करावा । तरीच मग लोकांसि शिकवावा ।

याच मार्गे परिणाम पहावा । लोकांमाजीं आपैसा ॥११६॥

 

ही दीक्षा ज्याने घेतली । आपुली भोगवासनाचि निरसली ।

त्यासीच ब्राह्मण संज्ञा मिळाली । वर्णाश्रमाची ॥११७॥

 

ऐसे गुण जो धरण्यासि चुकला । तो ब्राह्मण म्हणोनि गौरविला ।

 तरि व्यर्थचि आहे त्याला । पदवी अजागळापरी ॥११८॥

 

जातिवेषासि वंदणे । हें तों दुसर्‍याचेंचि सोने ।

 फिटलें कोणाचें पारणे । रुईफळे खाऊनि ॥११९॥

 

ब्राह्मण मुळी जाति नोहे । ती विशालतेची पदवी आहे ।

 हें समजोनि धरावी सोय । ग्रामवासियांनि ॥१२०॥

 

सर्वाघटीं ब्रह्म ईश्वर । पाहूनि होई सेवातत्पर ।

 तोचि ब्राह्मण सर्वांवर । प्रभाव पाडी नम्रतेचा ॥१२१॥

 

त्याचें चारित्र्य बघूनि उज्ज्वल । लोभ करिती त्यावरि आबाल ।

 सर्वांसीच सांगे विशाल । धर्म मानवजागृतीचा ॥१२२॥

 

ब्राह्मण असे अस्पृश्यांचा । क्षत्रियांचा वैश्यादिकांचा ।

कोणाशीच पारखा त्याचा । शब्द नाही ॥१२३॥

 

त्याने सर्वांचे भले पाहावें । भिन्न गुणांचे लोक जुळवावे ।

 आणि गांव चालवूनि संतोषावें । बुध्दि देवोनि ॥१२४॥

 

उगीचचि लोक ना ऐकती । त्यांसि दंड देईल हा ब्रह्ममूर्ति ।

 परि ग्रामी वाईट चालीरीती । प्राण गेल्या न ठेवी ॥१२५॥

 

ब्राह्मणाचें वचन ना ऐके । तो तिन्ही लोकीं न टिके ।

याचें कारण हेंचि इतुकें । ब्राह्मण अनर्थ करीना ॥१२६॥

 

त्याची हेचि साध्यमुद्रा । शांति लाभावो आब्रह्मशूद्रा ।

ग्रामसुखांत सुख लोकेंद्रा । तपस्वियासि ॥१२७॥

 

म्हणोनि ब्राह्मणवर्ण श्रेष्ठ बोलला । उगीच नाही डांगोरा पिटला ।

 भृगूची लाथहि झेलता झाला । देव माझा ॥१२८॥

 

ऐसें ब्राह्मणत्व निर्माण करा । प्रचारक होऊनि घरोघरीं फिरा ।

तरीच सर्वांसि मिळे आसरा । सुखशांतीचा ॥१२९॥

 

हें ब्राह्मणत्व नव्हे जातीय । कुणीहि साधावें निर्भय ।

जो आदर्श प्रचारक होय । तोचि ब्राह्मण निर्धारें ॥१३०॥

 

ब्राह्मण सर्वांची सदबुध्दि । ती करील अन्य गुणांची वृध्दि ।

 गांवी नांदतील ऋध्दिसिध्दि । गुणकर्मांच्या सहकारें ॥१३१॥

 

हरिकथानिरूपण राजकारण । सावधपण सेवाप्रयत्न ।

 हा चारी वर्णांचा सार न्यूनपूर्ण । प्रत्येकाने आचरावा ॥१३२॥

 

लोकशिक्षण न्याय रक्षण । जनांचें पोषण आणि श्रमदान ।

 यासाठी जे जे करितील प्रयत्न । त्यांना साधेल वर्णाश्रम ॥१३३॥

 

स्वभावें सर्वांनी कर्म करावें । गांव सौंदर्यें साजवावें ।

सर्वासह उध्दरोनि जावें । तुकडया म्हणे ॥१३४॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र स्वानुभव संमत।

वर्ण - धर्म निरूपला येथ । पांचवा अध्याय संपूर्ण ॥१३५॥


अध्याय ५  वा   ऑडीओ स्वरुपात --



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।